माजी आमदारांना हवी सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन

मुंबई – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ आता राज्यातील माजी आमदारांनी सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन, वर्षातून दोन ते तीनवेळा मोफत विमान प्रवास, 50 हजार किमी मोफत रेल्वे प्रवास आदी मागण्या केल्या आहेत. माजी आमदारांच्यावतीने सुधाकर गणगणे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची भेट घेतली. या भेटीत माजी आमदारांच्या मागण्या आणि त्यांना हव्या असलेल्या सवलतींबाबतचे निवेदन दिले.

सध्या माजी आमदारांना महिना 50 हजार रूपये पेन्शन मिळते. या पेन्शनमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वाढ करण्यात यावी, अशी माजी आमदाराची मुख्य मागणी आहे. तसेच आमदार निवासात माजी आमदारांसाठी पाच ते दहा खोल्या आरक्षित ठेवाव्यात, सध्याची मोफत रेल्वे प्रवासाची वार्षिक 35 हजार किलोमीटर अंतराची मर्यादा वाढवून ती 50 हजार किमी करण्यात यावी, असा आग्रह माजी आमदारांचा आहे.

माजी आमादारांना रेल्वे प्रवासासाठी वातानुकुलीत द्वितीय श्रेणीचा पास दिला जातो. आता रेल्वे पाससह आमदारांना वर्षातून दोन ते तीनवेळ मोफत विमान प्रवासाची सुविधा हवी आहे. माजी आमदारांना विशेष कार्यकारी अधिकारीचा दर्जा दिला जावा, अशीही माजी आमदारांची मागणी आहे.

राज्यात माजी आमदारांची एकूण संख्या 825 इतकी आहे. त्यात विधानसभेच्या 695 तर विधानपरिषदेच्या 130 माजी आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, आजच्या घडीला राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा साडेचार लाख कोटी रूपयांवर पोहचला असून शेतकर्यांची कर्जमाफी, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी यामुळे सरकारवर मोठा आर्थिक भार येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)