माढा मतदारसंघातून प्रभाकर देशमुख इच्छुक

मोहिते-पाटील विरोधक नसल्याचे स्पष्ट
सातारा- प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना केंद्रपातळीवरील योजनांची अंमलबजावणी केली त्यामुळे साहजिकच माढ्यातून खासदार झालो तर मतदारसंघासाठी भरीव निधी आणू शकेन, असा विश्‍वास माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघात आपली उमेदवारी कशी स्ट्रॉंग आहे, याचे गमक देखील त्यांनी यावेळी उलगडले.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, मी माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छूक आहे व तशी उमेदवारी पक्षाकडे मागितली आहे. आपल्याकडे प्रशासकीय कामाचा अनुभव असून सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवू शकतो व त्यासाठी निधी कसा आणायचा हे आपल्याला चांगले माहित आहे. त्याचबरोबर यापुर्वी प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना केंद्राच्या जलसंपदा, पाणीपुरवठा व रोजगार हमी योजनेतील निधीची सखोल माहिती खा. सुप्रिया सुळे यांना दिली होती व पुढे सुळे यांनी लोकसभेत त्या माहितीच्या आधारे प्रश्‍न मांडला व त्यानंतर मतदारसंघात निधी आणता आला, असे देशमुख यांनी सांगितले. तसेच माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबद्दल पुर्णत: आदर असून ते आपले विरोधक नसल्याचे ही देशमुख यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर यापुर्वी माढा व पंढरपूर येथे प्रांत तथा उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले असून कृषी आयुक्त असताना करमाळ्यात ही भरीव काम केले असल्याची आठवण देशमुख यांनी सांगितली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे विभागीय आयुक्तपदी कार्यरत असताना उरमोडी धरणातील पाणी माण-खटावला जाण्यासाठी मुख्य प्रश्‍नाची माहिती तत्कालिन कृषी मंत्री व खा.शरद पवार यांना आपण दिली. माहिती मिळताच पवारांनी तत्कालिन जिल्हाधिकारी एन.रामास्वामी व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी बोलून प्रश्‍न सोडविण्यास सांगितले होते. त्यानंतर तात्काळ सातारा तालुक्‍यातील दिड किलोमीटरचा प्रश्‍न तात्काळ सोडविण्यात आला आणि उरमोडीतून कण्हेर कालव्यातून माणला पाणी पोहचविता आले, असे ही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)