माणूस : पर्यावरणाला लागलेली कीड

एक नदी होती. नेहमी खळखळत वाहत असायची. वरूण राजा धारा बरसून तिला नेहमी खुश ठेवायचा. त्याने दिलेल्या त्या धारा ती गोळा करायची आणि सागराला नेऊन द्यायची. तो दुधाळलेला समुद्र मात्र उन्हात वाफाळायचा. वरूण त्याला गोळा करून नदीला बिलगल्याचा आनंद मानायचा. पाहिलं तर सगळं प्रकरण त्यांच्या मानण्यात होत. वरूण राजाचं प्रेम नदीला पित्याप्रमाणे होते तर समुद्राकडे धावून देखील त्याला ती फक्त एक वेडी मुलगी वाटायची. सोडून दिलेल्या बाष्पाचा ना त्याने कधी विचार केला ना कधी त्याला नदी आणि वरूण राजाशी आपुलकी वाटली. आयुष्यभर तो खाराच राहिला. ह्या सगळ्या मध्ये धरणीमाता सगळ्यांना आधार देऊन होती.

एकदा त्या वरुणाला वाऱ्याने भूल दिली आणि तो खूप दूर जाऊन कोसळला. नदी धारांची वाट पाहत राहिली. शेवटी थकून ती सुकून गेली. समुद्र अजूनही तसाच होता. त्याला तिच्या नसण्याचा काहीही फरक पडला नाही. नदी विचारात पडली. तिच्या अस्तित्वासाठी वरुण राजाला खुश करणे गरजेचे होते. आणि त्यानंतर ती नेहमी धरणीमातेला हिरवे बनवून वरूण राजाला थांबवू लागली. जणू काही त्या तिघांच्यात करार झालेला.

ह्या हिरवळीच्या प्रेमात अनेक जण पडले. माणूस नावाची कीड त्यावर अफाट पसरली. नदीला शोषून घेऊ लागली. हिरवळीचा नाश करू लागली. वरूण राजा थांबेनासा झाला आणि नदी हतबल झाली. तिचं अस्तित्व धोक्‍यात तर आलंच पण सजवलेल्या धरतीचं विद्रुप रूप पाहणं सुध्दा वरूण राजाला असह्य होऊ लागलं. त्या दोघांनी केलेला प्रत्येक प्रयत्न त्या किडीच्या हवास्याचा बळी ठरला. किडीचा नाश करण्याचा वरुण राजाचा आणि नदीचा संकल्प धरणी मातेने आपल्या प्रेमाने थांबवला. ती त्या किडीच्या प्रभावाखाली आजही कुजत आहे. वरुण राजा आणि नदी धरणी मातेच्या ह्या अजाणतेपणाकडे पाहत आतून धुमसत आहेत. कधी ना कधी तरी नाश हा होणारच! पण हे त्या किडीला नक्की कळून आलंय का?

– अनिकेत मारणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
34 :thumbsup:
30 :heart:
0 :joy:
22 :heart_eyes:
8 :blush:
4 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)