मान्सूनची सुवार्ता सुफल ठरण्यासाठी…

      धोरण

प्रा. डॉ. जे. एफ. पाटील

यंदाच्या वर्षी सरासरीच्या 100 टक्‍के पाऊस पडेल असा अंदाज “स्कायमेट’ या हवामानसंस्थेने वर्तवला आहे. अर्थातच ही सुवार्ता आहे आणि ती योग्य वेळी आली आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी पीकनियोजनाची पूर्वतयारी योग्य पद्धतीने केल्यास आणि शासनानेही बियाणे, खतपुरवठा यांसह किमान आधारभूत किमती यांबाबत योग्य पद्धतीने निर्णय घेतल्यास ही सुवार्ता सुफल ठरेल.

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 100 टक्‍के पडणार आहे. याचाच अर्थ यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक असणार आहे. हवामान संस्थांकडून वर्तवण्यात येणारे अंदाज हे तंतोतंत बरोबर नसतात. अंदाजित पर्जन्यमान आणि प्रत्यक्षात पडलेला पाऊस यांमध्ये थोडी फार तफावत असते, असे गेल्या 20-30 वर्षांमधील परिस्थितीवरून दिसून येते. काही वेळा अंदाजित पावसापेक्षा जास्त पाऊस होतो, तर कधी कमी पाऊस होऊन दुष्काळजन्य परिस्थितीही उद्‌भवते.

भारतीय हवामान खात्याच्या मान्सूनसंदर्भातील अंदाजांमध्ये आणि बरसलेल्या पाऊसमानामध्ये बरेचदा तफावत दिसून आली आहे. स्कायमेट ही खासगी संस्था असली तरी या संस्थेचेही गेल्या पाच वर्षांत तीन वेळा अंदाज चुकले आहेत. 2013 आणि 2017 या दोन वर्षी स्कायमेटचे अंदाज खरे ठरले. 2014 मध्ये या संस्थेने सरासरीच्या 94 टक्‍के पाऊस पडेल असे म्हटले होते; पण प्रत्यक्षात ही टक्‍केवारी 88 पर्यंत घसरली. 2015 मध्ये तर स्कायमेटने 102 टक्‍के म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तवली होती; तथापि, त्यावेळी 86 टक्‍केच पाऊस पडला.

2016 मध्येही स्कायमेटचा अंदाज आणि प्रत्यक्षातील पाऊस यांमध्ये 8 टक्‍क्‍यांचा फरक होता. त्यामुळे आताच्या अंदाजामध्येही 10 टक्‍क्‍यांची वृद्धी अथवा घट गृहित धरूनच त्याकडे पाहिले पाहिजे. तसे पाहिल्यास 10 टक्‍के घट झाली तरीही यंदा 90 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्‍यता नाही आणि 10 टक्‍के वाढ झाली तरी 110 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस बरसणार नाही. त्यामुळे या अंदाजाचा लसावि काढल्यास यंदा मान्सून सरासरी गाठणार असे म्हणता येईल.

मान्सूनचे पूर्वानुमान हे शेतीसाठी अत्यावश्‍यक असते. त्यामुळे एका अर्थाने हा अंदाज योग्य वेळी उपलब्ध झाला आहे. या अंदाजाचा योग्य फायदा करून घेणे हे सरकारच्या आणि शेतकऱ्यांच्या दोघांच्याही दृष्टीने हिताचे आहे. खरिपासाठीच्या पूर्वतयारीच्या कालखंडात शेतीची पूर्वमशागत करणे हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असतो. आता एप्रिल महिना संपत आला असला तरी मे महिना संपूर्ण आहे. या अंदाजामुळे शेतीची पूर्वमशागत करण्याचे नियोजन करणे शेतकऱ्याला शक्‍य होईल. यामध्ये नांगरट किंवा कुळवणी महत्त्वाची असते. पूर्वअंदाजामुळे शेतकऱ्याला जमीन तयार करण्याला पुरेसा कालावधी मिळेल.

शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आणि नाजूक प्रश्‍न म्हणजे किती क्षेत्रात कोणते पीक घ्यायचे हा. याबाबतचा निर्णय घेणे पावसाच्या योग्य वेळी मिळालेल्या अंदाजानुसार शक्‍य होते. कोणते पीक घ्यायचे, कोणत्या जमिनीत आणि किती क्षेत्रात घ्यायचे या तिन्हींबाबत शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेता येतो. पीक नियोजन योग्य पद्धतीने करता येते. तसेच जमीन नियोजन करता येते. त्याचा फायदा म्हणजे एकाच पिकासाठी पैसा खर्च केला जात नाही. विविध पिकांसाठी जमिनीचा योग्य वापर केला जाऊ शकतो. एकाच प्रकारच्या धान्याच्या उपलब्धतेमुळे बाजारात किमती कोसळतात. अशी स्थिती टाळता येणे शक्‍य होते. दुसरीकडे ग्राहकांनाही वैविध्यपूर्ण शेती उत्पादने मिळतात. जमिनीच्या पोतानुसार योग्य पिके घेता येतात.

