मामाच्या गावाला जाऊ या … 

ऑफिसला सलग तीन दिवस सुट्ट्या मिळताच गावी आजोळी जाण्याचा विचार मनात डोकावला. शाळेत असतांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची. परिवहन मंडळाची लाल-पिवळी एसटी पाहिली की आजही त्या दिवसांची आठवण होते. एस टी तेव्हा मला देवदूतासारखी वाटायची. तिच्यासाठी मनात एक खास जागा. आकर्षण अन कौतुक होतं. कारण शहरापासून दूर असलेल्या माझ्या गावी, आजोळी, छोट्या खेड्यापर्यंत मला नेणारी ती एकमेव गोष्ट होती. एवढे शब्दार्थ पाठ कर, किंवा अमुक एक काम कर असं मग आपल्याला जायचयं हं. असं मातोश्रींनी आश्‍वासन दिलेलं असायचं. यावेळी मात्र मी स्वतःच पुन्हा एकदा लहान होऊन गावाच्या ओढीनं प्रवासाला निघाले. पळणारं एकेक झाड, अन कापलं जाणारं अंतर मला आठवणींच्या एकेक रकान्यात नेऊन सोडत होतं जणू. 

लाकडी खांडांचे अनं खांबाचे टुमदार घर वाडाच, पुढे ओसरी, घरात चूल, रांजण, मंदिरातल्या काकड्याने दिवस जरा लवकर सुरू व्हायचा. रुळायला एक-दोन दिवस पुरेसे असायचे. शहरातला नाजूकपणा गळून गाव जीवनाशी समरस होऊन जायचो आम्ही. मामाच्या घरी आधीपासूनच दुध, दुभतं फार. डेरीत दूध पूरवल्यानंतरही घरीही विकत घेणारे लोक यायचे. आजी कामात असली तर ते काम करायला मिळायचं अन आवडायचंही. आम्ही भावंडं, मावशीची मुलं अन गावची दोस्त, मैत्रिणी असा मस्त मेळा जमायचा. आजीच्या हातची जाड भाकर, तवल्यांमध्ये (मातीचे गाडगे) शिजवलेल्या भाज्या, डाळीची वरणं, कढी, ठेचा, डेऱ्यात दही घुसळून केलेलं ताक, हे सारं आवडीनं खायचो.

सकाळी भरपेट न्याहारी झाल्यावर दुपारी शेतात धुडगूस घालायला आम्ही मोकळे. झपाझप पावलं टाकत शेतात जाणारे आप्पा-माझे आजोबा आणि जेवणाचा डबा मीच हातात धरणार असा हट्ट करत त्यांच्यासोबत धावत-धावत जाणारी मी.. काळी आई म्हणजेच जीव की प्राण होता आप्पांचा. शहरातून आलेली नातवंड उन्हात आजारी पडतील म्हणून काळजी करणाऱ्या आजीला “”मी पोरांना जपून नेतो” म्हणत आम्हाला शेतात घेऊन जात. त्यांच्या शेताची नावही मजेशीर, घरापासून जवळ असलेल्या काही एकराच्या जमिनींचं नाव – “गाडग्यांबा’ आणि डोंगराला लागून असलेल्या जमिनीचं नाव लाली, “आई, अशी नावं का आहेत गं? असं विचारल्यावर आईनं सांगितलं होतं- पूर्वी इथे आंब्याचं झाड होतं.
त्याला मोठ्या आकाराचे जवळपास मातीच्या छोट्या गाडग्याएवढे आंबे येत आता ते झाड नाही. पण त्यावरून त्या जमिनीचे नाव पडलं- गाडग्यांबा (गाडग्याएवढा आंबा) आणि “लाली’ हे नाव मातीच्या रंगावरून पडलं असावं. लालीत आंब्याचे एक मोठ डेरेदार झाड आहे. खोडही तेवढंच भक्कम आणि खोडाची रचना अशी होती की, त्यात चहूबाजूंनी आजूबाजूंची साल निघून कप्पे (खाते) तयार झाले होते. त्या कप्प्यांना आम्ही आमचं घर बनवायचो. काटक्‍यांच्या फळ्या मांडून तयार केलेलं रॅक, त्यावर मांडलेली लुटूपुटूची भांडी, आजीच्या घरात दिसते, तशी बघून – दगड मांडून तयार केलेली चूल किंवा गॅस असे उद्योग करून त्या वृक्षांच्या सावलीत खेळलेली भातुकली आठवली की हसू यें. दुपारी घटकाभर विश्रांती घेण्यासाठी आप्पा, मामालोक आमच्या या खेळाकडे येत. घरी पाहुणे आल्यच्या अविर्भावात त्यांना चहा-पाणी करण्यासाठी आमची लगबग व्हायची. आणि त्याला त्यांची दादही मिळायची.

