मात दुष्काळावर…

डॉ. नीलम ताटके 

“शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे’ परंतु तरीही समाजातले अनेक घटक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, तमाशा कलावंतांची मुले, एकल पालक असलेल्यांची मुले इत्यादींचा समावेश होतो. यात ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या शेतकऱ्यांचाही समावेश आहेच. त्यांना दरवर्षी कराव्या लागणाऱ्या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. अशा मुलांच्या शिक्षणासाठी निवासी शाळाच असणे आवश्‍यक आहे. असा विचार करून दीपक नागरगोजे आणि सौ. कावेरी नागरगोजे यांनी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्‍यातील आर्वी येथे शांतिवन नावाची संस्था सुरू केली. ही निवासी शाळा आहे. या निवासी शाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. 

ही संख्या दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे; हे दिपक नागरगोजे यांच्या लक्षात आले. पण शांतिवनमध्येच पाणी नव्हतं. ही मोठी अडचण होती. त्यासाठी मूळ प्रश्‍नालाच हात घालायचे ठरले. पुण्याचेच सुरेश जोशीकाका आणि त्यांची पत्नी सौ. सुलभाताई यांनी हे आव्हान स्वीकारले आणि पुण्यातले उद्योगपती आणि सुराग ट्रस्टचे शशिकांत चितळे यांच्या आर्थिक सहाय्याने शांतिवनमध्ये शेततळं तयार करून पाण्याचा प्रश्‍न मिटवला. यातूनच दिपक नागरगोजे आणि सुरेश जोशीकाका यांनी “दुष्काळमुक्त शांतिवन ते दुष्काळमुक्‍त आर्वी’ हे आव्हान स्वीकारलं. आर्वीचा पाऊस मुळातच कमी पडणारा आणि बेभरवशाचा. कणखर खडकाने व्यापलेली जमीन, तीव्र उताराचा भाग, झाडे नसल्याने उजाड झालेली माळराने आणि पावसाची कमतरता यामुळे दर दोन तीन वर्षांनी दुष्काळ ठरलेलाच. तीव्र उतार असल्यामुळे पडलेलं पाणी वाहून जात असे आणि विहरी खणायच्या म्हटल्या तर जमिनीत चार-पाच फुटावरच पाषाण असल्याने पाणी मुरत नसे. त्यामुळे पाणी साठवायचा प्रयत्न करूनही काही होत नव्हतं. पण दुष्काळमुक्त आर्वी हे आव्हान स्वीकारल्यावर गावातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला. नदी, ओढे, नाले असे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत, जमिनीवरचे खडक याचे प्रकार तपासले. पाणलोटाचा अभ्यास केला. शांतीवनला तळ्याचा, नदी परिसरातल्या विहिरींचा फायदा झाला. भाजीपाला, अन्नधान्य त्यांनी स्वतः पिकवलं.

शांतिवनमध्ये आजमितीस 650 पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत आहेत.


 
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने शांतिवनला 40 लाख रुपये देणगीदाखल दिले आहेत. 


शांतिवनची जलसंधारण चळवळ अत्यंत यशस्वी झाली आहे. विहिरी तळी तुडुंब भरल्या आहेत. 


5 कोटी लिटर्सपेक्षाही अधिक क्षमतेचे शेततळे बनवण्यात आलेले आहे. 

या कामात यश आल्याने दिपक नागरगोजे आणि सुरेश जोशी काका यांचे मनोबल, हुरूप वाढला आणि अशाच प्रकारचं काम गावासाठी करायचं हे ठरवलं गेलं. यासाठी श्री. सुरेश जोशी यांनी अर्थसहाय्य केलं. नाम फाउंडेशननेसुद्धा या कामी मदत केली. गावातून जाणाऱ्या नदीचे शास्त्रोक्त खोलीकरण केले, नाला खोलीकरण केले. आवश्‍यक तिथे बंधारे बांधून पाणी अडवले, जमिनीत मुरवले. खरं तर पाणी जिरण्याची प्रक्रिया खूप संथ होती. पण तरीही जिद्द न सोडता वाहून जाणारे पाणी जमिनीत साठवले. शेतकऱ्यांनी शेततळी घेणं आणि बारमाही शेती करणं यासाठी दीपक नागरगोजे यांचे प्रयत्न चालू होते. ते म्हणाले, “शेतकरी स्वतःच्या शेतातली जमीन शेततळ्यासाठी द्यायला तयारच नव्हते. त्यासाठी त्यांचं मतपरिवर्तन करण्यात काही काळ जावा लागला.”

एका शेतकऱ्याने शेततळं घेतलं त्याला संस्थेने आर्थिक सहाय्य दिलं आणि त्याची शेती बारमाही सुरू झाली. एका वर्षात अनेक पिके घेता यायला लागली. मजुरी करण्यासाठी बाहेरगावी जाणं बंद झाले. नगदी पिके घेता यायला लागली आणि त्या पिकांना थेट वाशी मार्केटपर्यंत बाजारपेठ मिळाल्याने हातात पैसा खेळू लागला. यापूर्वी पाण्याच्या अभावामुळे शेतकरी एकच पीक, ते सुद्धा कापसाचे घेत. बाकीे 6 ते 8 महिने इतरांच्या शेतात मजुरी करत त्यामुळे कुटुंबाला स्थैर्य नव्हतं. आजारी माणसाच्या औषधपाण्यासाठीही कर्ज काढावे लागे. कुटुंबातील लहान मुलांना सांभाळण्यासाठी मुलींना शाळा सोडावी लागे. परंतु स्थलांतर थांबल्याने हा प्रश्‍नही सुटला.

एका शेतकऱ्याने म्हटलं, “आम्हाला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की, आमच्या शेतात पाणी येईल आणि आम्ही बारमाही शेती करू, आज खूप बरं वाटतंय की आमच्या पुढच्या पिढ्यासुद्धा आता शेतीच करतील.” पिण्याच्या पाण्याचे हाल तर भयानक होते. गावात अनियमीतपणे येणारा टॅंकर त्यामुळे होणारी मारामारी, भांडणं परंतु यातून पर्याय काहीच निघत नव्हता. कुटुंबातली लग्न बाहेरगावी जाऊन करावी लागत होती. परंतु नदीचे रुंदीकरण, खोलीकरण यातून हातपंपांना मार्च, एप्रिल महिन्यातही धो-धो पाणी आहे. शेतकरी शेतीला ठिबक सिंचनाचा वापर करत आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यातही शेततळ्यात भरपूर पाणी आहे. शेतात डाळींब, मोसंबी, चिकू, टरबूज, खरबूज अशा फळबागा लावल्या आहेत. यासाठी त्यांना भगवान भांगे आणि सुरेश जोशी यांनी मार्गदर्शन केले आहे. आणि करतही आहेत.

दुष्काळावर मात करणं ही सोपी गोष्ट नाही. परंतु “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ हेही खोटं नाही. यातूनच शास्त्रोक्त पद्धतीने पाणी साठवणं, जिरवणं हे काम सुरू झालं आणि पाहता पाहता गावाचा कायापालट झाला. कर्ज फेडू शकू असा आत्मविश्‍वास झाल्याने शेतकरी आता आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)