मानवी जीवनाचाच नव्हे नैसर्गिक मूल्यांचा पाया : सहकार (भाग 2)

मानवाचा एकसंघपणा सहकाराने जुळून आला. प्राथमिक अवस्थेतील मानवाने एकमेकांना केलेल्या मदतीतून मानवी सहकाराची सुरुवात झाली खरी. परंतु, ही परस्पर पूरकता निसर्गदत्तच आहे. अर्थात, निसर्गातील प्रत्येक घटकाचे काम परस्पर पूरक आहे. एकमेकांच्या साहाय्याने आकार घेण्याचे आहे. परंतु, निसर्ग नियम डावलून परिवर्तन झाले असे कधीच होत नाही. मात्र, मानवी हस्तक्षेपाने त्यात झालेल्या फेरबदलाने निसर्गाचीही परस्पर सहकार्य- शृंखला व्यथित आहे. त्याचे दुष्परिणाम निसर्गाच्या प्रकोपात आणि अनपेक्षित बदलातून होणाऱ्या नुकसानीने दिसून येतात. एकूणच काय तर सहकार हा मानवी जीवनाचा नव्हे तर नैसर्गिक मूल्यांचा पाया आहे. त्याची जोपासना झालीच पाहिजे. 

मानवी जीवनाचाच नव्हे नैसर्गिक मूल्यांचा पाया : सहकार (भाग 1)

सरकारी सहकार – 
आता शेतीसाठी सरकारी पातळीवर गट शेती प्रोत्साहित केली जात आहे. त्यासाठी काही खास तरतुदी होत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात किमान 20 गट तयार झाले आहेत. एका गटात किमान शंभर एकर शेती असणे अपेक्षित आहे. शेतीच्या छोट्या छोट्या तुकड्यांचे कसणे तुलनेत परवडत नाही. मग अशा गटांच्या माध्यमातून आवश्‍यक बाबींची खरेदी एकत्र करणे किफायतशीर ठरते. सरकारही त्याला प्रोत्साहित करत आहे. यामुळे सहकारी पद्धतीनेच शेती, सिंचन विकास व शेती उत्पादनात वाढ आणि विक्रीसाठी बाजारपेठ, आदी बाबी होतील.

मल्टिस्टेटची कामगिरी
मल्टिस्टेट संस्था जिल्ह्याच्या नव्हे राज्याच्या अर्थकारणाची नवी चळवळ आहे. जिल्ह्याने मल्टिस्टेटच्या माध्यमातून आपल्या अर्थकारणाचा झेंडा राज्यभर फडकवला आहे. विशेष म्हणजे राज्यात असलेल्या 450 मल्टिस्टेटपैकी बीड, उस्मानाबाद व नगर जिल्ह्यात 350 संस्था आहेत. हा एक विक्रमच आहे. नुकतेच बीड येथे मल्टिस्टेटच्या संस्थाचालकांचे शिबिर झाले. त्या शिबिरात कृषी व सहकार विभागाचे केंद्राचे निबंधक डॉ. सय्यद हुसेन अब्बास यांनी मल्टिस्टेटच्या राज्यातील चळवळीबाबत गौरवोद्‌गार काढले होते. आशिया खंडातील सर्वात मोठी चळवळ या संस्थांच्या माध्यमातून राज्यात उभी आहे. या संस्थांच्या प्रभावी अंमलबजावणीने शेतकरी आत्महत्यांच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला होता. यामुळे झालेल्या अर्थपुरवठ्यातून शेती, लघुउद्योग, रोजंदारी, आदीचा विकास जिल्ह्यात साधणे शक्‍य होत आहे.

