माउलींच्या समाधी प्रसंगाच्या वर्णनाने वैष्णव गहिवरले

आळंदीत श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी दिन थाटात : टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दुमदुमला

– एम. डी. पाखरे

-Ads-

आळंदी –
समाधि घेतली आळंदी । भोंवतीं शोभे सिध्द मांदी ।।
सन्मुख पुढें अजानवृक्ष । देव येती तेथें साक्ष ।।
कीर्तन गजरीं । नामघोष चराचरी ।।
ऐसा सोहळा आनंद । एका जनार्दनीं नाहीं भेद ।।

माउली माउलीचा जयघोष.. टाळ, मृदंगाचा गजर… भगव्या पताका नाचवत… मुखी माउलीनाम… पुंडलिक वरदे हरि विठ्ठल आणि टाळ-मृदंगाचा गजर करीत माउलींच्या समाधीवर लाखो वैष्णवांनी तुळशीपत्र, मंजिऱ्या आणि फुलांची मुक्‍त उधळण व घंटानाद करीत 723वा संजीवन समाधी दिन सोहळा लाखो वैष्णवांनी याचि देही, याचि डोळा अनुभवला. तर माउलींच्या समाधी प्रसंगाचे वर्णन कीर्तनातून ऐकताना वारकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

माउलीचे मंदिरात श्रींच्या संजीवन समाधी दिनास विविध धार्मिक कार्यक्रमांनी भल्या पहाटेच सुरुवात झाली. भल्या पहाटे प्रमुख विश्‍वस्त अॅड. विकास-ढगे पाटील यांचे हस्ते पवमान अभिषेक, दुधारती प्रथा परंपरेप्रमाणे झाली. संत नामदेवराय यांच्या वंशजांचे हस्ते श्रींना महापूजा झाली. भाविकांच्या महापूजा या दरम्यान सुरू झाल्या. त्यानंतर हभप नामदास महाराज परिवाराने नामदेव महाराज याचे वैभवी दिंडीतून श्रींच्या पादुका मंदिरात दिंडीने प्रदक्षिणा करत आणल्या. दरम्यान, गाभाऱ्यात भाविकांच्या महापूजा सुरू होत्या. पुढे महाद्वारात काल्याचे कीर्तन सेवा सुरु झाली. कीर्तन सेवा रुजू करून हैबतरावबाबा यांचे दिंडीचा मंदिरात हरिनाम गजरात प्रदक्षिणेस प्रवेश झाला. तत्पूर्वी मंदिरात नामदेव महाराज यांचे वंशज हभप केशव महाराज नामदास यांचे माउलींच्या संजीवन समाधी प्रसंगावर आधारित कीर्तनसेवेत हृदयस्पर्शी वाणीतून समाधी प्रसंगात माउलींचे जीवनकार्य आणि सोहळा भाविकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि भाविकांच्या नेत्रांतून अश्रू तरळले.

त्यापूर्वी श्रींच्या गाभाऱ्यात महापूजा बंद करून स्वकामच्या स्वयंसेवकांनी श्रींचा गाभारा स्वच्छ केला. गाभारा स्वच्छतेनंतर माउलीच्या मंदिरातील क्षेत्रोपाध्यानी श्रींच्या संजीवन समाधीवर वेदमंत्रोत्चारात श्रींच्या संजीवन समाधीची पूजा पुष्पहार अर्पण करीत केली. श्रींच्या समाधीची पूजा परंपरेप्रमाणे बांधली. जसजशी श्रींचा समाधी प्रसंगाची वेळ समीप येत होती. तशी मंदिरासह महाद्वारात भाविकांची एकाच गर्दी उतरोत्तर वाढली. मिळेल त्या जागेत थांबून भाविकांनी श्रींच्या संजीवन समाधीदिन सोहळा प्रसंगी कीर्तन सेवेस हजेरी लावली. तर हरिनाम गजरात शहरात माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा झाला.आळंदी नगरपरिषदेने विविध सेवा सुविधा देत भाविकांना नागरी सेवा दिल्या.

याप्रसंगी पालखी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, प्रमुख विश्‍वस्त अॅड. विकास ढगे पाटील, माजी विश्‍वस्त चंद्रकांत डोके, सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, यंत्रासमिती सभापती पारुबाई तापकीर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, बबनराव कुऱ्हाडे, श्रींचे चोपदार बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, माउली ग्रुपचे प्रमुख माऊली गुळुंजकर, व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर, संजय रणदिवे, श्रीधर सरनाईक, मानकरी योगेश आरु, ज्ञानेश्‍वर कुऱ्हाडे, आळंदी नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी, महाराज, फडकरी, दिंडीकरी, मानकरी उपस्थित होते.

पादुकांची मंदिरास प्रदक्षिणा
मंदिराच्या महाद्वारात सुरुवातीला काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ-मृदंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बाराच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. घंटानाद,अभिषेक आणि माउलींच्या समाधीवर विविध फुलांची पुष्पवृष्टी झाल्यानंतर श्रींची आरती घेण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांमार्फत वीणामंडपातून कारंजा मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माउलींच्या समाधीपुढे विराजमान करण्यात आल्या. त्यानंतर माऊलींना महानैवेद्य देऊन नामदेवरायांचे वंशज नामदास परिवारासह, मानकरी, प्रमुख मान्यवरांना नारळ-प्रसाद संस्थानचे वतीने देण्यात आला.

… लाविती पदर डोळीयास
माऊली मंदिरातील विणा मंडपात परंपरेने संत नामदेवराय यांचे वंशज केशव महाराज नामदास यांचे महाद्वारात श्री गुरू हैबतरावबाबा आरफळकर यांच्या वतीने तसेच आळंदी परिसरात ठिकठिकाणी संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचे जीवन कार्यावर आधारित कीर्तन सेवा तसेच समाधी प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा सुश्राव्य वाणीतून राज्यातील नामवंत महाराजांनी सादर केली. “नामा म्हणे, संत झाले कासावीस, लाविती पदर डोळीयासी’ श्रींच्या संजीवन समाधी प्रसंगाचे वर्णन आणि जीवन चरित्र कानावर पडताच डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि श्रींचे संजीवन समाधी प्रसंगाच्या कल्पनेने भाविकही गहिवरले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)