महिला क्रिकेटकडेही मंडळ गांभीर्याने पाहत आहे : स्मृती

अमित डोंगरे

मूळची सांगलीची, म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची नवोदित फलंदाज, स्मृती मानधना आता भारतीय महिला क्रिकेटचे विश्‍व गाजवत आहे. महिला विश्‍वकरंडक विश्‍व स्पर्धेच्या अंतिम लढतीत, भारतीय संघाला, उपविजेते पदावर समाधान मानावे लागले असले, तरी आगामी 2021 सालची स्पर्धा मात्र, भारतीय संघच जिंकेल, असा सकारात्मक विश्‍वास तिने व्यक्त केला. या आणि इतर बऱ्याच मुद्यांवर तिच्याशी केलेली बातचीत :-

विजेतेपदापासून वंचित राहिल्याचे दुःख आहे का ?
शल्य निश्‍चितच आहे. कारण बलाढय ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केल्यानंतर इंग्लंड संघासमोर आम्ही पूर्ण सकारत्मकतेने उतरलो होते. त्यांच्या धावसंख्येसमोर मात्र आमची मात्रा चालली नाही. चाळीसाव्या षटकापर्यंत आम्हाला विजयाच्या आशा होत्या. पण त्याचवेळी भरात असलेली पूनम राऊत बाद झाली आणि आमच्या उरल्या-सुरल्या आशाही संपुष्टात आल्या.

पहिल्याच विश्‍वकरंडकाचा अनुभव कसा होता?
भारताची कर्णधार आणि विश्‍वविक्रमी खेळाडू मिताली राज,तसेच सर्वाधिक बळी घेणारी झुलान गोस्वामी यांच्याबरोबर मला खेळायला संधी मिळाली, त्यांच्याकडून बरेच काही शिकता आले, ही माझी या स्पर्धेतील सर्वात मोठी कमाई मी समजते. या स्पर्धेत आलेला अनुभव मला आगामी कारकीर्दीसाठी बहुमोल ठरणार आहे. खास करून मितालीने दिलेल्या टिप्स सर्वाधिक मोलाच्या ठरणार आहेत. ही स्पर्धा केवळ काही शिकवणारीच ठरणार नव्हती. तर अपयशावर आणि नैराश्‍यावर सकारात्मकतेने कशी मात करायची हे शिकवणारीही होती.

महिलांसाठी आय. पी. एल. ही काय संकल्पना आहे?
घरातून मुलींना पोषक वातावरण मिळाले तर क्रिकेटच नव्हे, तर कोणत्याही खेळात मुली आपले कर्तृत्व सिध्द करून दाखवतात. साक्षी मलिक, पी. व्ही. सिंधू, सानिया मिर्झा, ललिता बाबर ही आपल्या डोळयासमोरचीच उदाहरणे आहेत. मग हे क्रिकेटमध्ये जास्ती संख्येने घडले, तर नवनवीन खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळेल. माझ्या आईवडिलांबरोबरच माझे प्रशिक्षक अनंत तांबवेकर यांनी मला प्रोत्साहन दिले म्हणून मी हा पल्ला गाठू शकले. जर असेच प्रोत्साहन महिलांसाठी आय. पी. एल. सुरू करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिले, तर देशाला आगामी विश्‍वकरंडकापूर्वी अधिक सरस खेळाडू गवसतील. रांचीसारख्या छोटया शहरातून आलेला खेळाडू भारतीय संघाचा विश्‍वविक्रमी कर्णधार होऊ शकतो व महेंद्रसिंग धोनी म्हणून जगभरात नावाजला जाऊ शकतो. हेच भारतीय महिला क्रिकेटबाबतही घडू शकते, गुणवत्ता शोधमोहीम, आय. पी. एल., महिला क्रिकेटप्रति थोडी फार आस्था यातून हेही घडू शकते.

भारतीय मंडळ, महिला क्रिकेटबाबत गंभीर नाही का ?
याबाबत मी कोणतेही थेट भाष्य करणार नाही. याबाबत वाचकांना, जाणकारांना, पत्रकारांना आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील पदाधिकाऱ्यांना विचारणा केली, तर जास्त सयुक्‍तिक ठरेल. महिला विश्‍वकरंडक स्पर्धेबाबत बोलायचं झालं तर या संपूर्ण स्पर्धेंत आम्हाला मंडळाचे पूर्ण सहकार्य मिळाले. तक्रार करण्याची कोणतीही संधी त्यांनी दिली नाही. हे झाले मोठया स्पर्धेबाबत. असेच सहकार्य अ संघ, एकोणीस वर्षांखालील संघ, तसेच इतर वयोगट व शालेय आणि महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या महिला क्रिकेटसाठी सोयीसुविधांचा प्रसार पोहोचला तरच खऱ्या अर्थाने महिला क्रिकेटलाही अच्छे दिन येतील व भविष्यात आणखी काही मिताली राज, झुलान गोस्वामी यांच्यासारख्या खेळाडू देशाला गवसतील.

