माफी मागतानाही कदमांची “टिवटिव’

मुंबई – एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरूणाईशी संवाद साधताना महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्‍तव्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटताच भाजपा आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. माफी मागतानाही त्यांनी राजकिय टिवटिव केली. माझ्या वक्‍तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला, त्यामुळे माता-भगिनींची मने दुखावली. झाल्या प्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्‍त करतो. पुनश्‍च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत असल्याचे ट्‌वीट राम कदम यांनी केले आहे.

दहीहंडीच्या कार्यक्रमात राम कदम यांनी मुलींना पळवून आणण्यासाठी आपण मदत करू, असे वादग्रस्त वक्‍तव्य केले होते. या वक्‍तव्यानंतर समाजाच्या सर्वच थरांत टीकेची झोड उठली. महिलांनी तर कदमांच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या घरावरही मोर्चा काढला होता. राम कदम हे सत्ताधारी भाजपाचे आमदार असल्याने भाजपाने त्यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी होण्याची शक्‍यता आहे. मनसे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने तर टीका केलीच, पण शिवसेनेनेही कदम यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राम कदम यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत सभागृह चालू न देण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर राम कदम यांना कोणत्याच पक्षाने निवडणुकीचे तिकिट देउ नये, असे आवाहन केले आहे. विरोधी पक्षाच्या वतीने कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी घाटकोपर पोलीस ठाण्यात आंदोलनही करण्यात आले आहे. भाजपा नेतृत्वाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशामुळे सर्वच बाजूंनी पाय खोलात जात असताना राम कदम यांनी अखेर ट्विटरद्वारे आपला माफीनामा राज्यातील जनतेला सादर केला आहे.

राम कदम यांची भाजपमधून गच्छंती ?
राम कदम यांच्याविरोधात राजकिय पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटण्यास सुरुवात झाल्याने अखेर भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही आता कदम यांच्या विरोधात जुते आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची पक्षातून गच्छंती अटळ असल्याचे बोलले जात आहे. राम कदम यांच्या विरोधात अभाविपकडून त्यांच्या घाटकोपर मतदारसंघात जुते मारो आंदोलन आज संध्याकाळी करण्यात आले. ही विद्यार्थी संघटना भाजप पक्षाशी संलग्न आहे. त्यामुळे पक्षाच्याच संघटनेकडून राम कदम यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या गंच्छतीवर शिक्कामोर्तब असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)