माथेफिरु प्रियकराने 11 तासांपासून मुलीला फ्लॅटमध्ये डांबले

भोपाळ : माथेफिरूने भोपाळमध्ये तरुणीला एकतर्फी प्रेमातून फ्लॅटमध्ये कैद केलं आहे. रोहित नावाच्या या तरुणाची संबंधित मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा आहे. मुलीची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर या तरुणाने कात्रीने हल्ला केला. हा तरुण फ्लॅटमधून व्हिडीओ कॉलिंगने बातचीत करत आहे.

पोलिसांना अजूनही फ्लॅटमध्ये जाता आलेले नाही. तरुणाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी तरुणाला समजावून सांगून मुलीला सोडण्याची विनंती केली, मात्र तो कुणाचेही ऐकायला तयार नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. भोपाळमधील मिसरोद भागातील ही घटना आहे. हा तरुण मनोरुग्ण असल्याचेही बोलले  जाते. सकाळी सहा वाजता तो फ्लॅटमध्ये घुसला आणि त्याने आतून कडी लावली. म्हणजे गेल्या अकरा तासांपासून त्याने तरुणीला ओलीस ठेवले आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण उत्तर प्रदेशमधील अलीगडचा राहणारा आहे. शिवाय त्याने पत्रकारितेचे शिक्षण केलेले असून तो मुंबईत मॉडेलिंग करतो. तरुणीला मॉडेलिंग आणि सिनेमात काम देण्याचे स्वप्न दाखवत तो तिला मुंबईला घेऊन गेला. मात्र तरुणीला वास्तव समजताच ती भोपाळला आपल्या घरी माघारी परतली.

दरम्यान, याच वर्षी 27 फेब्रुवारी रोजी रोहित नावाच्या या तरुणाने तरुणीचं अपहरणही केलं होतं. जबरदस्तीने तो घरात घुसला आणि तरुणीला घेऊन गेला. पोलिसांनी मुलीची सुटका करुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र पुन्हा एकदा या तरुणीने तरुणीला त्रास देणं सुरु केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)