महिला स्वातंत्र्याची पहाट उगवावी…

समस्त महिला वर्गाची काळजी करणाऱ्या तथाकथित पुरुषांनी नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम घेतले. खरे तर असले कार्यक्रम साचेबंद व पूर्वनियोजित असतात. ज्या महिला उपेक्षित आहेत, वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत विकासाचा किरण पोहचलेला नाही. त्यांना त्याचा गंधही नसतो. आपण एकविसाव्या शतकात आलो असतानाही प्रश्न वाढलेत.

सध्या कधीही टीव्ही चालू केला तरी कोठे ना कोठे मुलींवर झालेल्या अत्याचारांचे चर्वितचर्वण चालू असते. मन सुन्न करणारी ही स्थिती सुदृढ व सुसंस्कृत समाजघडणीला बाधक आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजाराम मोहनराय, धोंडो केशव कर्वे आदींनी महिलांची स्थिती सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले. तत्कालीन प्रश्नांचे स्वरूप आज बदलले आहे. मात्र प्रश्नांची संख्या घटण्याऐवजी वाढली आहे. अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.

अस्तित्वाची जाण असलेल्या महिला तसेच समस्त महिला वर्गाची काळजी करणाऱ्या तथाकथित पुरुषांनी नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम घेतले. खरे तर असले कार्यक्रम साचेबंद व पूर्वनियोजित असतात. ज्या महिला उपेक्षित आहेत, वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत विकासाचा किरण पोहचलेला नाही. त्यांना त्याचा गंधही नसतो. आपण एकविसाव्या शतकात आलो असतानाही प्रश्न वाढलेत. महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. व्यवसायात, नोकरीत महिला दिसत आहेत. तरीही स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रीयांची शिक्षणाची गळती, आरक्षण, महिलांवरील अन्याय-अत्याचार यासारखे विषय लावून धरले जातात. याचा अर्थ आजही आपण या विषयावर कमी पडतो. बलात्काराचे स्वरूप बदलत जाऊन सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या भयंकर घटना अधिकाधिक भीषण होत चालल्या आहेत.

त्याचेच प्रतिरूप ‘सैराट’सारख्या चित्रपटात दाखवून कोट्यवधींची कमाई केली जात आहे. विकासाची पातळी महिला कधी गाठणार आहेत, जेव्हा सर्व महिला सुशिक्षित होतील तेव्हा? जेव्हा सर्व महिलांना स्वत:च्या प्रश्नाची जाण होईल तेव्हा? जेव्हा तिचे शरीर हे प्रदर्शनाचे साधन नसेल तेव्हा? जेव्हा शेव्हींग क्रिमच्या जाहिरातीत अर्धे कपडे घातलेल्या तरुणी नसतील तेव्हा? जेव्हा कौटुंबिक अत्याचाराची बळी एक स्त्री नसेल तेव्हा? जेव्हा चित्रपटातील नायिका प्रदर्शनाची वस्तू नसेल तेव्हा? ऑफिसात बॉस म्हणून तिचे वर्चस्व पुरुषांना सहन होईल तेव्हा? भारत आणि इंडियामध्ये असणारा फरक महिलांच्या बाबतीतही पहायला मिळतो. त्या उच्चशिक्षित, करीयर ओरीएंटेड आहेत. त्यांच्या करीयरचा आलेख उंच जाणारा असतो. बॅंकींग क्रीडा, कला, अभिनय, वैमानिक शास्त्रज्ञ, अंतराळवीर ते उच्चपदस्थ राजकारणी प्रत्येक क्षेत्रात त्या चपखल बसतात. त्यांच्या दृष्टीने महिला म्हणून प्रश्नाचा स्तर वरचा असतो. प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने संधी हवी असते. घरामध्ये निर्णयाचे अधिकार, अपत्याचे संगोपन किंवा घरकामात घरातील पुरुषांचा बरोबरीने सहभाग हवा असतो. संपत्तीमध्ये समान अधिकार हवेत हे त्यांच्या प्रश्नांचे स्वरूप असते. बऱ्याच अंशी त्यांचे प्रश्न सोडविण्यात त्या समर्थ असतात. जे शिल्लक राहतात ते त्या न्यायालयाच्या मार्गांने सोडून घेतात.

