महिला क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची नियुक्‍ती

नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्‍वचषक स्पर्धेपर्यंत पोवार यांची मुदत असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. रमेश पोवार यांना 2004 ते 2007 या कालावधीत दोन कसोटी आणि 31 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे.
आधीचे प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी महिला संघातील खेळाडूंशी मतभेद झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईकर रमेश पोवार यांच्याकडे गेल्याच महिन्यांत महिला संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर पूर्णवेळ जबाबदारीही देण्यात आली आहे. दरम्यान पोवार यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाचे सराव व प्रशिक्षण शिबिरही गेल्याच महिन्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे पार पडले.
रमेश पोवार यांच्यावर येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत महिला क्रिकेट संघाची जबाबदारी देण्यात आली असून या कालावधीत भारतीय महिला संघाचा श्रीलंका दौरा, त्यानंतर ऑक्‍टोबर महिन्यात वेस्ट इंडीजमध्ये होणारी द्विपक्षीय मालिका, तसेच नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडीजमध्येच होणारी महिलांची टी-20 विश्‍वचषक स्पर्धा या स्पर्धांचा समावेश आहे. बीसीसीआयने रमेश पोवार यांची भारतकीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक केली असून त्यांच्याकडे 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत या संघाची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी आज जाहीर केले.
न्या. लोढा समितीच्या शिफारशीनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सध्या कार्यरत असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीलाच (सीएसी) दीर्घ मुदतीसाठी मुख्य व पूर्ण वेळ प्रशिक्षक नेमण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बीसीसीआयने रमेश पोवार यांची केवळ 30 नोव्हेंबरपर्यंतच नेमणूक केली आहे. गेल्या दीड वर्षांत रमेश पोवार हे भारतीय महिला संघाचे तिसरे प्रशिक्षक आहेत.
याआधी तुषार आरोटे यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. तर त्यापूर्वी पूर्णिमा राव यांनी हे आव्हान स्वीकारले होते. परंतु गेल्या वर्षी झालेल्या महिलांच्या विश्‍वचषक स्पर्धेला काही दिवस बाकी असतानाच पूर्णिमा राव यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर तुषार आरोठे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना ऐतिहासिक कामगिरी केली होती. परंतु खेळाडूंशी असलेले मतभेद मिटविण्यात अपयश आल्याचा फटका आरोठे यांना बसला.
तब्पल 20 उमेदवारांमधून पोवार यांची बाजी 
तत्पूर्वी महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी तब्बल 20 जणांनी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या वीस जणांमध्ये भारताचे माजी फिरकी गोलंदाज सुनील जोशी, रमेश पोवार यांचे पारडे जड मानले जात होते. डावखुरे फिरकी गोलंदाज असलेले सुनील जोशी यांचा खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून असलेला अनुभव देखील दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता. कारण जोशी यांना 15 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असून त्यांनी ओमान आणि बांगलादेशच्या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. तसेच त्यांना जम्मू-काश्‍मीर, आसाम आणि हैदराबादच्या संघांच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे.
प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतील अन्य नावांमध्ये भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रा, विजय यादव, भारतीय महिला संघाची माजी कर्णधार ममता माबेन व सुमन शर्मा यांच्या नावांचा समावेश होता. तसेच न्यूझीलंडची माजी क्रिकेटपटू मारिया फॅहे हिचाही अर्ज महत्त्वाचा मानला जात होता. दोन कसोटी व 51 वन डे सामन्यांचा अनुभव असलेली मारिया सध्या एसीए क्रिकेट अकादमीत प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. परंतु या सर्वांना मागे टाकून पोवार यांनी बाजी मारली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)