सध्या बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड जोरात आहे. अनेक खेळाडू, कलाकार आणि नेत्यांवर बायोपिक यायला लागले आहेत. आपल्यावरही एखादा बायोपिक व्हावा, असे कोणाला वाटले तर त्यात काही वावगे असू नये. अक्षयकुमारनेही अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जर आपल्यावर एखादा बायोपिक झालाच तर त्यात “अक्षयकुमार’चा रोल रणवीर सिंहने करावा, असे तो म्हणाला आहे.
अक्षयने अलीकडेच अॅक्शन आणि कॉमेडी सिनेमांच्या बरोबरीने सामाजिक आशय असलेले अनेक सिनेमे केले आहेत. त्यामागे काही विशेष राजकीय हेतूचा विचार असल्याची शंका उपस्थित व्हायला लागली होती. पण अक्षयने या शंकेचे समाधान केले आहे. जर सामाजिक विषयावरील एखादी चांगली कथा सिनेमासाठी पुढे आली तर मी ती का स्वीकारू नये? “टॉयलेट…’ आणि “पॅडमॅन’ या दोन्ही सिनेमांबाबत असेच आहे. “टॉयलेट…’ तर वास्तवदर्शी फिल्म आहे. तर “पॅडमॅन’ची निर्मिती ट्विंकलनेच केलेली आहे. यामागे काहीही राजकीय हेतू नाही. या कथा लोकांपर्यंत पोहोचवाव्यात असे आपल्याला वाटले, म्हणूनच हे सिनेमे केल्याचे त्याने सांगितले.
तीन दशकांपूर्वी आपण बॉलीवूडमध्ये अॅक्टिंग करायला सुरुवात अगदी अपघाताने केली. मार्शल आर्टची पार्श्वभूमी असल्याने मार्शल आर्ट स्कूल सुरू करण्यासाठी आपण मुंबईमध्ये आलो होतो. बॉलीवूडमध्ये आपण केवळ पैसा कमावण्याच्या उद्देशानेच आलो. मार्शल आर्ट स्कूलच्या बरोबरीने थोडे फार मॉडेलिंग करण्याचा प्रयत्न झाला. त्यातूनच बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला. आपल्या एकूण 135 ते 140 सिनेमांपैकी प्रारंभीचे बहुतेक सिनेमे अॅक्शनवरच आधारलेले होते. याला अॅक्टिंग काय येणार, असाच विचार बहुतेक निर्माते, दिग्दर्शक करायचे आणि अॅक्शनचेच रोल द्यायचे. त्यानंतर कॉमेडी आणि मग रोमॅंटिक रोल करायला आपण सुरुवात केली, असे अक्षयने एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सांगितले. त्याच्या “2.0′ बाबत खूपच क्रेझ आहे. त्याचा गेटअप आणि स्पेशल इफेक्टस्बाबत खूप चर्चा झाली आहे. रजनीकांत यांच्याबरोबरचा रोल ही आणखी एक खासियत आहे. पण त्यामुळे या सिनेमातला अक्षय किती लक्षात राहणार आहे कोणास ठाऊक.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा