मातृभाषेमुळे व्यक्तिमत्त्व विकास

डॉ. न. म. जोशी : परिषदेत रंगल्या मसाप गप्पा

पुणे – मराठीतच स्वाक्षरी करणे, आपल्या मुलांना मराठी माध्यमातच घालणे, नियमितपणे मराठी पुस्तकांची खरेदी करून त्याचे वेळोवेळी वाचन करणे, मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी कुटुंबातील कार्यक्रमापासून सार्वजनिक कार्यक्रमापर्यंत स्वतःच्या उपस्थितीने विचाराने मराठी जपणे या गोष्टी आवश्‍यक आहेत. मातृभाषा हाच व्यक्तिमत्त्व विकासाचा मूलस्त्रोत आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या “मसाप गप्पा’ कार्यक्रमात डॉ. विनीता आपटे यांनी डॉ. जोशी यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते. जोशी म्हणाले, मराठी मातृभाषा असणाऱ्यांनी भाषेच्या स्त्रोतांची जाणीवपूर्वक जोपासना केली तरच उत्तम सुसंस्कृत नागरिक देशाला मिळतील. मराठीच्या भवितव्याबाबत गळे काढणाऱ्यांनी स्वतःपासून भाषेच्या भवितव्याची उभारणी करावी. मातृभाषा हे जीवनाचे रेशनकार्ड असून इंग्रजी हे पॅनकार्ड आहे. तर हिंदी हे तुमचे आधारकार्ड आहे. साहित्य संमेलनात घडलेले अनेक गंमतशीर प्रसंग त्यांनी यावेळी सांगितले. वयाची 82 वर्षे पूर्ण केल्याबद्दल डॉ. न. म. जोशी यांचा परिषदेतर्फे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)