माझे आदर्शगाव किरकसाल…

माण तालुक्‍यात सातारा – म्हसवड मार्गावर साताऱ्यापासून सुमारे 70 कि.मी. अंतरावर गोंदवले हे तीर्थ क्षेत्र आहे जिथे नामपूजेचा व अन्नदानाचा महिमा सांगणारे श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जन्म व समाधीस्थान आहे. या तीर्थ क्षेत्रापासून अवघ्या 4-5 कि.मी. अंतरावर नजीकच्या काळातील आदर्शगाव किरकसाल हे माझं छोटंसं गाव आहे. एकजुटीन पेटलं रान… तुफान आलंया…काळ्या भुईच्या भेटीला हे…आभाळ आलंया… या काळजाला हात घालणाऱ्या दोन ओळींनी माझ्या संपूर्ण गावाचा कायापालट करण्याची जिद्द गावातील लहान थोरांच्या मनामध्ये निर्माण केली.

माणदेश हा कायम दुष्काळाची सावट असलेला भाग. वर्षानुवर्षे चालत आलेला दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी गतवर्षी माण तालुक्‍यासह माझ्या गावाने 8 एप्रिल ते 22 मे 2017 या दरम्यानझालेल्या पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेमध्ये उस्फूर्त सहभाग घेतला आणि लाखो घनमीटर क्षमता असलेला पाणीसाठा श्रमदानाच्या माध्यमातून निर्माण केला.दरम्यानच्या काळामध्ये ग्रामस्थ, महिला, युवक, युवती, जेष्ठ नागरिक, बालमित्र यांनी विक्रमी उपस्तिथी आणि सहभाग नोंदवला. तसेच गावच्या यात्रेतील करमणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द करून अंदाजे
1,00,000/- (एक लाख) रुपये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला.

कोकणाला देखील भुरळ घातली माण तालुक्‍याने याचेच फलित मागील महिन्यात डोळ्यांनी पहावयास मिळाले. ज्या गावांनी गेल्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला त्या गावात आज मुबलक पाणी तसेच लाखो रुपयांचे शेती व शेतीपूरक व्यवसायचे उत्पन्न पाहून आंबा, नारळ, फणसाच्या भागातील कोकणस्थ बंधू- भगिनी भारावून गेले. कोटक महिंद्रा फौंडेशनचे शिवाजी धाम यांचे चिरंजीव अभिनव धाम तसेच त्यांचे सर्व सहकारी आणि सुमारे 300 लोक खोपोली ता. खालापूर जि. रायगड येथून किरकसाल व बिदाल ही गावे जलमय कशी झाली हे पाहण्यासाठी आले होते. माझ्या गावचे सरपंच, ग्रामपंचयत सदस्य, ग्रामस्थ या सर्वांनी आपल्या गावाच्या परिवर्तनाची कहाणी सांगितली, हजारो लोकांचे श्रमदानाने केलेले काम पाहून आलेले पाहुणे आश्‍चर्यचकित झाले. जलसंधारणाची झालेली कामे पाहून ही सर्व मंडळी नवीन ध्यास, काम करण्याची इच्छा, आपली गावची माती व पाणी वाचवण्याची शपथ घेऊन गेली यासारखी प्रेरणा दुसरी काय असू शकते.

आदर्शगाव किरकसाल येथे जलसंधारण नेतृत्वगुण या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रात फक्त माझ्या गावामध्ये कार्यशाळा झाली आणि या दोन दिवसीय कार्यशाळेत सुमारे 88 स्वंयसेवकांनी सहभाग नोंदवला. किरकसाल मध्ये वॉटर कप स्पर्धेत जीव ओतून 45 दिवसात रात्रंदिवस मेहनत करुण आपल्या कर्तुत्वाची छाप सोडणाऱ्या युवक व युवतींनी पाणी फौंडेशनच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये गोष्ट परिवर्तनाची या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमामध्ये उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले.
मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये माझ्या किरकसाल गावाला तालुका स्तरीय पुरस्कार विजेते 2017 (पश्‍चिम महाराष्ट्र) माण तालुक्‍यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे परितोषिक मिळाले. जलसंधारणाची कामे सुरु असलेल्या माझ्या गावाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि किरकसाल ग्रामस्थांची जिद्द, कष्ट पाहून भारावलेल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर फोटो व व्हिडिओ टाकून तोंडभरुन कौतुक केले. पाहता पाहता त्याला हजारो लोकांनी लाईक केले, प्रतिक्रिया दिल्या. ते
म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्‍यातील किरकसाल हे आणखी एक आदर्श गाव. गेल्या 45 दिवसांपासून प्रचंड उन्हात हे लोक परिश्रम करत आहेत. जलशोष खड्डे, एरिया ट्रीटमेंट, वृक्षारोपण आदी कामं मोठ्या प्रमाणात होत आहेत. पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी काम हेच फार मोठे समाज आणि राष्टकार्य आहे. तुम्हा सर्वांना माझा सलाम..!

 

 

– मयूर कुंभार,
आदर्शगाव किरकसाल, माण तालुका


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)