मागण्या मान्य झाल्याने प्राध्यापकांचा संप मागे

पुणे – प्राध्यापक भरती पुन्हा सुरू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून संप पुकारलेल्या प्राध्यापकांनी बुधवारी संप मागे घेतला. यातील काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे जाहीर करून एमफुक्‍टो आणि संघटनेशी संबंधीत प्राध्यापकांना आजपासून (दि.11) कामावर हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र अध्यापक महासंघाच्या ठरावानुसार 25 सप्टेंबरपासून राज्यभरातील एमफुक्‍टो आणि संलग्न संघटनांचे प्राध्यापकांना आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले होते. यामध्ये शेकडो प्राध्यापक सहभागी झाले होते. संपात नियमित प्राध्यापकांसह करार तत्त्वावरील, घड्याळी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचाही समावेश होता. त्यामुळे अध्यापनाचे आणि इतर प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते.

याबाबत संघटनेचे सरचिटणीस पी. एस. लवांडे म्हणाले, शासनाबरोबर संघटनेच्या दोनवेळा बैठका झाल्या. दुसऱ्या बेैठकीनंतर प्राध्यापक भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला आहे. यामध्ये रिक्त पदांपैकी 60 टक्के पदे ताबडतोब भरण्यात येणार असून 40 टक्के पदे तासिका तत्वावर भरण्यात येणार आहेत. तसेच, तासिका तत्वावरील प्राध्यापकांना 15 ते 20 हजार मानधन देण्याबरोबरच 71 दिवसांचे थकित वेतन देण्यास देखील अनुमती दिली आहे. प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन आयोग लागु केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. विद्यापीठामधील चुकीच्या नेमणुकांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. काही मागण्या मान्य झाल्या असून काहींवर सकारात्मक निर्णय झाला आहे. यामुळे संघटनेने समाधान व्यक्त करत संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)