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला नियोजन करताना शेतीसाठी लागणारे घटक म्हणजे बियाणे, खते, पतपुरवठा, कीटकनाशके, मजूर तसेच यंत्रसामग्रीची देखभाल या सर्वांबाबत विचार करावा लागतो. पतपुरवठा किती आणि कुठून घ्यायचा, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजूर किती संख्येने वापरायचे याचे नियोजन करावे लागते.    पाऊसकाळाचा अंदाज योग्य वेळी कळाल्यास हे करणे सहजशक्‍य होते.एका बाजूला शेतकरी ही सर्व पूर्वतयारी करत असला तरी दुसऱ्या बाजूला यासंदर्भात शासनाची भूमिका महत्त्वाची ठरते.शेतकऱ्यांना योग्य प्रकारचे बियाणे उपलब्ध करून देणे, खतांची उपलब्धता करणे, बियाणे व खते योग्य किमतीला उपलब्ध करून देणे, शेतीला योग्य पतपुरवठा करणे ही सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने राबवण्यासाठी शेतकऱ्याप्रमाणेच सरकारनेही सज्ज राहणे आवश्‍यक ठरते. पर्जन्यमान चांगले असेल तर सरकारलाही हे व्यवस्थापन करताना कमी अडचणी येतात.

मान्सूनची बरसात समाधानकारक झाल्यास कृषीउत्पादन वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे उत्पादन भरघोस असले की बाजारात किमती पडतात. त्या पडू नयेत म्हणून सरकारला ठिकठिकाणी साठवणूक व्यवस्था करावी लागणार आहे. भाजीपाला, फळफळावळ यांच्यासाठी शीतगृहांची व्यवस्था करावी लागेल. हे सर्व करत असताना रस्ते उत्तम परिस्थितीत असले पाहिजेत. त्यासाठी रस्त्यांची दुरुस्तीही झाली पाहिजे. एकदा पाऊस सुरू झाला की रस्तेदुरुस्ती थांबते. त्यामुळे सरकारच्या रस्ते विभागानेही मिळालेल्या कालावधीचा सुयोग्य वापर करत शीघ्रगतीने पावले टाकणे आवश्‍यक आहे. दुसरा मुद्दा म्हणजे किमान आधारभूत किमतीचा. कमिशन ऑफ ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईजेस म्हणजेच कृषीमूल्य आयोगामार्फत किमान 24 पिकांच्या किमती निर्धारित केल्या जातात. त्या पावसाचा अंदाज पाहून पेरणीच्या आधी निर्धारित केल्या गेल्यास शेतकऱ्याला पीक नियोजन करणे सोपे जाईल.

पीक नियोजन करून झाल्यानंतर किमान आधारभूत किमत ठरल्यास काही ठिकाणी जास्त उत्पादन, काही ठिकाणी कमी उत्पादन, काही ठिकाणी टंचाई तर काही ठिकाणी अतिरिक्‍त उत्पादन असे प्रश्‍न निर्माण होतात. म्हणूनच शेतकऱ्याचे किमान नुकसान आणि कमाल फायदा होण्याच्या दृष्टीने या किमती लवकरात लवकर जाहीर करून हा असमतोल टाळायला हवा. पावसाच्या या अंदाजामुळे सरकारला पुरेसा अवधी मिळाला आहे.

चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला की बाजारात शेतीउत्पादन भरपूर येईल अशी भावना निर्माण होते. साहजिकच व्यापारीही आपल्याकडे किती साठा करायचा, किती किमतीला घ्यायचा, बॅंकांकडून किती कर्ज घ्यायचे याचा विचार करतात. पर्जन्यमान समाधानकारक असल्यामुळे यात साठेबाजी होण्याची शक्‍यता नाही. कारण अन्नधान्याच्या टंचाईची स्थिती उद्‌भवणार नाहीये. टंचाई असल्यास साठेबाजीला उधाण येते. बऱ्यापैकी पाऊस आणि उत्तम उत्पादन असल्याने धान्याची भाववाढ होणार नाही आणि अन्नधान्यांचे भावही नियंत्रणात राहण्याची शक्‍यता आहे. सारांश, समाधानकारक पावसाची सुवार्ता सुफल ठरण्यासाठी शेतकरी आणि सरकार यांनी सुयोग्य प्रयत्न केल्यास येणारा काळ सुखकर ठरेल यात शंका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)