महिला व पुरुष स्क्‍वॅश संघाची उपान्त्य फेरीत धडक

जकार्ता: भारताच्या महिला व पुरुष स्क्‍वॅश संघांनी उपान्त्य फेरीत धडक मारताना आशियाई क्रीडास्पर्धेत भारताच्या आणखी दोन पदकांची निश्‍चिती केली. स्क्‍वॅशमध्ये भारताचे हे चौथे पदक ठरेल. दीपिका पल्लीकल, जोश्‍ना चिनाप्पा व सौरव घोषाल यांनी याआधी महिला व पुरुष एकेरीत कांस्यपदके पटकावली आहेत.

जोश्‍ना चिनाप्पा, दीपिका पल्लीकल, सुनयना कुरुविला व तन्वी खन्ना यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला स्क्‍वॅश संघाने शेवटून दुसऱ्या गटसाखळी लढतीत बलाढ्य चीनचे आव्हान 3-0 असे मोडून काढताना आपली अपराजित घोडदौड कायम राखली. जोश्‍नाने डोंगजि ली हिच्यावर 3-1 अशी मात केली. तर दीपिकाने सियू दुआनला 3-0 असे पराभऊत केले. सुनयनाने झिनरु हे हिचा 3-0 असा दुव्वा उडविताना भारतीय महिलांच्या विजयाची पूर्तता केली.
गेल्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने याआधीच्या गटसाखळी लढतींमध्ये इराण, थायलंड व इंडोनेशिया यांना पराभूत केले आहे.

भारतीय महिला स्क्‍वॅश संघासमोर अखेरच्या ब गटसाखळी सामन्यात हॉंगकॉंगचे आव्हान आहे. ही लढत जिंकून ब गटातून पहिल्या क्रमांकाने बाद फेरी गाठण्याचा भारतीय महिला संघाचा प्रयत्न राहील. पुरुष गटांत भारताने थायलंडचा 3-0 असा फडशा पाडला. सौरव घोषालने पूनसिरी फूविसला 3-0 असे नमविले. तर रमित टंडनने फत्रप्रसित आरनोल्डचा 3-0 असा पराभव केला. महेश माणगावकरने जिवासुवान नथ्थाकिटवर 3-0 अशी मात करून भारताच्या विजयाची निश्‍चिती केली. पुरुष संघाने गेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.

कुराशमध्ये मेघा टोकस पराभूत

भारताच्या मेघा टोकसचे महिलांच्या कुराश स्पर्धेतील आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. महिलांच्या 63 किलो वजनगटातील उपान्त्यपूर्व लढतीत मेघा टोकसने इंडोनेशियाच्या शिफा खसानी नजमूविरुद्ध 0-3 असा एकतर्फी पराभव पत्करला. आता महिलांच्या 78 किलो गटांत भारताच्या ज्योती टोकसमोर थायलंडच्या मीसरी प्रवांकितचे आव्हान आहे. तर पुरुषांच्या 90 किलो गटांत भारताचा दानिश शर्मा इंडोनेशियाच्याच आल्फिस मोहम्मदशी झुंज देईल. याआधी भारतीय खेळाडूंनी कुरासमद्ये दोन पदके जिंकली असून महिला विभागात पिंकी बलहाराने रौप्य व मलप्रभा जाधवने कांस्यपदकाची कमाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)