माझ्या मनातला श्रावण

आज सकाळी जाग आली तीच मुळी पावसाच्या आवाजाने. पहाटेपासूनच त्याने जोर धरला होता. तेव्हा या पावसात बाहेर पडण्याचाच कंटाळा आला आणि मी मनाने हा पाऊस एन्जॉय करायचा असे ठरविले. ऑफिसला दांडी मारण्याचा विचार पक्का झाल्यावर. सरळ कॉफीचा कप घेऊन बाहेर व्हरांड्यात जाऊन बसले. खूप दिवसांनी असा योग आल्याने मी खूष होऊन, गाणी ऐकत बसले.

जुनी मराठी गाणी म्हणजे अनमोल ठेवा! आशाबाईंच्या जादुई आवाजातील
ऋतु हिरवा, ऋतु बरवा
पाचूचा मनी रुजवा-हिरवा
हे शब्द ऐकले आणि माझ्या मनाच्या कुपीत दडून बसलेला तो श्रावण सखा मला खुणावू लागला.

आषाढातील ती कोंदट हवा, तो कोसळणारा पूास संपत आला की तो मनभावन श्रावण जवळ येतो.
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनि ऊन पडे
असा लपंडाव खेळणारा हा खोडकर आणि तरी हवाहवासा वाटणारा श्रावण तन आणि मन भिजवून टाकतो.

दिव्याच्या अवसेला दिवे लख्ख करून जणुकाही स्वच्छ प्रकाश आणि आनंद देणाऱ्या श्रावणाची सुरुवात होते. दर सोमवारी ताईबरोबर ताट हातात धरून जाताना खूप मजा यायची. तांदूळ, तीळ, मूग, जवस ती का वाहते ते कळण्याचं ते वय नव्हतं. पण ती तशीच पुढे ऑफीसला जायची आणि मी ते ताट घरी घेऊन यायची आणि आई कौतुकाने माझी पाठ थोपटायची. वाड्यात नवीन लग्न झालेल्या नवीन वहिनींच्या आणि ताईंच्या मंगळागौरीला आम्ही आणि मोठ्या सर्व बायकादेखील काय सुंदर खेळ खेळायच्या. सुंदर सुंदर गाणी म्हणायच्या. तेव्हाच कळायचं यांना छान नाचता आणि गाताही येतं. नाहीतर राखी त्या जास्तवेळ स्वयंपाक घरातच काहीतरी करताना दिसायच्या. दादाकडून राखीला काही तरी घेण्यासाठी मी आधीपासूनच तयारी सुरू करे. त्या ओवाळणीच्या ताटात ती गोजिरी गोंड्याची राखी फार साजिरी दिसे. गोकुळाष्टमीला आई दहीपोहे इतके सुंदर बनवे; शिवाय फराळाचेही. त्याची चव आजही जिभेवर आहे. शुक्रवारी जिवतीची पूजा करून आई आम्हा मुलांना ओवाळीत असे तेव्हाचा तो तिचा स्निग्ध चेहरा आजही विसरता येत नाही. शुक्रवारी शेजारच्या काकू किंवा आईची एखादी मैत्रिण जेवायला येई तेव्हा पुरणपोळीचे जेवण इतके चवदार असे की हा श्रावण सारखा सारखा यावा असे वाटे.

आजीच्या आणि आईच्या सोमवारच्या उपवासी संध्याकाळी शाळेतून आल्यावर गरम गरम वरणभाताचे जेवण आणि कैरीचे लोणचे याने सारी मने तृप्त होत. हवेतला सुखद गारवा, नितळ अशा निळ्या आकाशात कधी तरी इंद्रधनुष्य उमटे. झाडे हिरवीगार, पानांनी, फुलांनी बहरलेली, सणांची रेलचेल, त्याला भावनिक आणि भक्तीचीही जोड असलेला हा श्रावण सखा मनात अजनही घर करून आहे. आशा भोसलेंच्या मधुर आवाजाने माझ्या मनातला श्रावण फुलल.

येणारा श्रावण तुमच्या मनात, आसमंतात, निसर्गात आणि सर्वत्र असाच फुलू देत.

– आरती मोने


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)