माण तालुक्‍यातील 66 गावांमध्ये तुफान आलंया…

माण तालुक्‍यातील गावागावात पानी फाऊंडेशन च्या स्पर्धेचे अशा प्रकारचे श्रमदानाचे तुफान आले आहे. (छायाचित्र : नागनाथ डोंबे)

म्हसवड – राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने चार्ज झालेली जनता राज्यभरातील गावोगावी श्रमदान करून “पाणी अडवा पाणी जिरवा’चा संकल्प करत आहे, या स्पर्धेच्या निमित्ताने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी माणची जनता पुढे सरसावली असून माण तालुक्‍यातील गावागावात श्रमदानाचे काम जोमात सुरू आहे. श्रमदान करताना “अन्न बुडबुडे निल गुडगुडे’ “दुष्काळ डिच्क्‍यांव डिच्क्‍यांव डिच्क्‍यांव’चा नारा देत असल्याचे चित्र दिसत आहे.

दुष्काळाचे पुन्हा तोंड पहावयास लागू नये याकरता माण तालुक्‍यातील जनतेने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी होत या संस्थेचे ब्रीद वाक्‍य आत्मसात करून मोठ्या उत्साहात गावोगावी नागरीक श्रमदान करू लागले आहेत. माण तालुक्‍यात सध्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे धुमशान सुरु असून या स्पर्धेत आपल्याच गावाचा नंबर यावा व आपले गाव पाणीदार व्हावे, यासाठी गावागावातील जनता श्रमदानाच्या कामाला झपाटून गेली आहे. हे चित्र जवळपास सर्व तालुक्‍यांत दिसू लागल्याने उर्वरीत जनताही या गावकऱ्यांसोबत श्रमदानाला जाऊ लागली आहे, त्यामुळे श्रमदानासाठी चला असे आता कोणाला सांगावे लागत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

-Ads-

8 एप्रिल पासून पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा संपूर्ण राज्यात सुरु झाली आहे. स्पर्धेत राज्यातील 24 जिल्हे सहभागी झाले असून या 24 जिल्ह्यातील 75 तालुक्‍यात सध्या मोठ्या प्रमाणावर वॉटर कप स्पर्धेचे काम सुरु आहे, त्यामुळे राज्यभरात सुमारे पाच हजार नऊशे गावांमध्ये सध्या वॉटर कप स्पर्धेचे तुफान आले असून माण तालुक्‍यातील 66 गावांमध्ये याचा गजर सुरु आहे. आपल्या गावांत पडणाऱ्या पावसाचा थेंब ना थेंब आपल्याच गावात अडवून तो आपल्या जमिनीत मुरवायाचा ही साधी संकल्पना घेऊन पानी फाऊंडेशनने संपूर्ण राज्यात वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले आहे मात्र, हे काम करीत असताना जवळपास 70 टक्के काम हे श्रमदानातुन झाले पाहिजे ही एक अट्ट आहे.

त्यामुळे सध्या श्रमदानाचे तुफान गावोगावी उठलया, या स्पर्धेत राज्यात प्रथम येणाऱ्या गावाला 75 लाख रुपये, द्वितीय येणाऱ्या गावास 50 लाख रुपये तर तृतीय क्रमांकाने येणाऱ्या गावास 40 लाख रुपयांच्या रोख रकमेचे बक्षीस देण्यात येणार आहे, तर स्पर्धेतील सहभागी गावाचा तालुका स्तरावर जरी प्रथम क्रमांक आला तरी त्या गावाला 10 लाख रुपयांचे रोख रकमेचे बक्षीस दिले जाणार असल्याने या स्पर्धेत सातारा जिल्ह्यात माण तालुक्‍यातील सर्वाधीक 66 गावे सहभागी झाली आहेत, गतवर्षी झालेल्या वॉटरकपची स्पर्धेत माणच्या अवघ्या 32 गावांनी सहभाग घेतला होता त्यावेळी या स्पर्धेचे महत्व येथील जनतेला फारसे वाटले नाही, त्यामुळे या तालुक्‍यातील बिदाल, अनभुलेवाडी, यमलरवाडी, पवारवाडी, भोसरे, जायगांव ही गावेच फक्त पाणीदार बनली त्यामुळे त्या गावचा दुष्काळ हटला तर ज्या गावांत अवघे 30 टक्के काम झाले ती गावे टॅंकरमुक्त झाली, हे चित्र संपूर्ण माण तालुक्‍याने पाहिले व अनुभवले असल्यानेच यंदा होत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत माण तालुक्‍यातील 66 गावांनी सहभाग घेतला आहे. गतवेळच्या स्पर्धेमुळे 10 हजार कोटी लिटर पाण्याची साठवणुक झाल्याने अनेक गावे पाणीदार बनली तर अनेकांच्या विहिरींचे पाणी चांगलेच टिकल्याने त्याचा फायदा शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळेच यंदा होत असलेल्या या वॉटर कपच्या स्पर्धेत माणमधून सर्वाधिक गावे सहभागी झाली आहेत, या स्पर्धेत सहभागी होताना प्रत्येक गावाने आपले गाव पाणीदार बनवण्याचा संकल्प केला असून त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरु आहे.

दहा दिवसानंतरही उत्साह कायम 
सदर स्पर्धा सुरु होऊन जवळपास 10 दिवस लोटले असून आता स्पर्धेतील सहभागी गावांचा उत्साह चांगलाच दुणावला आहे. रोज सकाळी किमान दोन तास प्रत्येकजण मनापासून श्रमदान करीत असल्याचे चित्र आहे, पुर्वी श्रमदानासाठी अनेकवेळा अधिकारी अथवा एखाद्या सेलीब्रेटीला त्या ठिकाणी बालावून लोकांना प्रोत्साहीत करावे लागत होते, यंदा मात्र चित्र काहीसे बदलले आहे. स्पर्धेमुळे गावचा काय फायदा होतेय हे गावकऱ्यांना चांगलेच समजले असल्याने गावोगावी उस्फूर्तपणे लोक हाती पाटी व खोरे घेऊन श्रमदानासाठी जात आहेत, तर या श्रमदानासाठी गावातील बाहेरगावी असलेल्या व्यक्तींनाही गावकरी आग्रहाने गावाला बोलावून घेत आहेत. त्यामुळे गावोगावी श्रमदानाचे अगदी धुमशान सुरु असल्याचे दिसून येते.

नोकरदारही रजा टाकून श्रमदानाच्या कामावर 
या स्पर्धेत आपल्या गावाचा नंबर यावा यासाठी त्या गावच्या अधिकाऱ्यांनी चांगलीच कंबर कसली असून ते या कामासाठी रजा टाकून गावाकडे आले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढत आहे. या स्पर्धेत किमान 70 टक्के काम हे श्रमदानातून करावयाचे असल्याने जो-तो हाती पाटी, खोर व टिकाव घेऊन श्रमदानाच्या ठिकाणी पोहचत आहे. त्यामुळे एखाद्या मानवी साखळी प्रमाणे हे काम सुरु असल्याचे चित्र असून “साथी हात बटाना एक अकेला थक जाये तो मिलके बोज उठाना’ असाच काहीसा सुर गावागावातील सुरु असलेल्या श्रमदानाच्या ठिकाणी ऐकू येऊ लागला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)