मानवी जीवनाचाच नव्हे नैसर्गिक मूल्यांचा पाया : सहकार (भाग 1)

मानवाचा एकसंघपणा सहकाराने जुळून आला. प्राथमिक अवस्थेतील मानवाने एकमेकांना केलेल्या मदतीतून मानवी सहकाराची सुरुवात झाली खरी. परंतु, ही परस्पर पूरकता निसर्गदत्तच आहे. अर्थात, निसर्गातील प्रत्येक घटकाचे काम परस्पर पूरक आहे. एकमेकांच्या साहाय्याने आकार घेण्याचे आहे. परंतु, निसर्ग नियम डावलून परिवर्तन झाले असे कधीच होत नाही. मात्र, मानवी हस्तक्षेपाने त्यात झालेल्या फेरबदलाने निसर्गाचीही परस्पर सहकार्य- शृंखला व्यथित आहे. त्याचे दुष्परिणाम निसर्गाच्या प्रकोपात आणि अनपेक्षित बदलातून होणाऱ्या नुकसानीने दिसून येतात. एकूणच काय तर सहकार हा मानवी जीवनाचा नव्हे तर नैसर्गिक मूल्यांचा पाया आहे. त्याची जोपासना झालीच पाहिजे. 

मानवी इतिहासापेक्षाही सहकार जुना आहे. सहकाराची उत्पत्ती परदेशात (इंग्लंड) असल्याचे उपलब्ध इतिहास सांगतो. परंतु, सूक्ष्म निरीक्षण करता निसर्गाच्या अस्तित्वात सहकाराची उत्पत्ती दिसून येते. निसर्गातील प्रत्येक घटकाची कळत-नकळत परस्पर पूरकता हाच तर खरा नैसर्गिक सहकार आहे. नंतरच्या काळात मानवाने नैसर्गिक गतीपेक्षा अधिक वेगाने विकास साधण्यासाठी सहकाराची मानवी शाखा शोधून काढली. या शाखेने मानवी जीवन अधिक सुलभ व सुसह्य केले. विकास होत गेला, सहकार वरदान ठरले. “विना सहकार नही उद्धार’ हे ब्रीद अस्तित्त्वात आले.
समाजाची घडी अजून बसायची होती. त्या काळात तुलनेत अपप्रवृत्ती कमी होती. मग स्वतःच स्वतःची व्यवस्था उभारण्यासाठी सरसावलेल्या जाणत्यांनी सहकाराच्या माध्यमातून जनसामान्यांना दिलासा दिला. अनेकांचा रुतलेला आर्थिक गाडा मार्गावर येण्यास सुरुवात झाली. अनेक घरांना सहकाराचा दिलासा मिळू लागला.

मानवी जीवनाचाच नव्हे नैसर्गिक मूल्यांचा पाया : सहकार (भाग 2)

उद्योग, धंदे व पतपुरवठा संस्थांच्या सहकारी अस्तित्त्वाने अर्थविकासाचे जाळे व्यापक होऊ लागले. सहकाराने समूह विकास, समूहाने समाज व गावाचाही विकास होतो हे दिसू लागले. वाढत्या व्यापकतेबरोबर अर्थकारणाची गती वाढली. या टप्प्यावर ज्या समाजधुरिणांनी सहकाराची जोपासना केली ती नावे आजही आदरानेच घेतली जातात. परंतु, पुढे विनासायास उद्धार साधण्याच्या अपप्रवृत्तीने सहकाराकडे मोर्चा वळविला. सहकारात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला. सहकार बदनाम होऊ लागला. तो मोडीत काढण्याचे डावपेच सुरू झाले तसे वाचविण्याचेही प्रयत्न सुरू झाले. सहकाराच्या माध्यमातून मलिद्यावर डोळा ठेवणारांचा संघर्ष सुरू झाला. सहकार राजकारणाचा आखाडा झाला. शक्तिप्रदर्शनाचे माध्यम झाले. यात मूळ हेतू बाजूला राहून सशक्त सहकाराचे शोषण करणाऱ्यांचा उदय झाला. सहकाराच्या कार्यक्षेत्रात त्यातून अनेक ठिकाणी रणकंदन झाले. कुठे डोकी फुटली, तर कुठे गोळीबारही झाला. समाजाची संस्था व्यक्ती केंद्रित झाली व सहकार केविलवाणा झाला. ही बाजू म्हणजे माणसानेच सहकाराशी केलेला असहकार आहे. सहकाराशी सहकार्य केले तर थेट शेवटच्या हातांना काम व थेट त्यांच्याच हातात दाम देण्याची सहकाराची क्षमता कधीच संपणारी नाही.