आप्पा आम्हाला मुक्तपणे इकडे-तिकडे बागडू देत. उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून काळजी घेऊन उन्हाळ्यात आंबट-चिंबट खावं असं ते म्हणत. कैऱ्या, चिंचा, कवठं, डोंगराची काळी मैना अर्थात – “करवंद’ हे सगळं त्यांच्या देखरेखीत गोळा करून खायचो. कैरी पिकून तिचा पक्व आंबा होण्याच्या आधीच्या स्थितीत असते -तेव्हा अशा गोड कैरीला गावी “शाक’ म्हणतात आणि “आंबा’ शाकी लागला’ म्हणजेच “पिकू लागलाय’ असा उच्चार रूढ आहे, पक्ष्यांनी टोचलेले वा कुरतडलेले आंबे दाखवून आजी सांगायची “पाखरं शहाणी असतात खूप’ त्यांनी खाल्लेला आंबा गोडच असतो. आणि तो खरंच असायचा! मग एखादे दिवशी माणसं बोलावून आंबा उतरवला जायचा, मोजला जायचा, एका खोलीत पिकण्यासाठी ठेवलेल्या या अमृत फळांचा गंध दरवळत असायचा. दुपारच्या वेळी आंबे चोखून खायचा कार्यक्रम व्हायचा.

माझी आई गावी गेल्यावर गावाकडचीच होऊन जायची शहरात राहतो म्हणून हेच पाहिजे. तेच पाहिजे असं ती स्वतःही करायची नाही आणि कुणी असं केलेलं तिला आवडायचंही नाही. म्हणूनच शेणानं सारवलेल्या जमिनीवर किंवा शेतात काम करण्यासाठी असलेल्या सालदार (गडी) काका-मामा यांच्या सोबत बसून जेवण करायला कधीच लाज वाटली नाही. वाटला तो आनंदच. विहिरीचं पाणी पितांना is this hygenic? हा प्रश्‍न पडला नाही पाणी टंचाई असतांना अगदीच गरज पडली तर झेपेल तेवढ्या कळश्‍यांनी, हंड्यांनी पाणी भरण्याचं कामही न कुरकुरता केल्याचं आठवतयं.
मामाचं गाव मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात तर आमचं मूळ गाव -औरंगाबाद आणि जळगावच्या (मराठवाडा आणि खानदेश) सीमेवर वसलेलं सोयगाव तालुक्‍यातलं गाव. सुट्टीतले काही दिवस आम्ही तिथेही जायचो. सांस्कृतिकदृष्ट्या खान्देशाची छाप असलेला, अहिराणी बोलीभाषा प्रचलित असलेला हा भाग तापमानाचा पारा 40.0 च्या पुढे.  हिरवीकंच केळी, भुईमूंग, लालचटूक मिरच्या अशी नगदी पिकं होत, म्हणून केळीच्या पानांवर जेवणंही व्हायची. आत्यांची मुलं त्याच्या मामाच्या गावी आलेली असत. आपल्या आई-बाबांना मामा-मामी म्हणणारी भावंडांना भेटून लहानपणापासूनच नात्यांची ओळख वा समज आली. पुढेही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या नाते संबंधांना Logical प्रश्‍नांत मी कधी चुकले नाही.

