माऊली मंदिर परिसराला दुचाकींचा विळखा

आळंदी- तीर्थक्षेत्र अलंकापुरी नगरीतील माउली मंदिरास चौहोबाजूंनी तटबंदीने जसा विळखा घालावा तसा पान-फुल विक्रेते, पेढे, पुस्तके, हॉटेल्स, छोटे-मोठे विविध प्रकारचे व्यवसाय करणारे व्यावसायिकांनी दुचाकी पार्क करून विळखा घातला आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्रपासून वारकरी शिक्षण संस्थेपर्यंत, अशोक टी हाऊस ते डी. डी. भोसले यांचे निवासस्थान, पितळी गणपतीपासून भराव रस्ता (विजय मार्केटपर्यंत, शिवाय भागिरथी नाला (सद्‌गुरू भवन) या माऊली मंदिरासभोवतीचा संपूर्ण परिसरात दिवसभर दुचाकी वाहने लावलेली असतात, त्यामुळे तिन्ही बाजूंनी मंदिरात जातांना आबालवृद्धांसह भाविकांना देखील या वाहनांमधून मुंगीसारखी वाट शोधून, कमालीची कसरत करतच मंदिराची पायरी शोधावी लागत आहे. यावरून दुचाकीधारकांमध्ये बेशिस्तीचा कळस किती आहे , याची प्रचीती येत आही, असे ऍड. विष्णु भिकोबा तापकीर यांनी सांगितले. ते म्हणाले पुढे की, किमान माउली मंदिराच्या मुख्य महाद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या आणि उजव्या बाजूने बॅरिकेट्‌स लावून पायी जाण्या-येण्यासाठी रस्ता आळंदी पोलीस प्रशासन, आळंदी नगरपरिषद आणि आळंदी देवस्थान यांनी यात जातीने लक्ष घालून मोकळा करावा.
याचबरोबर माउली मंदिराकडून शनी मंदिर आणि पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुन्या माडीच्या दोन्ही बाजूंनी प्रसाद, पानफुलांची दुकाने आहेत, पुढे कमानीमध्ये देवस्थांने व्यापारी गाळे भाड्याने दिले आहेत. या दोन्ही ठिकाणच्या व्यावसायिकांनी उंबऱ्याच्या आत बसून व्यवसाय करावा की, बाहेर…, हा ज्वलंत प्रश्‍न आजवर अनुत्तरितच राहिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची दुकाने ही अर्धीअधिक रस्त्यावरच मांडली जात आहेत. माउलींच्या दर्शनासाठी नियमित येणारे हजारो भाविक आपला जीव मुठीत धरून, कशीतरी वाट काढीत माउली मंदिराच्या मुख्य द्वारापर्यंत पोहचतात आणि मंदिराच्या पहिल्या हैबतराव बाबांच्या पायरीला स्पर्श करून एकदाचा सुटकेचा निःश्वास टाकतात. या गंभीर परिस्थितीतून भाविकांच्या कसरतीची सुटका कोण करणार, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटताना दिसू लागली आहे.

  • आळंदी शहरातील वाहतूक विभागाची स्वतंत्र शाखा नुकतीच सुरू करण्यात आली असून, माऊली मंदिर परिसरात नियमित लावल्या जाणाऱ्या दुचाकींसाठी पर्यायी जागेचा शोध आम्ही घेत आहोत. डिसेंबर महिन्यात आळंदीची मोठी यात्रा म्हणजेच कार्तिकी वारी आहे. त्या अनुषंगाने आम्ही युध्द पातळीवर सध्या माउली मंदिर परिसरात लावल्या जाणाऱ्या दुचाकी इतरत्र हलविण्याच्या तयारीत आहोत. सध्या वाहतूक विभागाकडे अवघे सातच वाहतूक पोलीस कर्मचारी आहेत.यापुढे भाविकांना अडथळ्यांच्या शर्यतींचा कोणताही सामना करावा लागणार नसून त्रासही होणार नाही.

– व्ही. के. कुबडे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक विभाग, आळंदी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)