पुणे – इन्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका महिलेने तरुणाची 33 लाख 50 हजार 975 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका अज्ञात महिलेविरुद्ध एका 37 वर्षीय पुरुषाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी यांनी एका महिलेबोबर इन्स्टाग्राम अकाऊंटवर ओळख झाली होती. यानंतर संबंधित महिलेने भारतात येऊन पैसे गुंतवणुकीची इच्छा व्यक्ती केली. यानंतर व्हॉटस् अॅपवर लंडन ते दिल्ली या विमानाच्या तिकिटाचा फोटो पाठवून दिला. यानंतर 10 सप्टेंबर रोजी दिल्ली एअरपोर्ट येथे येणार असल्याची माहिती दिली. याच दिवशी फिर्यादीला दिल्ली कस्टम कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत एकाचा फोन आला होता. त्या व्यक्तीने “तुमच्या ओळखीची महिला परदेशातून आली आहे. तिने यलो पेपरची पूर्तता केली नाही. तसेच तिने सोबत महागड्या वस्तू व परदेशी चलन आणली आहे,’ असे सांगितले. यानंतर फिर्यादीला परदेशी चलन त्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी, दिल्ली ते पुणे विमान तिकीट, फंड रिलीज ऑर्डर आदी कारणांसाठी वेळोवेळी फोन करुन बॅंकेच्या विविध 9 खात्यांवर 33 लाख 50 हजार 975 रुपयांची रक्कम वर्ग करण्यास सांगितले. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबंधित महिलेने संपर्क क्रमांक बंद केला .यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी सायबर क्राईम सेलकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक साठे करत आहेत.
फिर्यादीच्या कुटुंबीयांना नव्हती माहिती
फिर्यादी एका एव्हीएशन कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्याने 26 दिवसांच्या कालावधीत घरातील, बॅंकेतील व इतर ठिकाणी गुंतवलेले पैसे ऑनलाइन पद्धतीने संबंधित कस्टम अधिकाऱ्याच्या सांगण्यावरुन वर्ग केले आहेत. याची कल्पना त्याच्या घरच्यांना गुन्हा दाखल होईपर्यंत नव्हती.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा