माणचा हाैशा-नवशा आणि कुरूळीचा सर्जा-राजा ओढणार पालखी रथ

तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील पालखी रथ ओढण्यास बैलजोडी जाहीर

देहुरोड – श्री संत तुकाराम महाराज यांच्या 333 व्या पालखी सोहळ्यातील पालखी रथ ओढण्यासाठी (जुंपण्यासाठी) मुळशी तालुक्‍यातील माणगाव येथील प्रणव दशरथ शेळके यांच्या हवश्‍या-नवश्‍या आणि खेड तालुक्‍यातील कुरूळी येथील बाळासाहेब सोपान कड यांच्या सर्जा-राजा या बैलजोडींना प्रथमच सेवा करण्याची संधी देण्यात आल्याची घोषणा श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख सुनील दामोदर मोरे यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोहळा प्रमुख विठ्ठल मोरे अशोक मोरे, अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्‍वस्त अभिजित मोरे, जालिंदर मोरे, सुनील दिगंबर मोरे आदी या वेळी उपस्थित होते. पालखी सोहळ्यातील रथाला ओढण्यास आपल्या बैलजोडीची निवड होऊन सेवा करण्याचा मान मिळावा यासाठी पुणे जिल्ह्यातून 13 शेतकऱ्यांची संस्थांकडे अर्ज केले होते. सर्व अर्जाची परीक्षण करून त्यातील दोन बैलजोड्यांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षणामध्ये बैलांचे वय, छाती, शिंगे, वशींड, रंग, शेपटी, खूर, उंची, शुभ्रता, त्यांची काम करण्याची क्षमता आदी पाहणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात आल्याची माहिती विश्‍वस्त अभिजित मोरे यांनी दिले.

पालखी प्रमुख मोरे म्हणाले की, पालखी सोहळ्यात पालखीच्या रथाचे मानकरी असलेल्या बैलांची, मानाच्या अश्‍वांची, नगारखान्याच्या बैलांची चोख व्यवस्था ठेवली जाते. या सर्वांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था, बैलांना पोषक चारा, दररोज तज्ज्ञ वैद्यकीयांकडून तपासणी केली जाते. नंतरच रथाला जुंपले जातात.

शेळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांपूर्वी कर्नाटक येथून खरेदी कलेली हवश्‍या-नवश्‍याचे वय सहा वर्ष, पांढरे शुभ्र, सहा फूट उंच, कार्य क्षमता मजबूत आहे. दीड वर्षापूर्वी कड यांनी कर्नाटक येथील जमखंडी येथून सर्जा-राजा ही बैलजोडी खरेदी केल्याची, चार बर्ष वय, पांढरे शुभ्र, खिल्लारी असल्याची आणि शेती व्यवसाय करीत असताना सुमारे आठ बैलजोड्या सांभाळत असल्याचे व आजोबा कै. ह.भ.प. सोपानराव मल्हाराव कड यांच्यापासून वारकरी सांप्रदायिक पिढी असल्याचे बाळासाहेब कड यांनी सांगितले.

दोघेही गेली चार-पाच वर्षांपासून संस्थानकडे अर्ज करीत असून, प्रथमच दोघांना मान मिळाला आहे. याशिवाय पालखी सोहळ्यात अग्रभागी असणारे चौघडा वाजविणारा नगारखाना बैलगाडीसाठी देहूगाव विठ्ठलवाडी येथील अमोल नामदेव काळोखे यांच्या राजा-गिरीष बैलजोडीला मान मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)