मागल्यमय दिवाळी

खरेदीसाठी बारामतीतील बाजारपेठा फुलल्या

जळोची- लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारा, सर्वत्र प्रकाश, चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करणारा, फटाक्‍यांची आतषबाजी, पंचपक्वानांची गोडी आणि नात्या-नात्यांमध्ये स्नेह व मैत्रीची मधुरता वाढविणारा दीपोत्सवाचा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बारामतीतील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.
बालचमूंकडून किल्ले बांधकामाची लगबग सुरू झाली आहे. सर्वांच्या घरा-घरांतील स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात असून दिवाळीचा फराळ बनविण्याची जोरदार तयारी महिलांनी सुरू केली आहे. शाळांना सुट्टी मिळाली असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांसह सर्वांना आता उत्सवाचे वेध लागले आहेत. चिमुकल्यांनी किल्ले बांधकाम सुरू केले असून, सैन्य खरेदीसाठी तर त्यांचे आईबाबा त्यांना नवीन कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेत आहेत. आकर्षक आणि रंगीबेरंगी पणत्या रस्त्यांवर ठिकठिकाणी विक्रीसाठी मांडल्या आहेत. दुकानांबाहेर लटकणारे छोट्या-मोठया आकारातील रंगीबेरंगी आकाशकंदील, तोरण, रांगोळ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे बाजारपेठे इंद्रधुष्यासारखी दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पणत्यांचे ग्राहकांना आकर्षण
आधी मातीच्या साध्या रंग नसलेल्या पणत्या असायच्या मात्र काही वर्षांपासून मातीच्याच पण नव-नवीन आणि विविध रंगातील आकर्षक पणत्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे मातीच्या पणत्यांबरोबरच पेटवल्यानंतर सुगंध आणि सुवास पसरवणाऱ्या फॅशनेबल पणत्या ग्राहकांना भुरळ पाडत आहेत. ग्रीन, ऍपल, लेमन, स्ट्रॉबेरी अशी बाजारात विक्रीसाठी आलेल्या नवीन पणत्यांची नावे आहेत. शहरातील ठराविक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या पणत्या इतर पणत्यांच्या किंमती 50 रूपयांपासून 250 रूपयांपर्यंत आहेत. बारामतीत भिगवण चौक, मंडई व बाजारासह दुकानामध्ये या रंगेबेरंगी पणत्या उपलब्ध आहेत.
आकाशकंदीलांच्या किंमती वाढल्या
दरवर्षीप्रमाणे बाजारपेठांमध्ये आकाशकंदीलांचा झगमगाट आहे. यंदा ही आकाश कंदीलांमध्येही नवीन प्रकार पहायला मिळत आहेत. साध्या पातळ व जाड रंगीबेरंगी कागदापासून बनविलेले कंदील बाजारात दिसून येत आहे. कापडी आकाशकंदील सुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. सजावटीसाठी वापरले जाणारे छोट्या आकारातील आकाशकंदील 5 रूपयांना मिळत आहेत. तर इतर प्रकारातील आकाशकंदिलांच्या किंमती साधारणपणे 25 रूपयांपासून 800 रूपयांपर्यंत आहेत. यावर्षी 20 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत किंमती वाढल्या असल्याचे विक्रत्यांनी सांगितले.

 • किराणा मालांच्या दुकानांमध्ये गर्दी
  दिवाळी म्हटले की, पंचपक्कवानांचा फराळ आलाच. लाडू, करंजी, चकल्या, शंकरपाळ्या, अनारसे, चिवडा या प्रमुख पदार्थांबरोबरच इतर अनेक पदार्थांची फराळात रेलचेल असते. हे पदार्थ बनविण्यासाठी आवश्‍यक साहित्य खरेदीसाठी सध्या ग्राहकांनी किराणा मालाच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी केली आहे. रवा, तेल, साखर, मैदा, पोहे, चना डाळ, खोबरे या वस्तुंच्या किंमतींही गगनाला भिडल्या आहेत.
 • रंगीबेरंगी, तोरण, हार, फुलमाळा
  बाजारात यंदा ग्राहकांना आकर्षिक करतील असे तोरण, हार दिसत आहेत. गृहसजावटीसाठी महिला तोरण, हार, नकली फुलमाळा यांना अधिक महत्त्व देतात. त्यामुळे जरी त्यांच्या किंमतीत वाढ जरी झाली तरी घर सुंदर बनवण्याच्या दृष्टीने ग्राहक फुल माळा, तोरण यांना अधिक पसंती देत आहेत.
 • किल्ले बनवण्याची धूम
  लहान मुलांना परीक्षा संपून आता सुट्या लागल्या आहेत त्यामुळे मुलांनी किल्ले बनवण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी बनवलेल्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी लागणारे सैन्य बाजारात उपलब्ध झाले आहेत. ते घेण्यासाठी मुले गर्दी करीत आहेत.
 • यंदाच्या दिवाळीत पहिल्यांदाच चायनीज वस्तूंना ग्राहकांची मागणी नाही. तर भारतीय बनावटीचे कंदील, पणत्या, वेगवेळ्या रंगातील मेणबत्या, बाजारात आल्यामुळे ग्राहक हा त्यास पसंती देत आहे.
  – पप्पू दळवी, दुकानदार, बारामती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)