महिला पोलिसांची “ऑनड्युटी’ दिवाळी

शर्मिला पवार

पिंपरी – दिवाळी म्हटलं की अभ्यंग स्नान, फराळाची लगबग, साफसफाई, पाहुणे, खरेदी अशी धम्माल असते. परंतु, ती केवळ सामान्य नागरिकांसाठी. मात्र, सणासुदीला डोके वर काढणारी गुन्हेगारी, दुर्घटना तसेच सणोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना कडेकोट बंदोबस्त द्यावा लागतो. यामध्ये कर्तव्य श्रेष्ठ मानणाऱ्या महिला पोलिसांना कौटुंबीक जबाबदारी पार पाडताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत सुमारे 383 महिला पोलीस कर्मचारी तर 15 महिला पोलीस अधिकारी काम करतात. दोन्ही परिमंडळाची धुरा देखील महिलांच्याच हाती आहे. त्यामुळे स्वतःचे कार्यक्षेत्रच घर मानून त्या कामावर तप्तरतेने हजर असतात. तर दुसऱ्या बाजूला सून, आई, बहीण, पत्नी म्हणून त्या सणावारातील त्यांची जबाबदारी देखील पार पाडत असतात. घरच्यांना आवडणारा फराळ देखील त्या आवडीने बनवत असतात. अशावेळी होणारी तारेवरची कसरत दैनिक “प्रभात’ने जाणून घेतली. अशा परिस्थितीत कामावर असणाऱ्या पुरुष सहकाऱ्यांची साथ, घरच्यांची मदत तसेच कामाच्या ठिकाणी साजरी होणारी दिवाळी व त्यातून मिळणारा आनंद त्यांनी आवर्जून शेअर केला.

केवळ पोलीस महिला कर्मचारीच नव्हे तर सध्या सर्वच नोकरी करणाऱ्या महिलांना ऑनलाईन शॉपिंग व महिला बचत गटांकडून मिळणाऱ्या तयार फराळाचा आधार मिळत आहे. ऐन सणात एक दोन दिवस सुट्ट्या मिळत आहेत. त्यामुळे खरेदी करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग केल्याने वेळेची बचत होत आहे व शॉपिंगचा आनंदही मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला बचत गटाद्वारे मिळणाऱ्या फराळामुळे घरची चव देखील सर्वांना चाखता येत असल्याचे काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले. वर्षानुवर्षे दिवाळी “ड्युटी’वरच घालवावी लागत असल्याने घरच्यांच्याही अंगळवणी पडले आहे. त्यामुळे आम्हाला गृहीत न धरताच घरचे दिवाळी साजरी करतात. त्यांच्या आनंदातच आम्हालाही दिवाळी साजरा केल्याचा आनंद मानावा लागतो, असे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले.

दिवाळी किंवा कोणताही सण असला की आम्ही इतर गृहिणी किंवा महिलांपेक्षा खूप आधीपासून कामाला सुरुवात करतो. यामध्ये अगदी घराची साप-सफाई किंवा खरेदी, फराळ या साऱ्यांचाच समावेश होतो. कारण दिवाळी आहे म्हणून सुट्टी मिळत नाही अशावेळी घरीही वेळ द्यावा लागतो. यासाठी जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा कामे करुन घेतो. खरेदी देखील खूप आधीच करतो. फराळ ही आधी सारखा खूप असा करता येणे शक्‍य नाही. त्यामुळे घरच्यांना आवडीचेच पदार्थ मी बनवते. इतर फराळ विकत आणते. साऱ्या गोष्टीची कुटुंबालाही आता सवय झाली आहे. त्यामुळे ते देखील आम्हाला समजून घेतात.
– स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्‍त, परिमंडळ 1.

वरीष्ठ अधिकारी व पुरुष सहकारी आम्हाला समजून घेतात. गणपतीत शक्‍य नाही पण दिवाळीत किमान दोन दिवस तरी सुट्टी मिळेल असे नियोजन केले जाते. यावेळी दिवाळीची पूजा व घरच्यांना वेळ देता येतो. फराळ, खरेदी सोईनुसार करावी लागते. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीच ही कामे करावी लागतात. थोडी धावपळ होते. मात्र काही कर्मचारी परगावचे असतात त्यांना आधी सुट्टीचे प्राधान्य दिले जाते. तसेच पोलीस आयुक्त आर. के. पद्‌मनाभन यांनी “रोटेशन’ने सुट्ट्या देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पूर्वी सारखी यंदा गैरसोय होणार नाही. ड्युटी बजावताना घरच्यांना मिळेल तेवढा वेळ देण्याचा मी प्रयत्न करते.
– अलका सरग, सहायक पोलीस निरीक्षक.

यावर्षी महिलांना वरिष्ठांनी आवर्जून सुट्टी दिली आहे. त्यामुळे आम्हाला आनंद आहे. खरेदी व फराळसाठी साप्ताहिक सुट्टीवरच भर असतो. इतर दिवशी जास्तीचा वेळ काढून थोडी-थोडी कामे करतो. घरच्यांनाही आमच्या कर्तव्याची कल्पना असते. त्यामुळे ते पण आम्हाला सांभाळून घेतात. ते ही आम्हाला प्रत्येक वेळी मदत करतात.
– शनिता मोरे, पोलीस नाईक, वाहतूक विभाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)