पद्मश्रींची दूरदृष्टी – 
जिल्ह्यात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला सुरू केला. येथील मानवी जीवनमान उंचावण्याची ती मुहूर्तमेढ होती. प्राथमिक अवस्थेतील त्या सहकाराने आजच्या बलाढ्य व्यवस्थेची भक्कम पायाभरणी केली तो पद्मश्रींच्या दूरदर्शीपणाचा प्रभाव व परिणाम आहे. जिल्ह्याचे अर्थकारण यामुळे सातत्याने बदलत गेले. ही समाजोद्धाराची सरकारविरहीत आदर्श व्यवस्थाच उभी राहिली. वंचितांच्या वाट्याला काम करण्याचीही संधी नव्हती, हातातोंडाची गाठ तर दूरच. मात्र, ही किमया सरकारने साधली. अनेक कुटुंबांचा उद्धार सहकारने झाला. अर्थकारणाची जडणघडण होत असताना येथील राजकारणही सहकाराने ढवळून काढले. ते सहकाराभोवती गुरफटू लागले. त्यातून अनेक राजकीय घराण्यांचा उदय होत गेला. आज जिल्हा जसा सहकाराचा म्हणून ओळखला जातो तसा तो राजकारणामुळेही प्रसिद्ध आहे.

सहकार व खासगीकरण- 
आता जिल्ह्यात सहकार आणि खासगीकरणाच्या सहअस्तित्वाचे दिवस आहेत. काळानुसार होणारे बदल असले तरी खासगीकरणाची मालकशाहीकडे, तर सहकाराची वाटचाल समाजीकरणाकडे असते. परंतु, सहकारातील वाढत्या बेशिस्तीला लगाम घालण्याची क्षमता नसलेले नेतृत्त्व वाढू लागले की खासगीकरणाचा पर्याय पुढे येतच राहतो. जिल्ह्यातही आता तसे होत आहे. या बदलाला कालायतस्मैनमः म्हणून जमणार नाही. यातून एकाधिकारशाही वाढल्यास सहकाराच्या शोकांतिकेची जबाबदारी सामूहिक असेल. खासगीकरणाने मोठा पैसा ओतून उद्योग आणि सेवा सुरू केल्या आहेत. त्यांतूनही रोजगार निर्मिती होत आहे ही यातील सकारात्मक बाब आहे. परंतु, खासगी व सहकार अशी तुलना होते तेव्हा कारभारातील ढिसाळपणाने सहकार ढेपाळतो आणि खासगीकरणात कठोरता यशाची गुरुकिल्ली ठरते. याचे विश्‍लेषण आता खासगीने सहकारासमोर उभारलेल्या आव्हानांमुळे करावेच लागेल.

दुधाच्या धारेला आधार 
सहकाराने कोट्यवधींची उलाढाल झाली व होत राहील. आज लाखो लोकांचा या क्षेत्राशी संबंध आहे. यातून सहकारामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला दिशा मिळाली. अलीकडच्या काळात दूधउत्पादन हा अडचणीच्या काळात पैसा देणारा व्यवसाय शेतकऱ्यांचा संकटमोचक बनला. दुष्काळातही अनेक कुटुंबांना दुधाच्या धारेने आधार दिला. दुधाला सहकाराने आधार दिला. ज्या भागात दूधउत्पादन कमी होते तेथे आत्महत्यांचेही प्रमाण जास्त होते, असाही एक निष्कर्ष पुढे आला. सहकार मानवी मनोबल टिकवून ठेवण्यास किती उपयुक्त आहे हे जिल्ह्यातील दुग्धविकास क्षेत्राने सिद्ध केले. दुर्दैवाने दुधाच्या बाबतीत सहकार अडचणीत आहे. दरम्यान, खासगीकरणाने दुधाच्या माध्यमातून आज मोठा आधार दिला आहे हे निश्‍चित. सध्या जिल्ह्यात लहान-मोठे पशुधन 17 लाख आहे. तर, रोजचे दूध संकलन 20 लाख लीटरपेक्षा अधिक आहे.

 

 

भरत वेदपाठक 
उपसंपादक 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)