मांढरदेव यात्रेत पशुबळीला पूर्ण बंदी

जिल्हाधिकारी : काळूबाई यात्रा आढावा बैठक

सातारा – मांढरदेव येथील श्रीकाळेश्‍वरी देवीची यात्रा 20 ते 22 जानेवारी 2019 या कालावधीत होत आहे. यात्रा कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहून सन्मवय ठेवून काम करावे. यात्रा कालावधीत पशुबळी, दारु बंदी नारळ फोडण्यास तसेच तेल वाहण्यास तसेच वाद्य वाजवण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. भाविकांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मांढरदेव येथील श्रीकाळेश्‍वरी देवीची यात्रा 20, 21 व 22 जानेवारी रोजी होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापूरकर, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, वाईचे तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचे शुध्दीकरण, तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता, जंतुनाशक औषध फवारणी, त्याच बरोबर रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. कचरा होऊ नये, यासाठी दर्शन मार्गावर जागोजागी कचरा कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी ठराविक ठिकाणी होऊ नये, यादृष्टीने स्टॉल धारकांच्या जागांचे नियमन करावे. अन्न धान्यांच्या स्टॉलला परवानगी देताना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक करावे. मांढरदेव परिसरात वाद्य वाजवण्यास, नारळ फोडण्यास आणि तेल वाहण्यास पूर्णतः बंदी करण्यात आली आहे. भाविकांनी याचे पालन करुन पोलिस यंत्रणेला आणि जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी यावेळी केले.

आर.टी.ओ आणि पोलिसांनी गाड्यांची तपासणी करावी, जेणेकरून पशू, कोंबड्या यात्रेच्या ठिकाणी जावू नयेत. उत्पादन शुल्क विभागामार्फत यात्रेच्या दरम्यान तीन दिवस वाई शहर परिसरात मद्य विक्री बंद ठेवावी. सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवावा. यात्रा यशस्वी करण्यासाठी नेमून दिलेली जबाबदारी सर्व विभागांनी पूर्ण करावी, अशा सूचना श्‍वेता सिंघल यांनी केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)