पिंपरी – अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता असे सांगत अवनीच्या मृत्यूबाबतचे सत्य समोर येईल, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी (दि. 15) पिंपरी येथे केले. माझा राजीनामा मनेका गांधी नव्हे तर भाजप अध्यक्ष अमित शहा मागू शकतात. इतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असे सांगत त्यांनी मनेका यांना फटकारले.
पिंपरीतील एच. ए मैदानावर असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट हॉर्टीकल्चर असोसिएशनतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे विकास खारगे, असोसिएशनचे अध्यक्ष संतोष शिदोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष विश्वास जोगदंड, सचिव अनिल अंबेकर, हेमंत कापसे आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार पुढे म्हणाले, या पृथ्वीला वन्यप्राणी, पक्षी यांनी वाचविले आहे. मनुष्याने वसुंधरेला वाचविण्याऐवजी धोके देण्याचे काम केले आहे. पृथ्वीला कोळसा मुक्त करण्याचे काम केवळ झाडेच करु शकतात. त्यासाठी पृथ्वीला वाचविण्यासाठी झाडे लावण्याचा संकल्प केला पाहिजे. अगरबत्तीला लागणारे लाकूड देखील आपल्याला आयात करावे लागत आहे. भारत माता की जय म्हणत आहोत. तर अगरबत्तीची काडी तरी आपण बनविली पाहिजे. सरकारने वृक्ष लागवडीचे मोहीम हाती घेतली आहे. बांबूचे लागवडीचे क्षेत्र वाढविले आहे. बांबूपासून इथेनॉल बनविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सच सच होता आहे असे सांगत मुनगंटीवार म्हणाले, माझे वनखाते काढून घेण्याची मागणी कोणी केली नाही. अशी मागणी केली म्हणून, लगेचच काही होत नाही. कोणी माझे खाते काढू शकत नाही आणि मला कुठली बढती देऊ शकत नाही. माझा राजीनामे पक्षाचे अध्यक्षच मागू शकतात. त्यांनी ठरविल्यावरच यावर निर्णय होईल.
मराठा आरक्षणाबाबत नियत साफ
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले, निवडणुकीत मते मिळावीत. सत्तेचे रक्षण व्हावे. यासाठी आरक्षण देण्याची सरकारची भुमिका नाही. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकावे. आरक्षण दिल्यानंतर या निर्णयाच्या प्रती न्यायालयाने विरोधी भुमिका घेऊ नये. अतिशय तर्कशास्त्राच्या आधारावर आरक्षणाची भुमिका सरकार घेत आहे. सरकारची नियत, निती साफ आहे. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात सुद्धा टिकेल. तसेच आरक्षणाच्या रांगेत जो समाज उभा आहे. ज्यांना आरक्षणाची गरज आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता देखील सरकार घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा