मांडुळाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

पिंपरी – मांडुळ तस्करीसाठी आलेल्या चार जणांना वाकड पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन मांडुळ जप्त करण्यात आले आहेत. गुरुवारी (दि. 17) वाकडमधील मुंजोबा वस्ती याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

अमर अरुण राठोड (वय-19, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड), बाबासाहेब वसंत रोकडे (वय-21), भीमराव नरसप्पा जाधव (वय-22), सागर चंद्रकांत घुगे (वय 22, रा. गजानन कॉलनी, ताथवडे) अशी अटक करणाऱ्यात आलेल्यांची नावे आहेत.

वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक राजेश बारशिंगे यांना चार जण मांडुळ तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड येथील मुंजोबा वसाहतीतील मुंजोबा मंदिरामागे सापळा लावण्यात आला. याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक हरिष माने व त्यांच्या समवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना तीन व्यक्ती संशयास्पद रित्या थांबल्याचे आढळून आले. त्यापैकी एका इसमाच्या हातात पोते होते. त्यांची चौकशी केली असता त्यांनी मांडूळ विक्रीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडील पोते ताब्यात घेतले असता त्यात तीन मांडुळ आढळून आले.

मांडुळ सापाबाबत बरेच गैरसमज व अंधश्रध्दा आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात किंमत मोजण्याची तयारी असते. बाजारात एका मांडुळास दहा हजार ते एक लाख रुपये मोजले जातात. त्यामुळे त्याची तस्करी केली जाते. मांडुळ हे वन्यप्राणी जीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत शेड्युल तीन मधील प्राणी आहे. तो नामशेष होत असल्याने त्याचे जतन करण्याची कायद्यात तरतूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त विक्रम पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, उप निरीक्षक हरिष माने, कर्मचारी राजेश बारशिंगे, अशोक दुधवणे, बापु धुमाळ, रमेश गायकवाड, विक्रांत गायकवाड, भैरोबा यादव, विजय गंभीरे, शाम बाबा यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)