माथाडी कामगारांचे झंझावाती नेतृत्व : इरफान सय्यद

पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी. माथाडी कामगार हा कष्टकऱ्यांपैकी एक महत्त्वाचा घटक. कामगार नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना ताठ मानेने जगायला शिकवले. मात्र, त्यांच्या पश्‍चात माथाडी कामगार चळवळीत गुंडप्रवृत्तीच्या काही नेत्यांचा शिरकाव झाला. त्याचा फटका पिंपरी-चिंचवडनगरीलाही बसला. आठ-दहा वर्षापूर्वी औद्योगिक क्षेत्रांसह बांधकाम, शॉपिंग मॉल आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रांत माथाडी संघटनांची दादागिरी आणि गुंडगिरी वाढत चालली होती. माथाडी कामगारांच्या नावाखाली हे उद्योग सुरू असताना त्यांना कुणीच वाली उरला नव्हता. अशा परिस्थितीत माथाडी कामगारांसाठी इरफान सय्यद नावाचा आशेचा किरण उगवला. त्यांनी आपल्या कृतीतून माथाडी कामगार नेत्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. महाराष्ट्र मजदूर संघटनेची स्थापना करत शहरातील माथाडी कामगारांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. साद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाज घटकांसाठी ते सामाजिक उपक्रम राबवत आहेत. मा फलेषु कदाचनफ म्हणत कामगार, सामाजिक, शैक्षणिक अन्‌ राजकीय क्षेत्रातही त्यांचे भरीव कार्य सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडला कामगार चळवळीचा मोठा इतिहास आहे. मात्र, माथाडी कामगार या चळवळीपासून कोसो दूर होता. साधारणतः दहा एक वर्षापूर्वी काही कामगार नेत्यांनी माथाडी कामगारांचे नेतृत्व केले. मात्र, माथाडी कामगारांसाठी काम करण्याऐवजी त्यांची दादागिरी, गुंडगिरी चर्चेत राहिली. कष्टकरी कामगार पंचायत, माथाडी कामगार संघटना अशा अनेक संघटनांमध्ये माथाडी कामगार न्यायाच्या अपेक्षेने विखुरले गेले. एका छताखाली संघटीत नसल्याने त्यांना न्याय, हक्क मिळवून देताना अडचणी येत होत्या. जेथे माथाडी संघटनांचे नेतेच बदनाम तेथे आम्हाला वाली कोण, असा सवाल माथाडी कामगारांमधून व्यक्त होत होता. मात्र, एखाद्या ओसाड रानात कुठेतरी हिरवागार अंकुर फुटावा, असे इरफान सय्यद यांचे नेतृत्व उभारीला येवू लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र मजदूर संघटनेची मुहूर्तमेढ…
निगडीतील यमुनानगर येथील रहिवासी असलेले इरफान सय्यद यांचा जन्म 17 जून 1983 रोजी झाला. त्यांचे वडील खुर्शिद हे व्यावसायिक असल्याने कुटुंबाची परिस्थिती मध्यम स्वरूपाची होती. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर दुचाकीचे दालन त्यांनी सुरू केले. हळूहळू हॉटेल, बांधकाम क्षेत्रातही चंचूप्रवेश झाला. आपला व्यवसाय सांभाळायचा प्रगतीचे एक-एक टप्पे ओलांडायचे एवढे साधे सरळ ध्येय समोर ठेवून इरफान सय्यद भविष्याची वाटचाल करु शकले असते. मात्र, ते व्यावसायिक म्हणून काम करत असताना त्यांच्या हाताखाली तसेच शहरात राबणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी तळमळ त्यांना पाहवत नव्हती. कष्टकरी कामगारांच्या संघर्षाची अनेक आंदोलने, लढे जवळून पाहताना हळूहळू त्यांच्यातील कामगार नेतृत्व उभारी घेत होते. सर्वच कष्टकरी वर्ग पिचलेला आहे. यात नेमकी कोणाला साथ द्यायची, कोणाच्या पाठिशी उभे रहायचे, हा प्रश्‍न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर पोटासाठी डोईवर भार वाहणाऱ्या माथाडी कामगारांसाठी काम करण्याचा त्यांनी निश्‍चय केला. तेथून महाराष्ट्र मजदूर संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.

