#मायक्रो स्क्रीन्स: अहल्या…

प्राजक्‍ता कुंभार 

अहल्येची गोष्ट आठवतीये? गौतम ऋषींचं रूप घेऊन आलेल्या इंद्राला फसलेली अहिल्या. आपल्या पत्नीला एका दुसऱ्या पुरुषासोबत एकांतात पाहून गौतम ऋषींच्या रोषाला बळी पडलेली अहिल्या. गौतम ऋषींच्या शापाने ‘शिळा’ झालेली अहल्या? स्वतःची काही चूक नसताना, केवळ गैरसमजातून घडल्या एका कृतीने स्वतःच अस्तित्व उद्‌ध्वस्त करून घेणाऱ्या या अहल्येला जर कलियुगात स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायची संधी मिळाली तर? फक्‍त तिच्या सौंदर्यावर भाळून, गैरसमजातून मिळणारा फायदा घेणारा इंद्र, कलियुगात जर तिला इतर पुरुषांच्या नजरेतून भेटला आणि तिने ‘दगड’ होऊन पडून राहायचं नाकारलं तर? ‘अहल्या’ ही सुजॉय घोष या दिग्दर्शकाची कथा आपल्याला हीच आजच्या काळातल्या ‘अहल्ये’ची गोष्ट सांगते. रामायणातले संदर्भ, अगदी आपल्या आसपास घडताहेत, इतके आपलेसे होऊन प्रत्येक प्रसंगांतून उभे राहतात आणि राधिका आपटेने साकारलेली ‘अहल्या’ आपल्या नजरेसमोरून हटत नाही.

सुजॉय घोषच्या इतर अनेक कथांप्रमाणे, या गोष्टीलाही बेंगॉलची पार्श्वभूमी आहे. आपल्या वय वर्ष 78 असणाऱ्या नवऱ्यासोबत (सौमित्र चॅटर्जी) राहणारी अतिशय तरुण, सुंदर, बघताक्षणी भुरळ पडावी अशी अहिल्या (राधिका आपटे). एके दिवशी इन्स्पेक्‍टर इंद्रसेन अहिल्याच्या घरी जातो. अर्जुन रॉय नामक बेपत्ता तरुणाची चौकशी करण्याच्या निमित्ताने. या अर्जुनला अहिल्याच्या घरी शेवटचं पाहिलं गेल्याचा पुरावा असतो त्याच्याकडे. चौकशीसाठी गेल्यानंतर दिवाणखान्यात एका टेबलावर मांडून ठेवलेल्या माणसांच्या हुबेहूब प्रतिकृती इन्स्पेक्‍टरच लक्ष वेधून घेतात.

अर्जुनविषयी माहिती देण्यासाठी हे दोघे कोणतेही सहकार्य करत नाही हे लक्षात आल्यावर, तो त्याच्याकडे त्या दोघांविरुद्ध पुरावा असल्याची जाणीव त्यांना करून देतो. हे ऐकल्यावर अहिल्याचा नवरा ‘त्याच्याकडे असणारा जादूचा दगड वापरून अर्जुनने रूपपरिवर्तन केलंय’ हे गुपित सांगतो. त्याच्या मते, हा दगड हातात घेऊन, तुम्ही ज्या मनुष्याचा विचार करता, त्याचं रूप तुम्हाला धारण करता येणं सहजशक्‍य होतं. अर्थातच, इंद्रसेनला हा निव्वळ भंपकपणा वाटतो, कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी रचलेली गोष्ट. त्याचं हे मत ऐकून सौमित्र चॅटर्जी त्याला स्वतः तो दगड हातात घेऊन आजमावायला सांगतो आणि रामायणाच्या या गोष्टीचा इथेच येतो भन्नाट क्‍लायमॅक्‍स!!! सस्पेन्स थ्रिलरचा उत्तम नमुना असलेली ही शॉर्ट फिल्म असून कलाकारांच्या अभिनयाने तिला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. गोष्टीचा शेवट तर अंगावर काटा आणणारा. कोणाच्या तरी आकर्षणाची किंमत मोजावी लागणारी रामायणातली अहल्या आणि त्याच आकर्षणाचा सामना आजच्या काळात करणारी अहिल्या हा फरक दिग्दर्शकाने उत्तम दाखवलाय. रूढ परंपरा मोडण्याचं धाडस करणाऱ्या स्त्रिया नेहमीच चौकटी बाहेरच्या ठरतात. इथेच सुजॉय घोषची अहल्या वेगळी ठरते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)