मान्सून परतला, पण डोळ्यांत पाणी

निम्म्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट
पुणे – गेले चार महिने टप्याटप्याने बरसणाऱ्या मान्सूनने माघारी जातानाही दमदार हजेरी न लावता काढता पाय घेतला आहे.महाराष्ट्रातून मान्सून आता पूर्णपणे परतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळेच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग आला आहे.

यंदा 8 जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. शुक्रवारी (दि.5) निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर शनिवारी (दि.6) संपूर्ण राज्यातून मान्सून परतला आहे. गेल्या आठ वर्षांची वाटचाला पाहता यंदा मान्सूनने राज्याला लवकरच “बाय-बाय’ केला आहे. गेल्या वर्षी (2017) 24 ऑक्‍टोबर रोजी मान्सून महाराष्ट्रातून परतला होता. तर, या चार महिन्यांत जो पाऊस झाला, तो अपुरा झाला असून खरिपाची पिके कशीबशी तगली आहेत. तर, दुसऱ्या बाजूला मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे संकट आतापासूनच घोंघावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

राजस्थानातून 27 सप्टेंबर रोजी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत तो महाराष्ट्रातून सुद्धा बाहेर पडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड, महाराष्ट्र, संपूर्ण तेलंगणा, कर्नाटकाच्या काही भागातून मान्सून परतला आहे.

दक्षिण भारतात ईशान्य मान्सून
अरबी समुद्रात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनची परतीचा वेग वाढला आहे. सोमवारी (दि.8) दक्षिण भारतातील राज्यांसह संपूर्ण देशातून मान्सून परतणार असून या भागात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून (ईशान्य मान्सून) पाऊस सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)