माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास आज प्रारंभ

दिंड्याच्या आगमनाने अलंकापुरी गजबजली : अलंकापुरीत घुमू लागला टाळ-मृदंगाचा नाद

आळंदी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या 723व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी विविध गावा-गावांमधून निघालेल्या दिंड्या अलंकापुरीत पोहोचू लागल्या आहेत. दिंड्यांच्या आगमनामुळे अलंकापुरीतील धर्मशाळा, राहुट्या, मंदिरांमध्ये टाळ-मृदंगाचा नाद घुमू लागल्याने येथे भक्‍तीचे मळे फुलू लागले आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि. 30) सकाळी 7 ते 9 या वेळेत पालखी सोहळ्याचे मालक वै. गुरू हैबतबाबांच्या महाद्वारातील प्रथम पायरी पुजनाने खऱ्या अर्थाने सोहळ्यास सुरूवात होणार असून संजीवन समाधी सोहळा सोमवारी (3 डिसेंबर) रंगणार असल्याची माहिती देवसंस्थानचे प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील यांनी सांगितली.

विधिवत व देवाब्राह्मणांच्या साक्षीने होणाऱ्या या पायरी पूजन सोहळ्यात पालखी सोहळ्याचे मालक व गुरू हैबतबाबांचे वंशज व मानकरी बाळासाहेब आरफळकर (पवार) यांच्या सर्व कुटुंबासह माऊली मंदिराचे सर्व विश्‍वस्त, सेवेकरी मानकरी, दिंडीचालक, चोपदार, विणेकरी, आदींसह आळंदीतील सर्व पदाधिकारी, आळंदीकर नागरिक व भाविक या पायरी पूजन सोहळ्यात मोठ्या भक्‍ती-भावाने सहभागी होतील.

दरम्यान, संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने राज्य परिसरातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत असून त्यांच्या सोयी- सुविधांसाठी आळंदी नगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, आळंदी देवाची, विश्रांतवाडी व दिघी पोलीस ठाणे, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, आळंदी ग्रामीण रूग्णालय, वीज वितरण, महसूल विभाग, श्री ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान, राज्य परिवहन महामंडळ, पीएमपीएमएल, भारत संचार निगम लिमिटेड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न भेसळ विभाग आदी खात्यांच्या नियोजन बैठका पार पडल्या असून सर्व खात्यांनी आपापली तयारी पूर्ण केल्याची ग्वाही देऊन यात्रा काळात भाविकांना कोणत्याही गैरसोयीस सामोरे जावे लागणार नाही, असे आश्‍वासनही दिले.

आजचे धार्मिक कार्यक्रम
संजीवन समाधी सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रमांना शुक्रवार (दि. 30) पासून सुरूवात होणार आहे. या सोहळ्या दरम्यान पहाटे नित्याच्या धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात माऊलींना पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती होईल. पहाटे 5 ते सकाळी 11.30पर्यंत भाविकांच्या महापूजा होतील. दुपारी 12.30 ते 1 श्रींना महानैवेद्य दाखविला जाईल. सायंकाळी 6.30 ते 8 योगीराज ठाकूर यांचे सुश्राव्य वाणीतून वीणा मंडपात कीर्तन होईल. रात्री 8 ते 8.30 धुपारती होईल. रात्री 9 ते 11 बाबासाहेब आजरेकर यांचे वीणा मंदिरात किर्तन, रात्री 10 ते12 वासकर महाराज यांचा हैबतराव बाबांच्या पायरीपुढे जागर, रात्री 12 ते 2 मारुतीबुवा कराडकर यांचा जागर, रात्री 2 ते पहाटे 4 हभप हैबतबाबा आरफळकर यांचा जागर.

विना आमंत्रितांचा अलौकिक सोहळा
संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः सोलापूर (पंढरपूर) जिल्ह्यातून व्यापारी वर्ग दरवर्षी मोठ्या प्रमाणात येत असतो. शहरात सर्वत्र सोहळ्याची लगभग सुरू असून, काही ठिकाणी आपला ऊन, वारा, पाऊसापासून बचाव व्हावा म्हणून राहुट्या उभारण्याचे काम सुरू आहे. तर दर्शन बारीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. येत्या काही तासातच राज्याच्या कानाकोपऱ्यातून मिळेल त्या वाहनांनी तसेच पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून लाखो भाविक येथे येऊन दाखल होतील. कारण हा विना आमंत्रितांचा अलौकिक असा भागवत धर्माची पताका उंचावून जगाला शांतीचा संदेश देणारा सोहळा आहे.

भक्‍तीचा मळा फुलला
संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अलंकापुरीतील धर्मशाळा, राहुट्या, मंदिरे गजबजू लागली असून पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’, श्री ज्ञानदेव तुकाराम’, माऊली माऊली’, ज्ञानेश्वर महाराज की जय’च्या जयघोषाने अवघी अलंकापुरी भक्‍तीमय झाली आहे. तर इंद्रायणी तीरावर महिला वारकरी; तसेच तरुण वारकरी फुगड्या खेळण्यात दंग झाले आहेत. बाजारपेठेत तुळशीच्या माळा, पूजेचे साहित्य, खेळणी, पावसापासून बचाव होण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या आदी वस्तूंची दुकाने सजू लागली आहेत. तर आळंदीत आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाचा खडा पहारा तैनात करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)