माऊलीनगर परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांची बिकट वाट!

माऊलीनगर, कामशेत : खड्‌डेमय रस्ता व दुतर्फा झाडी असलेल्या रस्त्यातून वाट काढत चालणारे विद्यार्थी.
  • रस्त्याची दुरवस्था : विद्यार्थी व दूध उत्पादकांमध्ये संताप

नाणे मावळ – संततधार पावसामुळे रस्त्यांची पुरती “वाट’ लागली आहे. कामशेत परिसरातील माऊलीनगरमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्‌डे अन्‌ खड्ड्यात साचलेले पाणी त्यामुळे नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. रस्त्याचा बोजवारा उडाल्याने शाळकरी मुले, दूध व्यावसायिक, नोकरदारांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तसेच दुचाकी आणि मोटारीतून प्रवास करणे अवघड झाले आहे. रस्त्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याची मागणी जोर धरीत आहेत.

माऊलीनगर येथे काही ठिकाणी तर रस्ता तर नाहीच पण खड्‌डे ही दिसत नाही, याचे कारण असे की त्या ठिकाणी रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा रस्ता खूप अरुंद असून, रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढलेली आहे. या कारणांमुळे विद्यार्थ्यांचे गणवेश खराब होण्याचे प्रकार सतत घडतात. या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम त्वरीत सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

घरातून शाळेत जाताना खराब रस्त्यामुळे कपडे रोज गाळाने माखतात. शाळेत पोहोचल्यावर शिक्षक स्वच्छ कपडे घालून येता येत नाही का? असा प्रश्‍न विचारून दोन शब्द ऐकवतात. घरी आल्यावर आई म्हणते एक दिवस नीट कपडे वापरता येत नाही, असे म्हणून ओरडते. हे सारे घडते ते फक्‍त खराब रस्त्यामुळे असे विद्यार्थी केतन चिंतामण कोंढरे याने सांगितले. एवढेच नाही, तर मोठी मोटार रस्त्यावर आल्यास स्वतःचा जीव मुठीत धरून झाडाझुडपांमध्ये उभे राहण्यासाठी जागा शोधावी लागते. अनेकदा अशावेळी 10-15 पावले पुढे-मागे जावे लागते, असे विद्यार्थी रितेश सुनील भोरे आणि अभिषेक तुकाराम कोंढरे यांनी दै. प्रभातशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, माऊलीनगर येथील एका बाजुला असलेल्या लोकवस्तीला जाणारा रस्ताही खराब होता. काही नागरिकांच्या मागणीवरून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी स्वखर्चाने हा रस्ता तयार करून दिला आहे, अशी माहिती स्थानिक रहिवासी सुलाभ राळे व माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

सरपंचांचा सकारात्मक प्रतिसाद
कामशेत मधील एकूण 20 अंतर्गत रस्त्यांचे प्रस्ताव आमदार बाळा भेगडे यांच्याकडे सादर केले असून, लवकरात लवकर हे मंजूर करून घेतले जाणार आहे. पावसाळ्यानंतर मजबूत असा रस्ता माऊलीनगरच्या नागरिकांसाठी तयार केले, असे आश्‍वासन कामशेत ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका घोलप यांनी दिले.

गेल्या 22 वर्षांपूर्वी हा रस्ता मजबूत असा तयार करण्यात आला होता.त्यानंतर दोन वर्षांपूर्वी खासगी बांधकाम व्यावसायिकाने तात्पुरती डागडुजी केली होती. सध्या या खराब रस्त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
– टी. एन. गिरेंद्रन, सुशिक्षित नागरिक.

गावातील नेते मंडळी केवळ श्रीराम नवमीला आणि निवडणुकीला मतांसाठी या रस्त्याने येतात. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्याचे काम झाले, तरच होईल, अन्यथा या रस्त्याबाबत काही सांगता येत नाही.
– नामदेव काटकर, दूध उत्पादक शेतकरी.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)