…अन्‌ माथाडी एका छताखाली एकवटले
सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहरातील माथाडी कामगार डोळ्यासमोर ठेवून इरफान सय्यद यांनी काम सुरू केले. 2006 साली महाराष्ट्र मजदूर संघटनेची स्थापना झाली. तेथून खऱ्या अर्थाने शहरातील माथाडी कामगारांना दिशा मिळाली. विविध संघटनांमध्ये विखुरले गेलेले तसेच असंघटीत असलेले माथाडी कामगार महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या छताखाली एकवटले. केवळ माथाडी कामगारच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांसाठीही विविध उपक्रम राबवायला सुरूवात झाली. गुणवंत कामगार पाल्यांच्या गौरवापासून ते शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून दिले जात आहे. माथाडी कामगार संघटनेच्या विविध योजना तळागाळातील कामगारांपर्यंत पोहचविल्या जातात. त्याबाबत त्यांच्या प्रबोधन केले जाते. वेळप्रसंगी शासकीय निधीची वाट न पाहता पदरमोड करुन इरफान सय्यद यांनी कामगारांना मदतीचा हात दिला आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या पाठिशी सहकार क्षेत्राचा भक्कम आधार उभा केला आहे. पिंपरी-चिंचवड मधील कामगारांचे संघटन केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील तळेगाव, चाकण, जुन्नर, मंचर, ओतूर, आळेफाटासह सातारा, सांगली, रोहा, माणगाव येथील माथाडी कामगारांचे नेतृत्वही महाराष्ट्र मजदूर संघटनेने स्विकारले आहे. संघटनेचा दिवसें-दिवस कार्यविस्तार वाढत आहे. सुमारे अडीचशे कंपन्यांमधील 20 हजाराहून अधिक कामगार महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सभासद आहेत.

बांधकाम कामगार क्षेत्रातही उडी
माथाडी कामगारांसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेकडून सुरू असलेले कार्य पाहून बांधकाम कामगारांसाठी काम करण्यासाठी इरफान सय्यद यांना त्यांच्या मित्र परिवारासह इतरांनी आग्रह धरला. इरफान सय्यद यांना हा आग्रह टाळता आला नाही. माथाडी, मापाडी, बांधकाम व जनरल कामगारांचे नेतृत्व हळूहळू इरफान सय्यद यांच्याकडे आले. तब्बल दीड हजार बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे शासनाच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. वयाच्या अवघ्या पस्तीशीमध्ये कामगार क्षेत्रात त्यांनी स्वतःचा दबदबा तयार केला आहे. शहरातच नव्हे तर शहराबाहेरील कामगार नेत्यांच्या पंक्तीत कधी स्थान मिळाले, याची कल्पना खुद्द इरफान सय्यद यांनाही नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, एवढेच त्यांना ठावूक आहे. कामगारांसमोर अन्याय, अन्याय ओरडायचे आणि पडद्याआड व्यवस्थापनाच्या हातचे बाहुले बनणाऱ्या कामगार नेत्यांपैकी इरफान सय्यद नक्कीच नाहीत. कामगारांचे प्रश्‍न सामोपचाराने सोडविण्याकडे त्यांचा कल असतो. कामगारांचा विकास, हाच ध्यास असल्याने कामगारांच्या हिताला बाधा पोहचणाऱ्या गोष्टींचा त्यांना तिटकारा आहे. त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांनी आम्हाला ताठ मानेने जगायला शिकवले तर इरफान सय्यद यांनी आम्हाला निधड्या छातीने लढायला शिकवले, असे माथाडी कामगार सांगतात. माथाडी कामगारांचे विलिनीकरण असो अथवा कामगार कायद्यातील प्रस्तावित बदल याविरोधात इरफान सय्यद यांचा लढा सुरू आहे.

समाजकारणासाठी राजकारण
एखादं झाड फुललं, बहरलं की त्याखाली आपसूक लोक विसाव्याला येतातच. इरफान सय्यद यांनाही अनेक राजकीय पक्षांकडून प्रवेशाच्या ऑफर आल्या. मात्र, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना इरफान सय्यद लहानपणापासून दैवत मानतात. बाळासाहेबांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर आहे. त्यामुळे शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्तुत्व बहरत आहे. केएसबी चौकातील ग्रेडसेपरेटरला कै. अण्णासाहेब पाटील यांचे नाव देण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. मजूर अड्ड्याच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. इंधन दरवाढात त्यांनी आंदोलन केले. कष्टकरी कामगारांच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी थेरगावात कामगार मेळावा घेतला. आमदार नरेंद्र पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलचा धुव्वा उडवत 25 वर्षानंतर माथाडी कामगारांच्या पतसंस्थेची धुरा शिवसेनेच्या हाती दिली. पुणे जिल्ह्यातील ओतूर, जुन्नर, आळेफाटा, मंचर तसेच नारायणगाव बाजार समितीवरील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढत शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या झेंड्याखाली माथाडी कामगारांना संघटित केले. भोसरी विधानसभा मतदार संघातील मुस्लीम समाजातील राजकीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांची भविष्यातील राजकीय भूमिका गुलदस्त्यात असली तरी समाजकारणावर आधारीत राजकारण असायला हवे, असे ते ठामपणे सांगतात. एकीकडे कामगार व राजकीय क्षेत्रात इरफान सय्यद यांच्यातील लढवय्ये नेतृत्व दिसत असताना दुसरीकडे साद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित घटकासाठी त्यांचे सुरू असलेले काम पाहता त्यांच्यातील संवेदनशील कार्यकर्ता दिसून येतो. इरफान भाई तरुणांना संदेश देताना सांगतात, मेहनत इतनी खामोशी से करो के तुम्हारी कामयाबी शोर मचा देफफ. यातच त्यांच्याही यशाचे गमक दडलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)