महिला टेनिस प्रमुखांचा सेरेना विल्यम्सला पाठिंबा

लिंगभेद प्रकरणाचा वाद वाढण्याची चिन्हे

न्यूयॉर्क: अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे माजी विजेत्या सेरेना विल्यम्सचा संयम सुटला. पंचांनी दिलेल्या शिक्षेमुळे सेरेना भडकली आणि परिणामी तिला विजेतेपदाची किंमत मोजावी लागली. परंतु पंचांचा निर्णय लिंगभेद करणारा असल्याचा आरोप सेरेनाने केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. आता डब्लूटीए (महिला टेनिस संघटना) कार्यकारी प्रमुखांनी सेरेनाला पाठिंबा दिल्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत.

जपानच्या नाओमी ओसाकाविरुद्धचा अंतिम सामना सुरू असताना प्रशिक्षकांकडून सूचना घेतल्याबद्दल पंचांनी सेरेनाला प्रथम तंबी दिली. त्यानंतर एका गुणाचा दंड केला व अखेर तब्बल एका गेमचा दंड करीत सेरेनाच्या विजयाची आशा संपुष्टात आणली. ओसाकाने हा सामना 6-2, 6-4 असा जिंकून ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकणारी पहिली जपानी महिला खेळाडू बनण्याचा विक्रम केला. परंतु 23 ग्रॅंड स्लॅम विजेत्या सेरेनाला पंचांनी केलेल्या दंडामुळे ओसाकाच्या विजयाला गालबोट लागले.

सेरेनाने पंचांना उद्देशून “खोटारडे’ आणि “चोर’असे शब्द वापरले. त्याबद्दल पंचांनी तिला तंबी दिली. रॅकेट आपटून तोडल्याबद्दल एका गुणाचा दंड केला व पंचांना उद्देशून शिवीगाळ केल्याबद्दल एका गेमचा दंड ठोठावला. ज्या वागणुकीबद्दल पंचांनी आपल्याला दंड केला, तशीच वागणूक पुरुष खेळाडूंनी अनेकदा केल्याचे आपण पाहिले आहे. परंतु पंचांनी त्यांना कोणतीही शिक्षा केल्याचे कधीही दिसलेले नाही, असे सांगून सेरेना म्हणाली की, पुरुष व महिला खेळाडूंना पंच वेगवेगळे निकष लावत असल्याचे अनेक प्रसंगांमधून सिद्ध झाले आहे.

महिला टेनिस संघटनेचे प्रमुख स्टीव्ह सायमन यांनी सेरेनाला पाठिंबा देताना सांगितले की, महिला व पुरुष खेळाडूंबाबत पंच वेगवेगळ्या निकषांवर निर्णय घेत आहेत काय, यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. पुरुष व महिला खेळाडूंनी खेळाच्या आवेशात आपल्या भावनांचे प्रदर्शन केल्यानंतर त्यांना देण्यात येणारी वागणूक किंवा शिक्षा यात भेदभाव असता कामा नये. खेळाच्या मैदानावर सारे समान असतात, तेथे पुरुष व महिलांना वेगवेगळी वागणूक दिली जाणे मान्य करता येणार नाही. तसेच काल अंतिम सामन्यात पंचांनी असे काही केले नसेल, अशी आपण आशा बाळगू.

सेरेनाच्या प्रशिक्षकांबाबत संभ्रम

सेरेनाने विशेष कक्षात बसलेले आपले प्रशिक्षक पॅट्रिक मोराटोग्लू यांच्याकडून सूचना घेतल्यामुळे तिला दंड केल्याचा दावा पंच कार्लोस रॅमोस यांनी केला. मोराटोग्लू यांनीही आपण सेरेनाला खुणांच्या साहाय्याने काही संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मान्य केले. परंतु सेरेना सामन्याच्या दडपणाखाली होती व तिचे आपल्याकडे लक्षही नव्हते, असे सांगून मोराटोग्लू म्हणाले की, मी तिला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करीत होतो हे मला लपवायचे नाही. तसे सगळेच प्रशिक्षक करतात. हा ढोंगीपणा कधीतरी थांबवायला हवा. महिला टेनिस संघटनेने तर ग्रॅंड स्लॅम वगळता बाकी सर्व स्पर्धांमध्ये प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यास अधिकृतपणे परवानगी दिली आहे. महान खेळाडू बिली जीन किंग हिने सेरेनाला पाठिंबा देताना पंचांनी दुहेरी निकष अवलंबणे थांबविण्याची मागणी केली आहे. तसेच याबाबत आवाज उठविल्याबद्‌ल सेरेनाचे अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)