जिल्हा बॅंक अर्थकारणाचा कणा – 
जिल्हा सहकारी बॅंक जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. 286 शाखा व दहा वाढीव व्यवस्था (एक्‍सटेंशन काऊंटर), 1400 विविध कार्यकारी संस्था, बॅंकेने पाच हजार दोनशे कोटींवर ठेवी संकलन केलेले आहे. तर, चार हजार पाचशे दोन कोटींवर कर्ज वितरण केले आहे अशी जिल्हा बॅंकेची आकडेवाडी आहे. जिल्हा बॅंकेची वाटचाल सहकाराचा अर्थकारणातील गौरवशाली भाग आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे, भाऊसाहेब थोरात, आबासाहेब निंबाळकर, मारुतराव घुले, बाळासाहेब विखे, यशवंतराव गडाख, मोतीभाऊ फिरोदिया, डॉ. बाबुराव दादा तनपुरे, दादा पाटील शेळके, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, गोपाळराव सोले अशा दिग्गज सहकारमहर्षींनी या बॅंकेची पायाभरणी भक्कम केली. त्यात बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, उदय शेळके, बिपीन कोल्हे, बाजीराव खेमनर, अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, अंबादास पिसाळ, अगदी अलीकडील मीनाक्षी साळुंके, आदींची पिढी बॅंकेला समृद्ध करत आहे. परंतु, आता वेगाने बदलत्या काळानुरूप बॅंकेलाही काही महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत. सहकाराचा झेंडा बुलंद करणारी ही संस्था निष्कलंक व उपयुक्त रहावी यासाठी धोरणात्मक बदलांची गरज आहे.

साखर कारखानदारी 
जिल्ह्याच्या विकासात साखर कारखानदारीचा महत्त्वाचा वाटा आहे. या कारखान्यांमुळे शेतीला चालना व परिसरात पूरक रोजगार निर्मिती झाली. कारखानदारीला जिल्ह्यातील पतसंस्थांचा आधार मिळाला. सहकार कसा परस्पर पूरक ठरतो व विकास करतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. या कारखानदारीमुळेच जिल्हा साखरेचे आगर बनला.
नगर जिल्ह्यात आज 14 सहकारी साखर कारखाने व 8 खासगी कारखाने आहेत. ताज्या आकडेवारीनुसार साखरेच्या एक कोटी 22 लाख 25 हजार पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. कामगार, इतर कर्मचारी, वाहतूकदार, पूरक व्यवसाय करणारे या सर्वांच्या मुलांची शिक्षण व्यवस्था, आरोग्य सुविधा यांच्यामुळे कारखाना कार्यस्थळ म्हणजे एक वसलेले गावच असते. ही कारखानदारी जिल्ह्याच्या जीवनातून वजा केली तर मोठी आर्थिक पोकळी निर्माण होईल.
ती ठोस पूर्तता या कारखान्यांनी केली आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात रोजगार, शेतीला चालना सरकारला शक्‍य झाले नसते; ते सहकाराने केले.

पूरक उत्पादने – 
केवळ साखर उत्पादन एवढेच साखर कारखान्यांचे काम राहिलेले नाही. काळानुसार पूरक उत्पादनांनी कारखान्यांचे उत्पन्न वाढविले आहे. ही उत्पादने निसर्गाला पूरक ठरत आहेत. जिल्ह्यात मद्यनिर्मिती तर होतेच. वीज निर्मितीने कारखान्यांचे अर्थकारण उजळून निघाले. बगॅसपासून तयार होणारे इको प्लायवूड फर्निचर उद्योगात प्रभावी ठरले. वृक्षतोडीला यामुळे आळा बसण्यास मदत झाली. सहकाराच्या आधुनिक रूपाने निसर्गाशी समरस होण्याचा हा एक मार्ग दिला आहे. नागरी सहकारी बॅंकांनी नगर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नोकरीच्या शोधातील मोठ्या गरजू वर्गाला या बॅंकांनी व्यवसाय-उद्योगासाठी अर्थसाह्य देऊन उपजीविकेचे साधन मिळवून दिले आहे. सहकाराच्या या स्वरूपाने अनेक तरुणांना स्वयंपूर्ण बनविले आहे. नगर अर्बन बॅंक, शहर सहकारी बॅंक, मर्चंट्‌स बॅंक, प्रवरा बॅंक व अन्य नागरी बॅंका जिल्ह्याच्या विकासाच्या भागीदार ठरल्या आहेत. पगारदार पतसंस्था व नागरी पतसंस्था मिळून संस्थांनी उत्तम पतनिर्मिती केली. कष्टाच्या इच्छाशक्तीला आर्थिक पाठबळ देणाऱ्या पतसंस्था म्हणजे गावोगावच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. यातून हातगाडीवाले, टपरीधारक, मासेमारी, हॉटेल, आदी व्यवसायांना दिलासा मिळाला. यांच्या परस्पर पूरक भक्कम व्यवहाराने या संस्थासुद्धा सक्षम झाल्या.

 

 

भरत वेदपाठक 
उपसंपादक 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)