माथाडी कामगारांचा 27 मार्च रोजी विधीमंडळावर मोर्चा

पुणे- माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांबाबत काढण्यात आलेले आदेश मागे घेण्याचे आश्‍वासन राज्य सरकारच्या प्रतिनिधींमार्फत देण्यात आले होते. परंतु शासनामार्फत पाठविण्यात आलेल्या मिनिटसमध्ये आश्‍वासनांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. दरम्यान, शासनाने दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता करावी, राज्यात नोंदणीकृत हमालांना दमदाटीचे सुरू करून राजकीय पक्षाची संघटनेत सुरू असलेली घुसखोरी थांबवावी, या मागण्यांसाठी माथाडी, सुरक्षारक्षक कामगार बचाव कृती समितीच्या वतीने 27 मार्च रोजी मुंबईत विधनासभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य सरकारने माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी आणि कायद्यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या नावावर 36 माथाडी मंडळे एकत्र करून एकच माथाडी मंडळ गठीत करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती केली होती. त्याच पध्दतीने सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांबाबत नवीन आदेश काढून मंडळाचे अस्तित्व धोक्‍यात आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. या सर्व धोरणांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांनी लाक्षणिक बंदही पुकारलेला होता. या बंदला प्रतिसाद देत शासनाने माथाडी महामंडळासमवेत बैठक घेऊन दोन्हीही अद्यादेश रद्द करु असे, आश्‍वासन दिले होते. मात्र, हे आश्‍वासन पाळण्यात आले नाही, याविषयी डॉ. आढाव म्हणाले, माथाडी कामगार, सुरक्षारक्षकांच्या विरोधात दिलेले आदेश मागे घेण्याच्या दृष्टीने सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. सरकार जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचे काम करत आहे. पक्षाच्या वतीने कायदा मागे घेण्याचे आश्‍वासन दिले जाते. प्रत्यक्षात सरकार मात्र यामधून माघार घेत आहे. परिणामी, सरकारकडून दुटप्पी धोरणाचा स्विकार करण्यात येत आहे. यंदा हे माथाडी कायद्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. राज्यातील माथाडी कायदा हा प्रभावी ठरला आहे. देशाच्या कामगार खात्याच्या सचिवांनी राज्यात येऊन कायद्याचा अभ्यास केला. हा कायदा देशात राबविण्याचा विचार त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार हा कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे, हे दुर्दैवी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)