माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी फलटणमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज

विजय पाटील ः पालखी सोहळा हा मोबाईल अँपद्वारे सनियंत्रित केला जाणार
फलटण, दि. 11(प्रतिनिधी)-श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा 2018 सातारा जिल्ह्यामध्ये दि. 13 जुलैपासून सुरू होत आहे. 17 जुलै रोजी पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात जात आहे. पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी यांच्यासमवेत वेळोवेळी बैठका घेऊन पालखी तळाची व मार्गाची पहाणी केली. पालखीच्या स्वागतासाठी व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे फलटणचे तहसिलदार विजय पाटील यांनी सांगितले. यावेळी पालखीचे वैशिष्ट्य सांगताना पालखी सोहळा हा मोबाईल अँपद्वारे सनियंत्रित केला जात आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळ्याचे आगमन 14 जुलै रोजी फलटण तालुक्‍यात होत असून सोहळ्याच्या स्वागतासाठी व येथील वास्तव्यादरम्यान सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी भाविकांना पुरेशा नागरी सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी तालुक्‍याला भेटी देवून नियोजनाची पाहणी व संबंधितांना योग्य सूचना दिल्याने आता संपूर्ण शासन यंत्रणा सज्ज झाली आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियुक्‍त्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा आषाढी वारीच्या निमित्ताने वर्षानुवर्षे या मार्गाने जात असून प्रशासन प्रत्येक वर्षी सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी योग्य नियोजन करीत असते. यावर्षी प्रथमच प्रशासनातील एकूण 18 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत करण्यात आली आहे. त्यांना सोपविलेल्या जबाबदाऱ्या योग्य पध्दतीने पार पाडून कोणत्याही परिस्थितीत माऊलींच्या सोहळ्यातील कोणाचीही गैरसोय होणार नाही त्याचबरोबर संपूर्ण सोहळ्याची सुरक्षितता जपली जाईल यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी विशेष दक्षता घेतल्याचे दिसून आले. प्रशासनातील 18 विभागावर विशेष जबाबदारी सोहळ्याच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रशासनातील महसूल, पोलीस, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, पाटबंधारे, प्रादेशिक परिवहन, अन्ननागरी पुरवठा दूरसंचार, नगरपालिका, एसटी महामंडळ, विद्युत वितरण कंपनी, पशुसंवर्धन या खात्याचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी असल्याचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले. संपर्कासाठी वॉकीटॉकीचा वापर सोहळ्यात केला जातो. सुमारे 5/6 लाख भाविक वारकरी, दिंडीकरी सहभागी होत असतात. हे सर्व एकत्र आल्याने त्या त्या भागातील सर्वच कंपन्यांच्या मोबाईल यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याने स्थानिक संपर्क व्यवस्थेसह खाजगी संवाद व्यवस्थाही कोलमडून पडल्याने कोणालाही एकमेकाशी संवाद/संपर्क साधने कठीण होवून बसते. यासाठी सातारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत वॉकीटॉकी सेट उपलब्ध करुन दिले आहेत. एखाद्या गंभीर प्रसंगात किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेबरोबरच आता प्रशासन यंत्रणाही एकमेकांच्या संपर्कात राहून योग्य निर्णय घेण्यासाठी संवाद/संपर्क यंत्रणा खंडीत झाल्यामुळे अडचणीत येणार नसल्याचे तहसिलदार विजय पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
पथकाद्वारे आरोग्य सुविधा उपलब्ध सोहळ्यातील वारकरी भविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य पथके तैनात केली आहेत. पालखी मार्गावरीला लोणंद ते बरडपर्यंतचे पिण्याच्या पाण्याचे जलउद्‌भव शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. तसेच पालखी सोबत असणारे खाजगी व शासकीय टॅंकर्स भरण्यासाठी पाडेगाव ते बरड पर्यंत ठिकठिकाणी फिडींग पॉईंट निश्‍चित करण्यात आले आहेत. तेथे वीज व रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक फिडिंग पॉईंटवर दोन कर्मचाऱ्यांची तसेच प्रत्येक टॅंकरसोबत 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
तरडगाव व बरड येथील पालखी तळावर सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वीज व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. फलटण पालखी तळावरील संपूर्ण व्यवस्था फलटण नगरपालिकेच्यावतीने पूर्ण करण्यात आली आहे.
गतवर्षीपासून सोहळ्यासमवेत निर्मलावारींतर्गत प्रत्येक पालखीतळ आणि जेथे दिंड्या उतरतात त्याठिकाणी तात्पुरती शौचालये उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारे पाणी, वीज, रस्ते, शोषखड्डे वगैरेची व्यवस्था संबंधीत ग्रामपंचायत व नगर पालिकेने केली आहे. तसेच विद्युत वितरण कंपनीमार्फत संपूर्ण पालखी मार्गावर 24 तास योग्य दाबाने व अखंडीत वीज पुरवठ्याची ग्वाही देण्यात आली आहे. अन्न औषध प्रशासनाच्यावतीने खाद्यपदार्थाचे नमुने घेवून त्याची तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
फलटण तहसिल कार्यालयाच्यावतीने रॉकेल वितरणाची तसेच तालुक्‍यातील प्रत्येक पालखी तळावर कुकींग गॅस सिलेंडर वितरणाची व्यवस्था करण्यात आल्याचे तहसिलदार विजय पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
नगरपालिका यंत्रणाही सज्जदरम्यान फलटण शहर व परिसरातील संपूर्ण स्वच्छता करुन गावात डी.डी.टी फवारण्यात आली आहे. स्वच्छ, शुध्द व पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी सांगितले. तसेच फलटण नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा सभापती श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, आरोग्य सभापती सौ. वैशाली अहिवळे यांनी पालखी तळाची प्रत्यक्ष पहाणी केली.

जिल्हा पोलीस दलही सज्ज
सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीनेही सोहळ्याच्या संरक्षण व्यवस्थेसह वाहतूक नियोजन व नियंत्रणासाठी योग्य नियोजनाद्वारे 1 अप्पर पोलीस अधिक्षक 5 डिवायएसपी,11 पोलीस निरीक्षक,60 स.पो.नि/.पो.उे.नि. 624 पोलीस जवान, 102 म.पो.कॉ.,122 वाहतूक पोलिस असे 925 अधिकरी व पोलीस 500 होमगार्ड 24 तास उपलब्ध राहणार आहेत. त्याचबरोबर गृहरक्षक दल व राष्ट्रीयसेवा योजना विभागांच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदिप पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अभिजीत पाटील यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)