माझी निवड म्हणजे समाजाच्या निखळ इच्छांचे प्रतिबिंब

संमेलाध्यक्ष निवडीनंतर डॉ. अरुणा ढेरे यांची भावना : पुण्यात साधला संवाद

पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे मोठे आहे. याला कसदार साहित्य निर्माण करणाऱ्या महिलांची परंपरा मोठी आहे. या प्रवाहात सहभागी होता येणे, ही माझ्यासाठी निखळ आणि दर्जेदार वाङ्‌मयीन संस्कृतीसाठी काम केलेल्या साहित्यिकांची ही पुण्याई आहे, अशा भावना साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी सोमवारी व्यक्‍त केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. ढेरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.

अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपली भावना काय?
महामंडळाने केलेल्या या अनपेक्षित निवडीचा मला आनंद वाटतो. ही निवड म्हणजे कोणतेही वाङ्‌मय बाह्य रंग नसलेली आहे. त्यामुळे समाजाच्या निखळ इच्छांचे हे प्रतिबिंब आहे, असे मी म्हणेन. निवडणुकीचा इतिहास बाजूला सारून या नव्या निवडप्रक्रियेद्वारे सन्मानाने झालेली ही निवड म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि हे पद खूप मोठे आहे. आतापर्यंतच्या साहित्य परंपरेने ते मोठे झाले आहे. त्या पदाचा नक्कीच आदर आहे. आपण साहित्य, ज्ञान परंपरेचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे या अनपेक्षित निवडीचा आनंद नक्कीच वाटतो.

तरुणाई आणि साहित्य याबाबत काय सांगाल?
भाषा हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. पहिल्यांदा तरुणांमध्ये भाषेविषयीचे प्रेम असणे आवश्‍यक आहे. भाषेचे ज्ञान असले पाहिजे. विशेषतः वाचले पाहिजे. आजची तरुण पिढी नक्कीच वाचते, त्यांचे माध्यम जरी वेगळे असेल, तरी तरुण वाचक वर्ग आजही आहे. तरुणाईला काय वाचायला आवडते हे आपण पाहून त्यांच्यापर्यंत ते साहित्य पोहोचवले पाहिजे. चांगले साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कमी पडतोय. त्याचबरोबर तरुणांसाठी चांगले साहित्य तयार होणेदेखील महत्त्वाचे आहे.

बालपण आणि साहित्य लिखाणातील अभ्यासाबाबत काय सांगाल ?
शनिवार पेठेत आमचा वाडा होता. तेथे असणाऱ्या काही महिलांचे जगणे खूपसे पारंपरिक होते. त्यामुळे विविध गोष्टी मला समजत गेल्या. विविध वयांत मी ते सारे पाहत होते. लिहिणारी स्त्री म्हणून पुढे यातील अनेक गोष्टी माझ्या अभ्यासाचा विषय झाल्या. भारतीय स्त्रीचा चेहरा काय असतो, भारतीय स्त्री काय आहे? तिचे प्रश्न काय आहेत? तिच्याकडे पाहण्याची दृष्टी काय आहे? इ. नंतरच्या काळात पुढच्या पिढीतली स्त्रियांमध्ये तिचे घर आणि करिअर या सगळयांत बदलली जाणारी तिची भूमिका हे सगळे पाहत असल्याने मी या लिखाणाकडे वळले. हा विषय माझा अभ्यासाचा देखील विषय झाला.

राजकारण, सोशल मीडियाबद्दल आपले मत काय?
प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतो. विचार करणे थोड्यांनाच जमते. राजकारणविरहित वातावरण पुन्हा निर्माण करणे गरजेचे आहे.

सोशल मीडिया हे अभिव्यक्त होण्याचे नवीन माध्यम आहे. त्याद्वारे लोकांना संवाद करावासा वाटतो, हे नमूद करणे आवश्‍यक आहे. पण, या निमित्ताने नवीन लेखक वाङ्‌मय परंपरेत येत आहेत. हे नक्कीच स्वागतार्ह आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)