महिला क्रिकेटची “तेंडूलकर’ : मिताली राज

किरण दीक्षित

क्रिकेट हा खेळ आपल्याकडे पुरुषांचाच खेळ म्हणून अजूनही पाहिला जातो. मैदानावर जेव्हा पुरुष संघांची लढत होते, त्यावेळी असलेली प्रेक्षक संख्या आणि महिला क्रिकेटवेळी असलेली प्रेक्षक संख्या पाहिली, तर हा फरक आपल्याला चटकन नजरेत भरेल. पण, याच पुरुषी खेळात आपल्या तंत्रशुद्ध खेळाने असंख्य क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत झालेली महिला क्रिकेटची “तेंडूलकर’ म्हणजे मिताली राज.

अगदी काही वर्षांपूर्वी हे नाव कुठेही नव्हतं. पण, भारतीय महिलांची क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरी जगासमोर आली आणि मिताली यांचेही नाव सगळ्यांच्या तोंडी रुजले. मिताली राज यांचा जन्म 3 डिसेंबर 1982 मध्ये राजस्थानच्या जोधपूर येथे झाला. कुटूंब हैद्राबादला आले आणि मिताली हैद्राबादच्या झाल्या. वडील दोराई राज हे वायुसेनेत होते नंतर बॅंकेत अधिकारी होते. मिताली यांच्या करिअरसाठी आईने नोकरी सोडली आणि घरची जबाबदारी घेतली. त्यामुळे आजही मिताली या कोणत्याही मुलाखतीत आपल्या आईच्या कष्टांचा आणि त्यागाचा उल्लेख आवर्जून करतात. लहानपणापासूनच मिताली यांनी आपला भाऊ आणि इतर मुलांसोबत सराव केला. त्यामागेही मोठी रंजक कहाणी आहे.

लहानपणी क्रिकेटआधी मिताली भरतनाट्यम शिकत होत्या. मिताली यांनी लहान वयापासूनच मंचावर नृत्य करण्यास सुरु केले होते. शास्त्रीय नृत्य मंचावर सादर करायच्या तेव्हा सर्व प्रेक्षकांचे मन जिंकायच्या. मात्र, जेव्हा त्या क्रिकेट स्पर्धा खेळायला लागल्या तेव्हा नृत्याचा सराव होतच नव्हता. एक दिवशी मितालीला क्रिकेट किंवा नृत्य या दोघांमधून एकाला निवडण्यास सांगितले. खूप विचार केल्यानंतर मिताली यांनी नृत्यकला आणि मंचाला सोडून क्रिकेट आणि मैदानालाच आपले आयुष्य बनविण्याचा निर्णय घेतला. आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. आज मिताली यांचे नाव जगातील सर्वोत्तम क्रिकेटर म्हणून घेतले जाते.

मिताली राज यांची कारकीर्द (5 मार्च 2018 पर्यंत)


मिताली यांनी 189 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात 170 डावात 50.88 च्या सरासरीने 6,259 धावा केल्या आहेत. त्या 47 वेळा नाबाद राहिल्या आहेत. मिताली यांनी वन-डे क्रिकेटमध्ये 6 शतके केली आहेत.


मिताली यांनी 68 ट्‌वेंटी-ट्‌वेंटी सामने खेळले आहेत आणि 34.6 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहेत.


मिताली यांनी 10 कसोटी सामने खेळले आहेत आणि 51 च्या सरासरीने 16 डावात 663 धावा केल्या आहेत. त्यांचा सर्वाधिक धावांचा विक्रम 214 आहे.

फक्त चौदा वर्षे वय असतानाच त्यांना भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून घेण्यात आले. सोळाव्या वर्षी त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 26 जून 1999 रोजी मिल्टन किनेसच्या कॅंम्पबेलपार्क मध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात मिताली यांनी रेश्‍मा गांधी यांच्या सोबत डावाची सुरुवात केली. त्यात त्यांनी नाबाद 114 धावा केल्या. भारताने हा सामना 161 धावांनी जिंकला. यानंतर भारताला एक नवा स्टार खेळाडू मिळाला. पुढे जात मिताली यांनी महिला क्रिकेटच्या एक दिवसीय प्रकारात 5 हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचा मान मिळवला. आतापर्यंत केवळ दोनच महिला खेळाडूंना हा बहुमान मिळवता आला आहे. मिताली यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना 2002 मध्ये खेळला. 14 ते 17 जानेवारीच्या दरम्यान लखनौ येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात मिताली शुन्यावर बाद झाल्या. पण पुढे जाऊन त्या महिला कसोटी सामन्यात दुहेरी शतक करणाऱ्या पहिला खेळाडू ठरल्या.

मिताली यांनी जेव्हा क्रिकेट सुरू केले, होते तेव्हा त्यांना फक्त भारतीय क्रिकेटमध्ये जागा मिळवणे इतकाच उद्देश होता. त्यांनंतर त्यांना मुख्य खेळाडू व्हायचे होते. त्यासाठी मिताली यांनी जीवतोड मेहनत घेतली. पुढे त्यांची मेहनत, यश, जिद्द, चिकाटी बघून त्यांची निवड संघाच्या कर्णधारपदी झाली. त्यांच्याच नेतृत्वात भारतीय महिलांनी विश्वचषकाच्या फायनलपर्यंत धडक मारली. नुकत्याच झालेल्या आफ्रिका दौऱ्यातही मिताली यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसली. मिताली यांना त्यांच्या योगदानासाठी अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या महिलेला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा…!

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)