यानंतर मधला वर्ग जो आहे, त्या वर्गातील महिला निरक्षर ते उच्चशिक्षित असतात. या मध्यमवर्गीय महिलांना कुटुंबाच्या चौकटीत निर्णयाचा अधिकार नसतो. त्या नोकरी-व्यवसाय करतात पण कळसुत्री बाहुलीप्रमाणे त्यांना पुरुषाच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. त्यांना त्यांच्या प्रश्नाची जाण असते, परंतु ते प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्याची हिंमत ठेवत नाहीत. कामाच्या ठिकाणी असो वा घरी प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होतो. कष्टकरी वा नोकरदार दोन्हींना बाहेरचे व घरचे काम धरुन दिवसाकाठी 14 तासांच्या वर होते. ही महिला एक प्रकारचे यंत्रच बनते. स्वत:च्या अन्यायासाठी कोर्टकचेरीपर्यंत दाद मागण्याची हिंमत त्यांच्यात नसते. लोक काय म्हणतील याचे दडपण तिच्यावर असते. कोणीतरी समाजसेविका किंवा धीट व्यक्तीने पुढाकार घेऊन त्यांना मदत करण्याची गरज असते. या महिला कुटुंबाकरिता पराकोटीचा त्याग करतात. तरीही त्यांची किंमत होत नाही.

अशा सोशिक स्त्रीचे देवी म्हणून उदात्तीकरण केले जाते. सिरियल व सिनेमातसुद्धा हीच प्रतिमा दाखविली जाते. समाजात काम करणाऱ्या महिला चळवळीचे ध्येय या वर्गातील महिलांना मदतीचा हात देण्याचा असतो. म्हणून अशा चळवळी आवश्‍यक असतात. त्यांचे काम जाहिरातीपुरते वा बातमीपुरते नसावे.तिसऱ्या वर्गातील महिला या सर्व प्रश्नांपासून अनभिज्ञ असतात. त्यांच्यापर्यंत नागरी सुविधा पोहोचत नाहीत. त्यामुळे त्यांना त्याचे दु:ख वाटत नाही. आपण महिला आहोत व आपल्यावर अन्याय होणारच हे त्यांनी गृहितच धरलेले असते. त्यामुळे त्यांना त्याची विशेष खंत वाटत नाही. खरे तर या वर्गातील महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देण्याची गरज असते. महिला चळवळी अद्याप तरी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास कमी पडत आहेत. आज महिलांच्या प्रश्नावर दृष्टी टाकली तर हुंड्याच्या बाबतीत काही अंशी बदल झाल्याचे जाणवते. हुंडा बंद होण्यामागचे कारण प्राधान्याने सामाजिक सुधारणा, स्त्रीजन्माची उपेक्षा ही आहेत.

त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलीच नसल्याने सामाजिक विषमता निर्माण झाली आहे. घराण्याला वारस, म्हातारपणाला काठी हवी या भावनेतून स्त्रीभ्रूणहत्या होते. कायद्याने मुलाला व मुलीला संपत्तीत समान हक्क दिला तर मुलीही आई-वडिलांची जबाबदारी घेतील. तशा बऱ्याच मुली ही जबाबदारी पारही पाडतात. जी मुले आई-वडिलांना सांभाळत नाहीत, त्यांच्यासाठी सश्रम कारावासाची शिक्षा असावी. सारांश असा की, काही महिलांचा जीवनस्तर पूर्वीच्या तुलनेत निश्‍चित सुधारला आहे. हा बदल सकारात्मक आहे. महिलांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क निश्‍चित तेव्हाच मिळेल जेव्हा तिला निर्णयाचा अधिकार असेल. यामुळे तिला शिक्षणाचे स्वातंत्रय मिळेल.

     शिक्षणाला हवी संस्कार वर्गाची जोड  

महिलांवरील अत्याचाराचे स्वरूप अधिकाधिक गंभीर होत चालले आहे ही बाब अधिक चिंताजनक आहे. पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, भोगवाद, चंगळवाद, मानसिक विकृती, व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण, इंटरनेटच्या माध्यमातून नको त्या गोष्टीची सहज उपलब्धता ही याची कारणे आहेत. त्यात बदल करण्यासाठी शैक्षणिक संस्थांतून संस्कारवर्गाची जोड शैक्षणिक अभ्यासक्रमाला दिली पाहिजे.

  मेधा कांबळे

सामाजिक कार्यकर्त्या


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)