मामाच्या गावी पूर्व मोजून एक-दोन किराण्याची दुकानं होती. तेव्हा उधारीवर वाण-सामान विश्‍वासानं दिलं जायचं. महिनाभर वहीखात्यावर हिशोब लिहून महिना अखेरीस दुकानदार ते वसूल करत आणि ग्राहकही पैसे नेऊन देत, मामाकडे किराणा एकदाच आणला जायचा पण तरीही छोट्या मोठ्या वस्तूंसाठी खातं होतंच. मी शहरात असा प्रकार कधी पाहिलाच नव्हता. आणि हे माहीत नसल्याने एकदा गंमत झाली. मला कुणीतरी सांगितलं “”इथल्या दुकानांमध्ये काही घेण्यासाठी पैसे लागत नाहीत. फक्त मामाचं नाव सांगायचं, वस्तू मिळते!” “”चल ! असं कसं होईल” या माझ्या शंकेवर “”अगं खरंच, आजमावून पहा हवं तर!” असं उत्तर मिळालं. मग काय? पैसे नसतांनाही वस्तू मिळतात का? हे पाहण्यासाठी आम्ही दुकानातून छोट्या -छोट्या गोष्टी आणण्याचा धडाकाच लावला. चॉकलेटस्‌ , गोळ्या, बोरकुट, बॉबी (पोंगे) सेफ्टीपिन्स असं काहीबाही. दुकानदार मामाचा मित्रच. दोनच दिवसांत या मुलाचं काहीतरी वेगळं चाललयं हे त्याच्या लक्षात आलं. वस्तू छोट्या, बिल कमी आणि उद्योग करणारी लाडकी भाचे कंपनी असल्याने मामा रागावणार नव्हतेच पण आईने मात्र आम्हाला चांगलंच फैलावर घेतलं. सगळा प्रकार लक्षात आल्यावर आईनं या वहीखात्याच्या व्यवहाराचा उलगडा केला. सर्वांना हसू आवरत नव्हतं पण आम्हा मुलांचे चेहरे मात्र केविलवाणे झाले होते. लहानपणी पाठांतर पक्कं असल्याने मला वर्षभर शाळेत केलेली भाषणं पाठ्य पुस्तकांतल्या कविता गोष्टी इत्यादी तोंडपाठ असायचं. त्यामुळे कधीही, कुणीही ते सगळं ऐकण्यासाठी मला उभं करायचं. दुकानदार मामांनीही एकदा माझ्याकडून असं बरंच काही ऐकून घेतलं आणि कौतुकानं मला आणि माझ्यासोबत आलेल्या भावंडापैकी सर्वांनाच खाऊ म्हणून काही ना काही दिलं. पण “दुधाचा चटका लागल्यावर माणूस ताकही फुंकून पितो’ या म्हणीप्रमाणे आम्ही घाबरून ते सगळं परत करू लागलो. तेव्हा हसत “”अरे, हे बक्षीस आहे. लिहून नाही ठेवणार यावेळी! अशी खात्री दिल्यावर आम्ही बक्षीस स्वीकारलं.

