पुरावे आढळल्याचीही माहिती

पुणे – देशात कायद्याने प्रस्थापित असलेली राजकीय व्यवस्था उलथून टाकण्यासाठी विविध संघटना आणि त्यांचे पदाधिकारी यांच्यावर हल्ले करण्याचे आणि देशातील सर्वोच्च राजकीय पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करून घातपात करण्याचे नियोजन प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सदस्य करत असल्याचे पुरावे पोलिसांना आढळल्याचा दावा गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे उपस्थित होते.

माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे पोलिसांनी नऊ ठिकाणी कारवाई करून पाच जणांना अटक केली आहे. एल्गार परिषदेच्या आयोजनासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात 8 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये यापूर्वी पाच जणांस अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर 28 ऑगस्ट 2018 रोजी पुणे पोलिसांनी मुंबई, ठाणे, फरीदाबाद, रांची, हैद्राबाद, नवी दिल्ली या शहरात नऊ ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर वरवर राव, अरूण परेरा, वर्नेण गोनसाल्विस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे आणि बंदी घातलेली सीपीआय माओवादी संघटन यांच्यात संबंध दर्शविणारे विविध पुरावे मिळाले आहेत. त्यांच्यातील ई-मेल, पत्र, विविध सभांचे ठराव, इतिवृत्त असा त्यांच्याविरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

अटक केलेल्यांकडून सापडलेल्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स पुराव्यांचे विश्‍लेषन करण्यात आले. रणनितीचा भाग म्हणून देशात कायद्याने प्रस्थापित केलेली राज्यव्यस्था उलथून टाकण्याचा त्यांचा डाव आहे. त्यासाठी अखिल भारतीय युनायटेड फ्रंटच्या माध्यमातून विविध कारवाया करण्याचा त्यांचा कट रचला आहे. अशा प्रकारचे संघटन तयार करण्याचा ठराव “सीपीआय माओवादी’ या प्रतिबंधित संघटनेच्या “इस्टर्न रिजीनल ब्युरो’च्या बैठकीत संमत झाला असून त्याचा पुरावा उपलब्ध आहे. “इस्टर्न रिजीनल ब्युरो’ हा सीपीआय माओवादी या संघटनेचा एक भूमिगत गट आहे. या गटाचा भाग म्हणून महाराष्ट्रातही असा एक फ्रंट तयार करण्याच्या दृष्टीने पुणे येथे दि. 31 डिसेंबर रोजी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)