माणसं जोडण्याची कला

अश्‍विनी महामुनी

माझे वडील शिक्षक होते. खरं तर ते शिक्षक होते असे भूतकाळात बोलणेही फारसे योग्य नाही. कारण शिक्षकी पेशा सोडून त्यांना काही दशके झाली असली तरी त्यांचे मन आणि वृत्ती अजूनही तीच आहे. ते नेहमी म्हणतात, की माणूस आयुष्यात जी पहिली नोकरी करतो, तिचे संस्कार-सवयी पुढे आयुष्यभर राहतात. हे निदान त्यांच्या बाबतीत तरी खरे आहे. त्यांच्या जमान्यात शिक्षक हा व्यवसाय-पेशा नव्हता. ती एक वृत्ती होते, एक तत्त्व होते आणि हिशोबापलीकडचे होते. ती एक आनंददायी गोष्ट होती. आजही त्यांच्याकडे बघताना, त्यांच्याशी बोलताना ते जाणवल्याशिवाय राहात नाही.

सुरुवातीचे एक दशक शिक्षक म्हणून काढल्यानंतर त्यांनी मायनिंग, स्टील प्लांट, टूरिझम अशा परस्परांशी काडीचाही संबंध नसलेल्या, काहीही साम्य नसलेल्या अनेक क्षेत्रात वावर केला. साम्य असलेच तर ते फक्त माणूस या समान घटकाचे होते. सर्व क्षेत्रात ते माणसे जोडत गेले. पुढे नियमित भेटी झाल्या नाहीत, तरी हा जोड कधी निखळला नाही. सत्तरच्या दशकातील त्यांचे विद्यार्थी त्यांच्या अजूनही संपर्कात आहेत. भेटायला येतात. अनेक उच्चपदस्थ झाले, परदेशात गेले. बरेचजण निवृत्त झाले. तरीही फोन करतात. जिव्हाळ्याने भेटायला येतात. ही नवलाईची गोष्ट वाटते मला. कारण सध्याच्या काळात शाळा सोडल्यानंतर शिक्षक-विद्यार्थी हे नातेही बऱ्याच-बऱ्याच वेळा संपुष्टात आलेले आपण बघतो. त्यांच्या एका विद्यार्थ्याच्या दोन मुली, एम कॉम आणि बी कॉम झालेल्या, गेल्या वर्षी आमच्याकडे कोणत्यातरी कोर्ससाठी सहा महिने राहिल्या होत्या. त्याने फोनवर सांगितले, सर माझ्या मुलींना पुण्यात कोर्स करायचा आहे. जरा चौकशी कराल का? त्यांची चांगली सोय होण्यासाठी. तर हे म्हणाले, मी आहे ना. येऊदे माझ्याकडे आणि त्याने मोठ्या विश्‍वासाने त्याच्या दोन मुलींना आमच्याकडे आणून सोडले. त्याही अगदी घरच्यासारख्या आमच्याकडे राहिल्या. माझ्या आई-वडिलांना त्या आजी-आजोबा म्हणत. आम्हा भावंडांनाही त्यांच्याबद्दल कधी परकेपणा वाटला नाही. शहरातील नातेवाईकांत असणारा वागण्यातील कोरडेपणा, हिशोबीपणा त्यांच्यात शोधूनही सापडला नाही. हे देवाघरचे देणे म्हणावे, तसाच प्रकार हा.

अलीकडेच ते पाचवीत असतानाचे दोन मित्र-एक शाळासोबती आणि दुसरा वर्गमित्र त्यांना भेटले. म्हणजे आम्हा सर्वांनाच भेटले. 1959 सालानंतर त्यांची 2017 मध्ये भेट झाली त्यांची आणि अगदी रोजच भेटत असल्यासारख्या गप्पागोष्टी सुरू झाल्या. एक होता राजेंद्र वसंत टिपणीस नावाचा त्यांचा वर्गमित्र. पाचवीत असताना तो कसा दिसायचा, कसा वागायचा, कसा बोलायचा, कोणत्या बाकावर बसायचा हे सारे त्यांना आठवलेच, पण त्या राजेंद्र वसंत टिपणीसलाही यांच्या संपूर्ण नावासकट सगळे आठवत होते. हे नवलच म्हणायचे. तो त्यांच्या टिपणीस सरांचा मुलगा आहे. वर्गात पहिल्या बाकावर बसणारा. टिपणीस सर त्यांना चांगले आठवतात. त्यांचे बोलणे, शिकवणे आणि त्यांची ती सही…. सारे सारे डोळ्यांसमोर होते. दुसरा गोरखनाथ सदाशिव जोशी. वडील पाचवीत असताना तो दहावीत होता. माझे वडील पाचवीत असताना महाडला त्यांच्या घरात आमचे कुटुंब राहायचे. गोरखनाथची आई कीर्तनकार होती. तिच्या खूप आठवणी सांगितल्या माझ्या 92 वर्षांच्या आजीनेही. माझे फॉरेस्ट खात्यात असलेले आजोबा तेव्हा बदली होऊन महाडला गेले होते.

उतारवयात शाळासोबती त्या काळच्या ताजेपणाने-टवटवीतपणाने भेटल्याचा आनंद काही वेगळाच असतो. अवर्णनीय असतो. अनेक क्षेत्रांत वावरतानाही ते लेखन करत राहिले. लेखन ही त्यांच्यासाठी स्वाभाविक गोष्ट होती आणि त्याला कारण माझे आजोबा. माझ्या आजोबांना वाचनाची प्रचंड आवड होती आणि दर्जेदार वाचनाची आवड होती. आजोबांकडून-वडिलांकडून ती आमच्यातही आली आहे. आपण वाचलेले अगदी न समजणाऱ्या बालवयातही वाचलेले (आणि पाहिलेले-ऐकलेले) सारे मनाच्या चोरकप्प्यात कोठेतरी साठून राहिलेले असते, योग्य वेळी खडकातून झरा फुटावा तसे ते खळखळून बाहेर पडते. मुद्दाम आठवावे लागत नाही. माणसांबद्दल बोलताना ते सांगतात माणसाजवळ दोन गोष्टी पाहिजे एक म्हणजे खडीसाखर आणि दुसरी म्हणजे तुरटी.
खडीसाखरेचे महत्त्व वेगळे सांगायला नको. ती सर्वांच्या परिचयाची आहे. खडीसाखर म्हणजे स्वभावातला, बोलण्यातला गोडवा, पण तुरटीबद्दल मात्र सांगितलेच पाहिजे. तुरटीला आपण विसरून गेलो आहोत. तुरटी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्हाला माहीत आहे, की पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी वापरतात. गढूळ पाण्यातून तुरटीचा खडा फिरवला की गढूळ पाणीही स्वच्छ बनते. सारा गाळ, अशुद्धता तळाशी बसते.

मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात घडत असतात. अशा वेळी त्या गढूळपणात चांगल्या विचारांची तुरटी फिरवता आली पाहिजे. म्हणजे सारा गढूळपणा तळाशी बसून मन नितळ राहील. माणसे जोडलेलीच राहतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)