#मायक्रो-स्क्रीन्स… “इंटेरियर कॅफे नाईट’

– प्राजक्‍ता कुंभार

त्याला ती दिसते. त्याच्याच कॅफेमध्ये. ती पाठमोरी बसलीये, काहीतरी लिहायचा प्रयत्न करतीये. 30 वर्ष झाली आहेत खरंतर तिला पाहून. पण खुर्चीवर पाठमोऱ्या बसलेल्या तिला तो ओळखतो. काळाच्या ओघात पुसट झालेल्या त्यांच्या ओळखीला चाचपडत तो तिच्या समोर जाऊन बसतो. तिचं लक्ष नाहीये. आगंतुकासारखं कोणीतरी आपल्या समोरच्या खुर्चीत येऊन बसलंय म्हटल्यावर, जरा वैतागूनच ती त्याच्याकडे बघते.. आणि…

अधिराज बोसने दिग्दर्शित केलेली ‘Interior Cafe Night’ ही 13 मिनिटांची गोष्ट आहे ती आपल्यापैकी प्रत्येकाने किमान एकदातरी अनुभवलेल्या प्रेमाच्या वर्तुळाची. एखाद्याच्या आकंठ प्रेमात असणं, कोणत्यातरी अपरिहार्य कारणामुळे एकमेकांपासून दुरावण आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर पुन्हा, कोणत्याही कारणाशिवाय एकमेकांना सामोरं जाण्याचं हे वर्तुळ. ज्याच्यासोबत ‘आयुष्यभर एकत्र’ राहायची स्वप्न पाहिली आहेत, तो पार्टनर एकदिवस अचानक शहर सोडून निघालाय. अगदी काहीही झालं आणि कितीही दूर राहिलो तरी आपलं हे नातं वर्कआऊट करायचं हे असं मनाशी कितीही पक्‍क ठरवलं तरी ते होणार नाहीये हे दोघांनाही कळतंय, समजतंय पण उमजत नाहीये. तो शेवटचा निरोप घेणं जमत नाहीये दोघांनाही. या शेवटच्या निरोपाचीच ही गोष्ट.
कोलकात्यामध्ये एका कॅफेचा मालक असणारा नसीरुद्दीन शाह, अगदी ध्यानीमनी नसताना Carnaj Patel या आपल्या प्रेयसीला भेटतो, तेही त्याच्याच कॅफेमध्ये. या भेटीमध्ये 30 वर्षांचा काळ गेला आहे खरा, पण त्यांच्या नात्यातला गोडवा मात्र तसाच टिकून आहे, अगदी नसिरुद्दिनच्या हातच्या फेमस ‘ब्रेडपुडींग’ सारखा. त्यांच्या या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर, त्याच कॅफेमध्ये बसलेलं नवीन कस्तुरिया आणि श्वेता बसु प्रसाद हे जोडपं मात्र, नसीरुद्दीन आणि Carnaj यांनी 30 वर्षांपूर्वी अनुभवलेल्या भावनिक आंदोलनातून जातंय. श्वेता शहर सोडून निघालीय कायमची, आणि ती नवीनला शेवटचं भेटायला म्हणून त्या कॅफेमध्ये आलीये.
एकीकडे कोणीतरी पुन्हा त्याच कारणासाठी वेगळं होतंय, तर दुसरीकडे त्याच कारणाने वेगळे झालेले दोघे आयुष्याच्या अशा वळणावर एकमेकांना भेटताहेत , जिथे कोणतीच बंधन नाहीत. या दोन्ही जोडप्यांची गोष्ट उलगडते ती एकमेकांमधून, एकमेकांच्या वर्तमान-भूतकाळातून. संपूर्ण शॉर्टफिल्ममध्ये नसिरुद्दीन शहांचा अभिनय ही प्रेक्षकांना सर्वाधिक भावलेली बाजू आहे. आपल्या संवाद कौशल्यांतून, फक्त नजरेतून-देहबोलीतून किंवा चेहऱ्यावरच्या सहज हावभावांतून ते तुमची नजर स्क्रीनवर खिळवून ठेवतात.
Carnaj ला पाठमोरी पाहिल्यावर, शक्‍यता-अशक्‍यतांची गणितं सोडविणारी त्यांची नजर किंवा तीने ‘कहॉं से शुरु करू?’ असा प्रश्‍न विचारल्यावर ‘शुरुवात से’ हे असं एका शब्दाचं उत्तर देताना त्यांच्या चेहऱ्यावरची बोलकी हतबलता क्‍लास आहे. नवीन कस्तुरीयाने रंगवलेला ‘टीपीकल इंडियन बॉयफ्रेंड’पण त्या कॅरेक्‍टरची दखल घ्यायला भाग पडतो. एकूणच उत्तम अभिनय आणि दिग्दर्शन यांतून आपल्यातलीच वाटावी अशी ही निरोपातून उलगडणारी प्रेमाची गोष्ट प्रत्येकाने किमान एकदा अनुभवावी अशीच आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)