एक दीड महिना अशी मजेत सुट्टी घालवल्यावर परतीचा दिवस येऊनच नये, असं वाटायचं आजी-आजोबा, मामा-मामी खूप गोष्टी सोबत बांधून द्यायचे मेच्या शेवटच्या किंवा जूनच्या सुरूवातीच्या आठवड्यात परतीला निघालो तर एखादा पाऊस अनुभवायला मिळायचा. त्या पावसात ते निरागस मन भरल्या डोळ्यांनी गाव, माणसं नजरेत साठवून घ्यायचं आणि पुन्हा लवकर येईन असं म्हणून परतायची तयारी व्हायची. बस स्टॉपवर निरोप द्यायला खूपजण यायची. माझी आणि शेजारी राहणारीही एखादी आजी “लेकरू पुढच्या वर्षीच येईल आता” म्हणून तोंडावरून हात फिरवायची. त्या सगळ्यांना बघून मनात कालावा-कालव व्हायची. काहीतरी व्हावं आणि बस उशिरा यावी किंवा येऊच नये, आई बाबांनी आपल्यासोबत कायम इथेच स्थायिक व्हावं, किंवा आपल्याला पंख असते तर दर रविवारी इथं उडत-उडत येता आलं असतं असे अनेक विचार त्या मनात गर्दी करायचे. गाडी हलल्यावर आपल्याकडे बघत हात हलवणाऱ्या आकृत्या नजरेआड होतांना रडू कोसळायचं.

गाडी पुढे-पुढे जातांना मागे सरकणाऱ्या प्रत्येक झाडाला, शेताला प्रेमाने बघत बाय-बाय करणं आणि डोळ्यांचं झरणं कितीतरी वेळ चालू रहायचं. घरी परतल्यावर आम्ही भावंडं लगेच कॅलेंडर काढून गावी जाण्यासाठी पुढची मोठी सुट्टी कधी आहे, हे पाहत असू. आता काही वर्षांनी गावी गेल्यावर एक जाणवलं- गावात वाहतुकीच्या सोई, जीवनमान याच चांगला विकास झालाय. माझे आप्पा आता नाहीत, पण अनेक थकलेले जुनेजाणते हात अन त्यांच्या मनातली मायाच तशीच आहे. त्यांनी बदल स्वीकारले असले तरी आपल्याला एवढं सुंदर बालपण देणआऱ्या या वडीलधाऱ्यांना भेटणं, आशिर्वाद घेणं हे आपलंही कर्तव्य आहे.

आजकाल उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येही क्‍लासेस, प्रशिक्षण वर्ग, पुढच्या इयत्तेची तयार (बरेचदा शाळेकडूनही) इत्यादींमुळे मुलांची सुट्टी कशी जाते माहीत नाही. या गोष्टी महत्वाच्या असल्या तरी थोडे दिवस का होईना त्यांना मुक्तपणे बागडू द्यावं. आपण अनुभवलेलं सारं त्यांनाही मिळावं. या सर्वांमुळं जाणिवा विकसित होतात आणि आपण आपल्या मातीशी जोडलेलो राहतो. आणि याच गोष्टी आपल्याला पुन्हा-पुन्हा जगण्याच्या प्रेमात पाडत राहतात.नाही का?

विकासाच्या वाटेवर चालताना जुन्या चांगल्या गोष्टी, नाती, विसरता कामा नये. बरेचदा आपण हेच करतो. आणि जुन्या विस्मरणात गेलेल्या गोष्टी नंतर thrill म्हणून करतो. भाकरी खायला नाक मुरडून “आमच्या इथे चुलीवरचं पिठलं भाकरी /मटण भाकरी, मिळेल अशी पाटी वाचून तिथे गर्दी करतो. अर्थात यात गैर काही नाही पण प्रत्यक्ष अनुभव घेता येणेही सहज शक्‍य आहे हा उद्देश. भीमथडीच्या यात्रेतही खूप पालक आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या ग्रामजीवनाची ओळख करून देत असतात. मातीचा गोडवा असतोच असा!

ओढ लावते माती अनं 
अजून “भोवरा’ जिवाचा, नात्यांच्या तळ्यात होतो 
ओढ लावते माती अन 
अजून “भोवरा’ जीवाचा, नात्यांच्या तळ्यात होता 
थकलेले हात फिरता गालावर 
भर उन्हात… 
पाऊस डोळ्यात येतो… 
अजून ताजी आठवाची फुले 
सांगतो माझे मुळ 
ओळखीचा हा वारा… 
अन ओळखीचीच ही “इमानी रानधूळ…. 

– अमिता अशोक पाटील 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
4 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)