माध्यमांना मसाला पुरवण्याचे काम मोदीच करत होते- शिवसेना

मुंबई : ‘इतक्या मोठ्य़ा देशात एक-दोन बलात्काराच्या घटना घडणारच. प्रसिद्धी माध्यमांनी त्याचा इतका बाऊ का करावा?’, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे मंत्री संतोष गंगवार यांनी केले आहे. गंगवार यांच्या वक्तव्याचा आणि प्रसारमाध्यमांना मसाला न पुरविण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज सामनातून चांगलाच समाचार घेतला आहे.

माध्यमांना मसाला देऊ नका असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, पण २०१४ पर्यंत माध्यमांना लोणची, मसाले व पापड पुरवूनच ‘भाजप’ने स्वतःची खिचडी पकवली. त्यामुळे मसाल्याची बात भाजपने करावी याची गंमत वाटते. भाजपचे अनेक पुढारी व मंत्रीदेखील तोंडास येईल ते बोलत असतात, पण त्यांनी ही प्रेरणा आमच्या पंतप्रधानांपासूनच घेतली असावी. कालपर्यंत प्रसारमाध्यमांना मसाला पुरवण्याचे काम मोदी करीतच होते, मात्र आता प्रसारमाध्यमांना राहुल गांधी व इतरांची लोणची, मसाले बरी वाटू लागली आहेत. संतोष गंगवारसारखे मंत्री जे बोलतात तो पक्षाचा आतला आवाजच असतो. हा आतला आवाज अधूनमधून बाहेर पडत आहे इतकेच.

काय आहे सामना संपादकीय-

‘तोंड आवरा’ असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी स्वपक्षाच्याच आमदार-खासदारांना दिला आहे. तोंडास लगाम घालण्याच्या सूचना याआधीही मोदी यांनी भाजपच्या आमदार-खासदारांना दिल्या होत्या. संसदीय पक्षाच्या बैठकीतही त्यांनी अनेकदा अनेकांची कानउघाडणी केली आहे, पण त्या ‘मोदी’ मंत्राचा उपयोग झाला नाही व अनेक जण तोंडास येईल ते बोलत राहिले. मोदी मंत्रिमंडळातील एक मंत्री संतोष गंगवार यांनी आता ‘बलात्कार’ प्रकरणात जे महनीय विचार मांडले आहेत ते धक्कादायक आहेत.

२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी राज्याचे त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीही अशीच जीभ घसरली होती. ‘इतने बडे शहर में ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है’ या त्यांच्या विधानावर एकच काहूर माजले व भारतीय जनता पक्षाने तर पाटलांना पळता भुई थोडी केली. शेवटी पाटील यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष गंगवारांचा गुन्हा त्यापेक्षादेखील गंभीर आहे. तरीही ते मंत्रीपदावर चिकटून आहेत व महिलांचा हा असा अपमान केल्याबद्दल त्यांचा राजीनामा कोणी मागितलेला नाही. फक्त ‘तोंड आवरा’ इतकाच महत्त्वाचा सल्ला मिळाला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)