#मायक्रो-स्क्रीन्स : अनुकूल…

प्राजक्‍ता कुंभार

यंत्रमानव किंवा रोबोट असा शब्द ऐकला की अगदी सहज कोणत्या तरी हॉलीवूड चित्रपटाचं नाव डोळ्यांसमोर येत. यंत्रांनी पृथ्वी काबीज केली, माणसाची पृथ्वीवरची ओळख नष्ट होऊ पाहतीय आणि आता दोघांच्याही अस्तित्वाचा संघर्ष सुरू झालाय अशी साचेबद्ध गोष्ट असते ती. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपल्या आजूबाजूला वेगाने वाढणारं यांत्रिकीकरण या गोष्टींच्या नकारात्मक छटा या कथाबीजावर अशा चित्रपटांची पटकथा आधारित असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच मूर्त रूप असणाऱ्या या यंत्रमानवांना अनेकदा खलनायक म्हणूनच चित्रित करण्यात येतं.

पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी हे बिरूद अभिमानाने मिरवणाऱ्या मनुष्याने खरंतर स्वतःच्या बुद्धिकौशल्याचं प्रतीक म्हणून निर्माण केलेल्या या यंत्रमानवाला कोणत्याही गोष्टीतली ही ‘ग्रे शेड’ काही चुकलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर सत्यजीत रे यांनी 1976 साली लिहिलेल्या ‘अनुकूल’ या कथेवर आधारित असणारी आणि सुजॉय घोष यांनी दिग्दर्शित केलेली ‘अनुकूल’ ही शॉर्टफिल्म आपल्याला यांत्रिकीकरणाच्या वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.

ही गोष्ट आहे कोलकात्यातली. पेशाने हिंदीचे प्रोफेसर असणारे निकुंज चतुर्वेदी (सौरभ शुक्‍ला) त्यांना सोबत म्हणून आणि घरकामात मदत म्हणून ‘अनुकूल'(परमब्रत चॅटर्जी) या यंत्रमानवाला घरी आणतात. कोलकात्यामध्ये असणाऱ्या उहुीेळपसहशश ठेलीें र्डीश्रिू कॉर्पमधून प्रत्येक महिन्याला एका ठराविक रकमेचा हप्ता ठरवून, कोणतीही सुट्टी न घेणारा आणि कोणत्याही अधिकच्या मोबदल्याशिवाय काम करणारा हा अनुकूल चतुर्वेदींच्या घरी येतो. दिसायला अगदी तुमच्या-माझ्या सारखाच असणारा, मित्राप्रमाणे बोलणारा-वागणारा, अतिशय समजुतदार असा असतो हा अनुकूल. त्याला पुस्तकं वाचण्याची भयंकर आवड असते आणि चतुर्वेदींच्या घरी असणारी पुस्तकांची खोली पाहून तो खूश होतो. त्यांचं मैत्र जुळतं आणि ते एकमेकांचा सहवास एक्‍सप्लोर करायला सुरुवात करतात.

सारं काही सुरळीत सुरू असताना, चतुर्वेदींचा चुलतभाऊ रतन एक दिवस त्यांच्या घरी येतो. शहरात होणाऱ्या यांत्रिकीकरणामुळे आणि यंत्रमानवांच्या वापरामुळे रतनची नोकरी गेली. त्यामुळे आपल्या भावानेच एक रोबोट घरी आणून ठेवलाय याचा त्याला प्रचंड राग येतो आणि तो अनुकूलला मारायचा (?) प्रयत्न करतो. या प्रसंगानंतर कंपनीचा प्रतिनिधी घरी येऊन अनुकूलला दुरुस्त करून जातो, पण त्याच वेळी रोबोटच्या वापरासंबंधीची एक महत्त्वाची अट पुन्हा चतुर्वेदींना सांगून जातो. ‘आपल्या जीवाला धोका आहे’ अशी जाणीव झाली तर या रोबोटसना त्या माणसाला इलेक्‍ट्रिक शॉक देण्याची कायद्याने मुभा असते. गोष्ट शेवटाकडे येते, तेव्हा चतुर्वेदींची कॉलेजमधली नोकरी जाते तीही त्यांच्या जागेवर एका यंत्रमानवाची नेमणूक होते म्हणून. नव्याने निर्माण होणाऱ्या आर्थिक विवंचनांमुळे अनुकूललासोबत ठेवणं त्यांना शक्‍य नसत. पण अनुकूलची एक कृती त्यांना या आर्थिक विवंचनेतून कशी बाहेर काढते, हे जाणून घेण्यासाठी घेण्यासाठी ही शॉर्टफिल्म पाहणं हा वेगळा अनुभव ठरेल.

या शॉर्टफिल्ममध्ये अनुकूल आणि चतुर्वेदी यांच्या ‘भगवद्‌ गीते’वर होणाऱ्या चर्चेचा प्रसंग या गोष्टीची जान आहे. कुरुक्षेत्रावर स्वतःच्या नातेवाईकांविरुद्ध शस्त्र हातात कसे धरू असा प्रश्न पडलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशावर होणारी ही चर्चा शॉर्टफिल्मच्या क्‍लायमॅक्‍ससाठी ज्या पद्धतीने वापरलीये, त्यातच इतर चित्रपट आणि ही शॉर्टफिल्म यांच्यातला फरक अधोरेखित होतो. काळाच्या कोणत्याही ठराविक साच्यात न अडकता किंवा ‘सन 2050’ अश्‍या कोणत्याही भविष्याच्या संदर्भाशिवाय, आपल्याच आजूबाजूला घडावी इतक्‍याच सहजतेने ही गोष्ट घडते. सत्यजित रे या अवलियाच्या लेखणीतून उतरलेली आणि ‘कहानी’सारखा उत्तम, वेगळ्या धाटणीचा चित्रपट देणाऱ्या सुजॉय घोष या दिग्दर्शकाने साकारलेली ही शॉर्टफिल्म ठराविक साय-फाय फिल्म्सपेक्षा नक्कीच वेगळी ठरते हेच या कथेचे यश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)