मागण्या मान्य करा अन्‌ खुशाल पुण्याला पाणी न्या

पाईट- भामा आसखेडग्रस्तांना धरणाने अगोदरच पाण्यात बुडवून उद्‌ध्वस्त केले. त्यात आणखी कमी झाले म्हणून की काय, प्रशासन शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्याऐवजी पाण्यातच अंत पाहत आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करीत धरणग्रस्तांनी आज (गुरुवारी) पाइपलाइन बरोबरच जॅकवेलचे काम बंद पाडले. तसेच आमच्या प्रलंबित मागण्या त्वरीत पूर्ण करा आणि खुशाल पाणी घेऊन जा, असे म्हणत शासन व प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड, तसेच औद्योगिक वसाहतींना भामाआसखेड धरणातून पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलवाहिनीचे युद्धपातळीवर काम सुरु आहे. मात्र, धरणात आमच्या जमिनी गेल्या आमच्या पुनर्वसनाचा विषय मागे टाकून इतरत्र पाणी वाटप करण्यासाठी शासन धडपड करत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी जलवाहिनीचे काम बंद पाडले होते. यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव, अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे व भामा आसखेड प्रकल्पग्रस्त यांच्यात काही मागण्यांच्या संदर्भात समझोता करीत जलवाहिनीचे काम पुन्हा सुरु करण्यात आले. शासनाने ज्या वेगाने पाइपलाइनचे काम सुरू केले त्या वेगात धरणग्रस्तांचे प्रश्‍न सोडवले जात नाहीत. अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे आजही देत आहेत व प्रशासकीय अधिकारी प्रकल्पग्रस्तांना अक्षरशः अपमानास्पद वागणूक देत असल्याने शेतकऱ्यांचा असंतोष आज उफाळून आला व त्यांनी पाइपलाइन व जॅकवेलचे काम बंद पाडले.
शासनाने शेतकऱ्यांना 16/2 च्या नोटिसा दिल्या, पण त्याबरोबरच 45 दिवसांत पैसे भरण्याची मुदत दिली; परंतु शेतकऱ्यांना पैसे भरण्याची चलने वेळेत मिळत नाही व 65 टक्के भरण्याची रक्कम शेतकऱ्यांकडे शिल्लक नसल्याने ती जमा करण्यासाठी वेळ लागत शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यात अधिकाऱ्यांकडून कुचंबणा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावेळी भामा आसखेड जन आंदोलनाचे सत्यवान नवले, देविदास बांदल, दत्तात्रय शिंदे स्वप्नील येवले, बळवंत डांगले, किसन नवले, संजय देशमुख, मल्हारी शिवेकर, शांताराम शिवेकर, अनिल देशमुख, हिराबाई नवले, अशोक कुंभार, मारुती बांदल, गजानन कुडेकर, गणेश नवले विलास ओव्हाळ, अंकुश कोकणे, निवृत्ती नवले, महादू नवले व 23 गावांतील प्रकल्प बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 • या आहेत मागण्या…
  एकूण 1714 शेतकऱ्यांचे 100 टक्के पुनर्वसन करा
  प्रकल्पबाधित सर्वच्या सर्वशेतकऱ्यांना त्वरित 16/2च्या नोटीस देऊन जमीनीचा ताबा देण्यात याव्यात
  भामा-आसखेड धरणाच्या मृत साठ्याव्यातिरिक्‍त तीन टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात यावे
  प्रकल्प बाधित गावांमध्ये शेती ठिबक पद्धतीने करण्यात यावी यासाठी लागणारा सर्व खर्च शासनाने करावा
  खास बाब म्हणून उल्लेख असलेल्या गावांचा नागरी सुविधानांसहित विकास करण्यात यावा
  ज्या जमिनी पाण्याखाली जात नाहीत अशा जमिनीवरचे संपादनाचे शिक्के काढण्यात यावे
  भामा नदीवर 14 बुडीत बंधारे बांधण्यात यावे
  ज्याप्रमाणे धरणाच्या खाली पाण्याची आवर्तने सोडली जातात त्याप्रमाणे धरणाच्या उर्ध्व भागात वांद्रे गावापर्यंत पाणी सोडण्याची व्यवस्था करावी
  धरणामुळे शेजारील गावे दुरावली असून रोटी-बेटी व्यवहार थांबला आहे त्यामुळे नवीन रस्त्याची बांधणी करण्यात यावी
  भामा आसखेड प्रकल्पातील 403 धरणग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाकडून लगेच जमीन वाटप सुरू झाली पाहिजे
  उर्वरीत खातेदारांना चलन देणे व जमीन वाटप करण्यात यावे
  18/28 मध्ये सत्र न्यायालयाच्या निकालानुसार त्वरीत वाढीव पेमेंट वाटप सुरू करणे

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)