दुखापतीतून सावरून, उर्वरीत स्पर्धेत मात्र चांगली कामगिरी केलीस.
पहिल्या काही सामन्यांत मला दुखापतीने सतावले होते, गेली चार वर्षे मी या स्पर्धेची वाट पाहत होते. पहिल्या दोन सामन्यांत माझ्या धावा झाल्या नाहीत आणि मी पूर्ण निराश झाले होते. त्याचवेळी संघातील जागा गमावणार का, असाही प्रश्‍न माझ्यासमोर उभा राहिला होता. पण कर्णधार मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी मला धीर आणि विश्‍वास दिला. पुढील सामन्यात मला खेळण्याची संधी दिली. न्यूझीलंड विरुद्धच्या या सामन्यात, मी दुखापतीवर मात करून अत्यंत महत्त्वाची लढत संघाला जिंकून देऊ शकले. अर्थात मी दुखापतीतून बाहेर आले याचे सर्व श्रेय संघ प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांना जाते. इथूनच माझी बॅट तळपू लागली. साखळीतील ऑस्ट्रेलिया विरुध्दचा पराभव आम्हाला सलत होता. याच संघाशी आमचा उपांत्य सामना होणार होता. संपूर्ण संघ दडपणाखाली होता, याचवेळी कर्णधार मिताली राज हिने आक्रमकता हेच बचावाचे योग्य धोरण असल्याचे आमच्या मनावर बिंबवले आणि एखादा चमत्कार घडावा, तसा प्रकार ऑस्ट्रेलिया विरुध्द घडला व आम्ही स्वप्नवत विजयासह जिंकून अंतिम फेरी गाठली. त्यादिवशी आमच्यापैकी एकहीजण झोपली नाही. आम्ही जवळपास बाजी मारली होती. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला विश्‍वकरंडक जिंकण्यासाठी आम्हाला आता केवळ यजमान इंग्लंड संघाला पराभूत करायचे होते. ऑस्ट्रेलियाचा संघाच्या तुलनेत इंग्लंडचा संघ फारसा तुल्यबळ नव्हता. याच भ्रमात आम्ही फसलो आणि हातातोंडाशी आलेला विजय गमावून बसलो. कर्णधार मिताली राजचं स्वप्न आमच्या बेजबाबदार फलंदाजीमुळे धुळीला मिळालं. आता पुढील विश्‍वकरंडक स्पर्धा आणखी चार वर्षांनी होत आहे, त्या संघात मिताली असेल, का निवृत्त झाली असेल, हे सांगू शकत नाही. मात्र संपूर्ण सकारत्मकतेने इतकं आश्‍वासन नक्कीच देऊ शकते,े की आगामी विश्‍वकरंडक भारतीय संघच जिंकणार आहे.

पुरुष खेळाडूंप्रमाणे लोकप्रियता मिळत नाही याची खंत वाटते का?
खंत वगैरे अजिबात वाटत नाही. उलट आम्ही जेव्हा उपविजेतेपदाचा करंडक घेऊन मायदेशी परतलो, तेव्हा आमच्या स्वागताला उभे असलेले हजारो क्रिकेटप्रेमी पाहून एक क्षण आम्ही भारावून गेलो. पुरुष खेळाडूंना मिळणारी लोकप्रियता ही एका दिवसात मिळालेली नसून, ती त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मिळालेली आहे. कोणालाही एका दिवसात यश मिळत नाही. आम्हीदेखील सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिलो, तर चाहते आमच्या कामगिरीची नक्कीच दखल घेतील. विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर आजतागायत आमच्याबाबत स्तंभ, मुलाखती, बातम्या वगैरे जे काही प्रकाशित होत आहे त्यामुळे आगामी विश्‍वकरंडकासाठी आमचा हुरूप वाढला आहे. यश आणि अपयश या खेळाच्या दोन बाजू असतात, यंदा आम्ही अपयशी ठरलो. मात्र पुढच्या वेळी यश खेचून आणू. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सातत्याने आगामी चार वर्षात ठराविक अंतराने भारतीय महिला संघाला सराव म्हणून परदेशात काही सराव सामने खेळण्याची जर संधी दिली, तर त्याचा खेळाडूंना खूप मोठा लाभ होईल. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या चार देशांत येत्या चार वर्षांमध्ये असे ठराविक सराव सामने जर खेळवले गेले तर तेथील खेळपट्टी, वातावरण, गोलंदाजी त्यांचे फलंदाज यांचा काटेकोर अभ्यास करतील आणि चार वर्षानंतर होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत सहभागी होणे अधिक सोपे ठरेल.

लोकाश्रयाबरोबर राजाश्रयही मिळाला.
आजवर भारतीय महिला क्रिकेट संघाबाबत फारसे गांभीर्य न दाखविणारे सरकारही यंदा जागे झाले. आपापल्या राज्यातील खेळाडूंना राज्य सरकारांनी रोख रकमची पारितोषिकेही दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही महिला संघातील सदस्यांना रोख रकमेचा पुरस्कार दिला. आणि भविष्यात आवश्‍यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातील याची ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)