माढ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीत कोण बाजी मारणार

लोकसभेच्या तिकिटासाठी रस्सीखेच सुरू

नागनाथ डोंबे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्हसवड – सध्या लोकसभेचे वारे जोराने वाहू लागल्याने माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यावर मोहिते-पाटील कुटुंबाची पकड मजबूत मानली जाते. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कोणत्या नेत्याला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यात काही नेत्यांची फळी उभा राहत असली तरी मोहिते-पाटील कुटुंबाचा दांडगा राजकीय अनुभव पाहता त्यांच्या पकडीतून माढा मतदार संघ घेण्याची कोण हिंमत करेल काय? राष्ट्रवादी याबाबत धोका पत्करेल काय? असा सवाल जनतेतून पुढे येत आहे.

माढा मतदारसंघ गेल्या दशकापासून अस्तित्वात आला. पहिल्यावेळी खा. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतरच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटलांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व टिकवले. आता तिसऱ्यांदा निवडणूक लागत आहे. अद्याप सर्वच पक्ष चाचपणी करताना दिसत आहेत. अनेक चेहरे पुढे येत आहेत. त्यामुळे गुप्त राजकीय खलबते व मोर्चेबांधणी सुरू आहे. सातारा व सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांची कसोटी लागली आहे. त्यामुळे उमेदवार कोण? निवडून येणार कोण? अशा अनेक प्रश्‍नांवर चर्चेची गुऱ्हाळं सुरू झाली आहेत.

सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटील कुटुंबाचे राजकीय वर्चस्व तीन पिढ्यांचे आहे. तथापि, बदलत्या राजकीय समिकरणानुसार अनेक तालुक्‍यातील समर्थकांची मोट मोहिते-पाटील गटाला बांधावी लागणार आहे. करमाळ्यातील नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीचा अंदाज घेता मोहिते-पाटलांची राजकीय समिकरणे वरचढ होताना दिसत आहेत. पंढरपूर तालुक्‍यातील भारतनाना भालके व कल्याणराव काळे यांची मोहिते पाटील यांच्या प्रचाराची उपस्थिती निर्णायक ठरेल. सांगोल्यातील मित्रपक्ष शेकापची भूमिका विश्‍वासदर्शक असते तर माण-खटाव तालुक्‍यात आमदार जयकुमार गोरे नेमके कोणत्या गटाच्या पारड्यात वजन टाकणार यावर लोकसभेची गणिते बदलू शकतात. फलटण तालुक्‍यात पक्षहित लक्षात घेऊन राष्ट्रवादीला गणित जुळवावे लागणार आहेत.

या मतदारसंघात माजी खा. रणाजितसिंह मोहिते-पाटील, ना. रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आ. दिपक साळुंखे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, उत्तमराव जानकर, सोमनाथ वाघमोडे, रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासह अनेक नेतेमंडळींच्या नावाची चर्चा होत आहे. नव्याने चर्चेत असलेले शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनाही मैदानात उतरविण्याची चर्चा रंग धरू लागली आहे. पडद्यामागच्या राजकारणात सुभाष देशमुख, संजयमामा शिंदे, प्रशांत परिचारक, भारत भालके या नेतेमंडळींच्या गोटात काय हालचाली होत आहेत? सध्या प्रमुख लढत राष्ट्रवादी व भाजपात होणार असली तरी शिवसेना, कॉंग्रेस, रिपाइं, शेतकरी संघटना, शिवसेना या पक्षांचे काय मनसुबे असणार? यावर या मतदारसंघातील इच्छुकांची यादी अवलंबून राहणार आहे.

माढ्यातला पराभव लकी
माढा मतदार संघात दोन्ही वेळेला निवडून आलेल्या उमेदवारांच्या विरूद्ध उभी राहणारी नेतेमंडळी लकी ठरली आहे. पहिल्या वेळी सुभाष देशमुख व महादेव जानकर यांनी शरद पवांराना कडवा विरोध केला. मात्र त्याना पराभव स्वीकारावा लागला होता. यात दोघांवरही मंत्रीपदाची जबाबदारी आहे. गेल्या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी खा. विजयसिंह मोहिते पाटलांबरोबर कडवी झुंज दिली. त्यांचाही पराभव झाला पण गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. त्यामुळे माढ्यातील पराभुत उमेदवार लकी ठरत आहेत. त्यामुळे यंदा कोण कोण लकी ठरणार व जनता कोणाला लकी ठरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेखर गोरेंच्या भूमिकेकडे लक्ष
सध्या माण तालुक्‍यात राष्ट्रवादीची अवस्था बिकट झाली असून गत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत या पक्षाला पुन्हा उभारी देणाऱ्या तालुक्‍याचे डॅशिंग नेतृत्व शेखर गोरे यांची ही भुमिका महत्त्वाची ठरणार आहे. फक्त शेखर गोरे यांचेच नेतृत्व मानणारा एक गट असून हा गट हा आगामी लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. सध्या तरी तालुक्‍यातील राष्ट्रवादीही कोमात गेल्याचे चित्र दिसत आहे. शेखर गोरे न्यायालयीन प्रक्रीयेत व्यस्त असले तरी ते लवकरच तालुक्‍याच्या राजकारणात सक्रीय होतील आणि ते जेव्हा सक्रीय होतील तेव्हांच तालुक्‍यातील राजकारणाला रंग भरणार आहे हे मात्र निश्‍चित.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)