मानवी मूल्ये जपण्याची गरज – श्रीपाल सबनीस

पिंपरी – शिक्षक, विद्यार्थी यांनी आपल्या जीवनामध्ये बंधुता, न्याय या सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याचा बोध घ्यावा, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

चिंचवड येथे राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व प्रीतम प्रकाश महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने चौथ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस हे बोलत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष भगवान महावीर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, स्वागताध्यक्ष डॉ. दीपक शहा, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, निमंत्रक महेंद्र भारती उपस्थित होते.

सबनीस म्हणाले की, शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समाजात घडत आहेत. काही शिक्षकांमधून नीतिमूल्यांचा ऱ्हास झाला आहे. विद्यार्थ्यांनी चुकीच्या दिशेला जाऊ नये. सुशिक्षित होण्याबरोबर सुसंस्कृत होणे गरजेचे आहे. शिक्षकी पेशाचा सन्मान राखण्यासाठी चारित्र्य निष्कलंक ठेवले पाहिजे. शिक्षक समाजातील महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी साहित्यिक बाबा भारती यांना श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते साहित्यसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, साहित्यिक डॉ. महादेव कांबळे, प्रा. तुकाराम पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. अशोककुमार पगारिया यांनी दिवसभराच्या संमेलनाचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)