मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या तक्रारीं निकालात काढा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्यांची गांभिर्याने दखल घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी स्थानिक पातळीवरच निकाली काढण्याबाबत ठोस कार्यवाही करुन, दर तीन महिन्यांनी त्याचा अहवाल प्रशासन विभागाकडे पाठविण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती, भरती, पदोन्नती, बदल्या, गोपनीय अहवाल व अन्य स्वरुपाच्या तक्रारी यांची गांभिर्याने दखल घेवून, प्रश्‍नांची सोडवणूक व तक्रारींचे निवारण स्थानिक पातळीवरच होईल, या दृष्टीने 3 मार्च 2018 ला राज्य सरकारने आदेश दिले आहेत. तसेच, या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मंत्रालयीन प्रशासकीय विभागाला सादर करणे आवश्‍यक आहे. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव (सेवा) यांच्यामार्फत वर्षभरात एकदा आढावा घेतला जाणार आहे.

-Ads-

या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिन्यात राष्ट्रीय अनुसूचित जाती कल्याण समितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली होती. या भेटीदरम्यान या समिती सदस्यांनी महापालिकेच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची गांभिर्याने दखल घेण्याच्या तोंडी सूचना दिल्या आहेत. या दोन्ही पातळीवरुन आलेल्या निर्देशानुसार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना आदेश दिले आहेत. त्यानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या आलेल्या तक्रारींची शहानिशा करणे, तक्रारीतील सत्यता पडताळून पाहणे, तक्रार व विषयाच्या अनुषंगाने तक्रारदारास बोलावून, पाचारण करुन सुनावणी आयोजित करणे, तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेणे, तक्रार कायदेशीर आहे अथवा नाही, याबाबत समुपदेशन करणे. तक्रारदाराचा प्रशासनाच्या कामकाजाविषयी असलेला संभ्रम दूर करुन, प्रशासनाची भुमिका योग्य, न्यायाची व सकारात्मक असल्याचे पटवून देण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, या तक्रारीमधील सत्यता पडताळून तक्रार व विषयाच्या अनुषंगाने यथोचित कार्यवाही करुन, तसा अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एखाद्या तक्रारीबाबत निर्णय घेणे सुलभ होत नसल्यास, विभाग प्रमुखांनी आपल्या शिफारशीसह हा अहवाल प्रशासन विभागाकडे सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

कार्यवाहीची जबाबदारी सहायक आयुक्‍तांची
मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन, त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी प्रशासन विभागाच्या आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. त्याकरिता दर सहा महिन्यांनी विभागस स्तरावर त्रैमासिक आढावा संकलित करून, कार्यवाही करावी. तसेच आवश्‍यक त्याठिकाणी सूचना करुन, तक्रार निकाली काढण्याच्या कार्यवाहीचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.

महापालिका आस्थापनेवरील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत अनेकदा पत्र व्यवहार करूनही महापालिका प्रशासन त्याची दखल घेत नाही. मात्र, राष्ट्रीय अनुसूचित जाती कल्याण समितीच्या भेटीनंतर किमान मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारींबद्दल किमान बोलायला तरी सुरुवात केली आहे, हे काही कमी नाही.
– ऍड. सागर चरण,
उपाध्यक्ष, आरोग्य समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)