माणसामधील माणुसकी हीच खरी संपत्ती

निवृत्तीनगर, दि. 27 (वार्ताहर)- वास्तवाचे दर्शन घ्या सांगू तुम्हा किती डॉक्‍टर, इंजिनिअरनंतर मुलास माणूस बनवा आधी माणसामधील माणुसकी हीच खरी संपत्ती आहे आणि ती स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी ओळखली त्यांनी माणसे कमवत असताना त्या माणसामधील माणुसकी जिवंत केली म्हणून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून एवढे मोठे साम्राज्य उभे राहिले, मोठे होताना जमिनीवर राहून जमिनीवर बसून आकाश मुठीत घेण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. आज कारखान्यातील प्रत्येक कामगार मी कारखान्यात काय काम करतो हे न पाहता मी या कारखान्याचा घटक आहे, असे समजून काम करतो हीच शेठबाबा यांच्या कर्तृत्वाची पावती आहे, असे विचार युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार प्रा. वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
स्व. निवृत्तीशेठ शेरकर व त्यांच्या पत्नी स्व. हिराबाई शेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, माजी आमदार दिलीप ढमढेरे, हभप विठ्ठलबाबा मांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे, भिमाजी गडगे, आशा बुचके, डॉ. सुनील शेवाळे, तानाजी बेनके, माउली खंडागळे, गुलाब पारखे, राजश्री बोरकर, नंदकुमार शेरकर, नेताजी डोके, कारखान्याचे आजी माजी संचालक, तालुक्‍यातील शेतकरी व सभासद वर्ग व सत्यशील शेरकर यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व. हिराबाई शेरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सत्यशील शेरकर यांनी प्रास्ताविकामध्ये साखर कारखाना हा स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे चालला असून आज मितीला साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत आहे. तरीही आपला कारखाना सुस्थितीत असून आपण ऊस उत्पादक शेतकरी वर्गास चांगला भाव देत असल्याचे सांगितले.
प्रा. हंकारे म्हणाले, श्री शिवछत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्याची उभारणी करताना मावळ्यांना संघटित केले. त्यांच्यामध्ये माणुसकी जिवंत करताना स्वराज्य स्थापन करण्याची आग धगधगत ठेवली त्याचप्रमाणे निवृत्तीशेठ शेरकर यांनी कारखाना उभारणीचे स्वप्न पाहिले शेतकरी संघटित केले व कारखान्याची गुढी उभारली सुरुवातीला 1250 मेट्रिक टन उसाची गाळप करणारा कारखाना आज मितीला 5 हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून महाराष्ट्रात नव्हे; तर देशात नाव उंच करतो ही सर्वसाधारण बाब नाही.
माजी आमदार दिलीप ढमढेरे यांनी आजमितीला कारखान्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, ही आनंदाची बाब आहे असे सांगितले. सहकारी कारखाना चळवळीत विघ्नहर कारखाना एक नंबरला असल्याचे सांगून कौतुक करणारे अनेक भेटतील; परंतु आपल्या मर्मावर बोट ठेवून मार्गदर्शन करणारे लोक कमी भेटतात व अशी माणसे आपल्यासोबत ठेवा असा मोलाचा सल्ला सत्यशील शेरकर यांना दिला.
यावेळी उपस्थित्त मान्यवरांनी आदरांजली वाहत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालनलक्ष्मण शेरकर यांनी केले तर उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार मानले.

  • जिल्ह्यातील साखर कारखान्याचे स्थिती पाहता आपला कारखाना अडचण असून सुद्धा त्यातून वाट काढत आहे. शासनाकडून चांगला भाव भेटला तरच आपल्याला चांगले पैसे भेटतील; अन्यथा कारखाना तरी कुठून पैसे आणणार? भविष्यात सरकारची ध्येय धोरणे बदलली नाहीत तर ऊस उत्पादक शेतकरी व कामगार वर्गाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
    तानाजी बेनके, शेतकरी संघटनेचे नेते

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)