माण तहसील कार्यालय परिसराला अवकळा

स्वच्छतागृहांची दुरवस्था असल्याने महिलांची गैरसोय

गोंदवले, दि. 11 (प्रतिनिधी) – तालुक्‍याचं मुख्यालय असलेल्या माण तहसील कार्यालयात स्वच्छतागृह नसल्याने याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे. अनेक वर्षांपासूनची अवकळा तहसीलदार घालवणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
माण तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या दहिवडी येथील तहसील कार्यालयात नेहमीच कामानिमित्त लोकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. या कार्यालयाच्या आवारातच पोलीस ठाणे, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू, संजय गांधी योजना, पोलीस ठाण्याचे कारागृह, निवडणूक शाखा अशी कार्यालये असून हा परिसर समोरच्या बाजूने लखलखीत दिसतो. मात्र, येथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसल्याने विषेशतः महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयात काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कर्मचारीसुध्दा या त्रासाला वैतागले असून या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या काही महिला कर्मचारी लगत असणाऱ्या मोजणी कार्यालयातील स्वच्छतागृहाचा वापर करतात. सर्वसामान्य लोकांसाठी तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजुला स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. परंतु, येथे घाणीचे व दुर्गंधीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळते. पुरुषांच्या स्वच्छतागृहात चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत. या शासकीय कार्यालयातील शिपाई या परिसराची स्वच्छता करतात की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. गैरसोयींमुळे येथे येणाऱ्या महिलांना तासन्‌तास त्रास सहन करतच ताटकळत थांबावे लागते. नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार बी. एस. माने यांनी या परिसराची अवकळा घालवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी याठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)